computer

आज होतंय छायाकल्प चंद्रग्रहण...जाणून घ्या याविषयी सर्वकाही

सुर्याला आणि चंद्राला लागणारी ग्रहणं का माणसासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलाय. विशेषतः खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी असते. आज म्हणजेच ५ आणि ६ जूनच्या मध्यरात्री या वर्षातलं दुसरं छायाकल्प चंद्रग्रहण होतंय. याआधी यावर्षी १० जानेवारीला अशाच प्रकारचं चंद्रग्रहण झालं होतं. एक दुर्मिळ योगायोग म्हणजे याच महिन्यात २१ तारखेला कंकणाकृती सुर्यग्रहणही होणार आहे.

चंद्रग्रहण आणि छायाकल्प चंद्रग्रहण (Lunar Eclipse and Penumbral Lunar Eclipse) नक्की कसे घडतात?

आपली पृथ्वी ही सूर्याभोवती भ्रमण करते आणि चंद्र तिच्याभोवती भ्रमण करतो. ज्यावेळी पृथ्वी चंद्र आणि सुर्याच्या मध्ये येते, त्यावेळी पृथ्वी चंद्रावर पडणारा सुर्यप्रकाश अडवते. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतोच. तो सुर्याचा प्रकाश परावर्तित करून चमकतो. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यानं चंद्राचा पूर्ण किंवा अंशतः भाग झाकोळून जातो. या खगोलीय घटनेलाच चंद्रग्रहण म्हटलं जातं.

छायाकल्प चंद्रगहणात चंद्र आणि सुर्याच्या मध्ये पृथ्वी आल्यानंतर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पण चंद्राच्या आकारात कोणताही फरक दिसत नाही. छायाकल्प चंद्रगहणात चंद्रावर पृथ्वीच्या सावलीच्या बाह्य भागाची अगदी विरळ छटा (Earth's Penumbra) चंद्रावर पडते. छायाकल्प चंद्रगहणात चंद्राचा ६५% भाग पृथ्वीच्या छायेत येतो. यावेळी सामान्य चंद्र आणि आणि या ग्रहणात फारसा फरक दिसत नाही. ज्योतिषशास्त्रातही या ग्रहणाला मान्यता नाही. मात्र या ग्रहणावेळी चंद्र अजूनच सुंदर दिसेल यात शंका नाही.

आजचं चंद्रग्रहण..

आज होणारं चंद्रग्रहण आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अॉस्ट्रेलिया, अंटार्क्टिका अशा जगातल्या बहुतांश भागात दिसेल. ३ तास १८ मिनिटं चालणारं हे ग्रहण ५ जूनच्या रात्री ११ वाजून १५ मिनिटांपासून सुरू होऊन ६ जूनच्या २ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल. खगोलशास्त्रज्ञांनी या ग्रहणाला 'स्ट्रॉबेरी चंद्रग्रहण' असं नाव दिलंय.
 

चंद्रग्रहण नक्की किती प्रकारचं असतं?

चंद्रग्रहणाचे तीन प्रकार आहेत. पूर्ण चंद्रग्रहण, आंशिक चंद्रग्रहण आणि छायाकल्प चंद्रग्रहण. यापैकी पूर्ण चंद्रग्रहणावेळी सुर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत आल्याने पृथ्वीची सावली चंद्राला पुर्णपणे झाकून टाकते. यावेळी चंद्र लाल रंगाचा दिसतो आणि त्यावरचे डागही स्पष्ट दिसतात. याला 'ब्लड मून' असंही म्हटलं जातं.

आंशिक चंद्रग्रहणावेळी पृथ्वीच्या फक्त काही भागाची सावली चंद्राच्या थोड्या भागावर पडते. यावेळी सुर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत नसतात.

आता विज्ञानानं दे दान सुटे गिरान काही खरं नसतं हे शिकवलंय. पण ग्रहणं पाहायला काय हरकत आहे? आता भारतात यावेळचं चंद्रग्रहण दिसणार नसलं तरी इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला हे स्ट्रॉबेरी चंद्रग्रहण नक्कीच दिसेल यात काही वादच नाही!

सबस्क्राईब करा

* indicates required