computer

काका-काकू लोक 'मेरा साया' आजही का बघतात याची कितीतरी कारणं!! यातलं तुम्हांला कोणतं लागू पडतं?

'मेरा साया', हो तोच तो- झुमका गिरा रे वाला. त्यावरून बरेलीत चक्क झुमक्याचा पुतळाच उभारला गेलाय. आज आम्ही त्याच त्या सिनेमाबद्दल बोलत आहोत.

तर आता सांगा,  सध्या घरात अडकलेले ' काका' जनरेशनवाले काय करतात? ते भांडी घासतात, व्हॉट्सॲपवर पडीक असतात, सतत भुणभुण करून काकूंचा जीव नक्कोसा करतात वगैरे वगैरे आहेच.  पण त्यासोबत घरातली विक्की-पप्पू किंवा चिन्मय-तन्मय जनरेशन वर्क फ्रॉम होम करताना त्यांच्या 'ओटीटी'चा ताबा घेऊन जुने सिनेमे बघतात. काका लोकांना नव्या जनरेशननी हे नीटच शिकवल्यामुळे त्यांचा त्रास थोडा कमी झालाय अशी न्यूज आहे म्हणे. तर आता जुने म्हणजे १९६०-७० चे सिनेमे! काय असतं या जुन्या सिनेमात असा प्रश्न पडणार्‍यांना आज आम्ही 'मेरा साया' बद्दल सांगणार आहोत.

या चित्रपटाची कहाणी तशी फार ग्रेट नाही. एका आईच्या दोन मुली असतात, एक बदचलन तर दुसरी सदचलन! बदचलन मुलगी डाकूंच्या टोळीत जाते, तर सदचलन मुलगी आत्महत्या करायला जाते. म्हणजे ती फक्त आत्महत्येचं अ‍ॅप्लिकेशन टाकायला जाते. ते मंजूर होण्या आधीच चित्रपटाचा नायक साइटवर येतो. भेट होते, तो सच्चा इन्सान असण्याची सगळी लक्षणं त्याच्यात असतात. तो श्रीमंत ठाकूर खानदानातला असला तरी तो 'बिगडी हुइ औलाद' नसतो, तर एक ग्रेट होण्यातला वकील असतो. त्यानंतर लग्न होते, तीन वर्षं जातात आणि नायक शिक्षणासाठी परदेशी जातो. आता इथे कहाणीत ट्वीस्ट येतो. नायिका मरायला टेकली अशी बातमी मिळाल्यावर नायक घरी येतो आणि ती प्राण सोडते. काही दिवसांतच तिची डुप्लीकेट कहाणीत एंट्री मारते आणि मग नायकाला समजतच नाही ही का ती आणि ती का ही? मग हिंदी सिनेमातले अदालतचे अनेक सीन, तारीख पे तारीख, थोडेसे फ्लॅशबॅक आणि शेवटी सगळ्या गुंत्याचा उलगडा. मग पुन्हा एकत्र आलेले राजाराणी मंदिरात जातात हे शेवटचे दृष्य! 

आता अशी कथा बघण्यासाठी कोणी लॉकडाऊनच्या नाईलाजात पण 'मेरा साया' बघणार नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी की अनेक 'काका-काकू' जनरेशनचे लोक हा चित्रपट अजूनही आवर्जून बघतात. त्याची कारणं अनेक आहेत. हा चित्रपट बघून आल्यावर त्या काळच्या अल्लड काकूंनी आपले केस 'साधना' कट केले असतील आणि दुसर्‍याच दिवशी तेव्हाचे तरणाबाण्ड 'काका' बघायला आले असतील. किंवा 'काकां'ची  त्याकाळची 'क्रश' साधना सारखी दिसत असणार.

म्हणजे सगळं काही 'साधना' साठीच का काय? हो, सुनील दत्त सारखा परफेक्ट्ट चौरस चेहरा बघायला 'मेरा साया' कोण बघणार? तो खरं म्हणजे कपाळावर लालभडक कुंकू लावलेला डाकू म्हणूनच छान दिसतो. नर्गिसचा नवरा आणि संजय दत्तचा पप्पा म्हणून त्याची ओळख ठेवायला हरकत नाही. पण मेरा सायाचे फॅन्स हा चित्रपट आजही का बघतात याची कारणं फारच वेगळी आहेत.   

हा होता राज खोसलाचा सिनेमा. साधनाला घेऊन केलेला तिसरा चित्रपट. 'एक मुसाफीर एक हसिना' आणि 'वह कौन थी' हे त्या आधीचे दोन चित्रपट. एक मुसाफिर एक हसिनामधल्या टॉप पाच गाण्यांपैकी 'बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी' आणि 'आप यूंही अगर हमसे मिलते रहे' म्हणजे थोरच होती. तर 'वह कौन थी'मध्ये चार टॉप गाणी होती. 'लग जा गले की फिर ये हसी रात हो ना हो' आणि 'नैंना बरसे रिमझिम रिमझिम' आजही 'काका जनरेशन' किंवा विक्की-पप्पू जनरेशन सगळ्यानांच आवडतात. 'एक मुसाफीर एक हसिना' चे संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर, तर 'वह कौन थी'चे संगीत दिग्दर्शक मदनमोहन! दोघंही 'होतील बहु, असतील बहु, पण या सम हा' या वर्गातलेच! 

तर आता 'मेरा साया' ची गाणी पण मदनमोहनची म्हणजे चित्रपट बघायला पुरेसे कारण! कोणीतरी म्हटलंय की लता मंगेशकरांच्या गाण्याला अगदी नॅनो फिल्टर लावला तरी त्यातून बाहेर येतील मदनमोहनची गाणी!  आता हे एक पुरेसे सज्जड कारण आहेच. त्यातून त्याची गोडी वाढवायला गीतं आहेत राजा मेहदी अलीखाँ यांची. त्यामुळे एकेक गाणे म्हणजे ५० इअर्स ओल्ड स्कॉचच्या एकेका घुटक्यासारखी आहेत.  त्यातून 'तू जहाँ जहाँ चलेगा' सारखं गाणं लताबाईंच्या आवाजात, तर 'झुमका गिरा रे  बरेली के' आशाताईंच्या आवाजात म्हणजे एकदम एक पे एक फ्री अशी फूलटूस स्कीम! त्या काळात काहीजणांनी तर 'नैंनोमे बदरा छाये' च्या सुरुवातीची ३८ सेकंदाची रईस खाँ साहेबांची सतार ऐकण्यासाठी रेकॉर्डच्या तबकड्या झिजवून टाकल्या आहेत म्हणे! यासाठी त्यांना सूरसिंगार परिषदेचे बक्षीसही मिळाले होते.

आता 'जय महाराष्ट्र' म्हणण्यासाठी दोन महत्वाची कारणंही या चित्रपटात आहेत ती पण सांगून टाकतो. या चित्रपटाचे फिल्म फेअर बेस्ट साऊंड अ‍ॅवार्ड मनोहर आंबेरकर या मराठी माणसाला मिळाले होते. आणि कॉलर टाइट करण्यासाठी सगळ्यात मोठे कारण असे की मेरा साया हा चित्रपट मूळ मराठी चित्रपट 'पाठलाग'चा री-मेक होता. पाठलागची कथा 'आशा परत येते' ही जयंत देवकुळे यांची होती. जयंत देवकुळे त्या जमान्यात अ‍ॅडव्हर्टायझींग्च्या दुनियेतलं मोठं नाव होतं. पाठलागची जोडी होती काशिनाथ घाणेकर आणि भावना, तर संगीत दिग्दर्शक होते दत्ता डावजेकर!

आता ' मेरा साया' पाह्यला की 'पाठलाग' पण बघा, आणि दिवसभर 'तू जहाँ जहाँ चलेगा' हे गाणे म्हणायचे, की 'पाठलाग'चे 'या डोळयांची दोन पाखरे' आठवत रहायचं? 'झुमका गिरा रे' आठवत स्वतःशीच हसत राहायचं, की 'नको मारूस हाक, मला घरच्यांचा धाक' ऐकून पुन्हा तोंडात बोट घालून खणखणीत शिट्टी मारायची हे काकांनीच ठरवायचं आहे. बाकी या चित्रपटात काहीच नाही!!

सबस्क्राईब करा

* indicates required