computer

दिल्लीतल्या जिममध्ये व्यायाम करणाऱ्या भुताची गोष्ट!! खरी की खोटी??

जगभरातल्या लोकांचा एक आवडता छंद आहे. जगात कुठेही जा, लोकांना या गोष्टींत भलताच इंटरेस्ट असतो. कोणत्या गोष्टींत? अहो, भुतांच्या गोष्टींत. पाहा, तुम्ही पण लगेच कान टवकारलेच ना? तर, लोकांचा आवडता छंद म्हणजे भुतांबद्दल किस्सेकहाण्या बनवायच्या आणि मग त्यांवर तासनतास गप्पा करत बसायचे. बोलणारे लोक या गोष्टी बोलून विसरून जातात, पण काहींच्या मनावर मात्र या गोष्टींचा खूप मोठा परिणाम होतो. आणि मग या किस्सेकहाण्यांमध्ये मालमसाल्याची भर पडून कुठल्याही गोष्टीचा संबंध भुताशी जोडला जातो.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि नेहमीप्रमाणे याचासुद्धा संबंध भुताशी जोडण्यात येत आहे. गोष्ट आहे दिल्लीच्या राणी झांसी पार्कमधली. तिथलं ओपन जिममधलं एक मशीन त्यावर कुणीही बसलेले नसताना आपोआप सुरू आहे असा तो व्हिडिओ होता. झालं, दिल्लीसह देशभरात या व्हिडिओची चांगलीच चर्चा झाली. अनेकांना त्या परिसरात भुताचा वावर असल्याचा संशय आला.

पण सुदैवाने काही सत्यान्वेषी लोकही समाजात असतात आणि ते प्रत्येक गोष्टीमागचे सत्य शोधून काढतातच. तसं इथंही झालंय. म्हणे या मशीनला नुकतंच ल्युब्रिकेशनसाठी ग्रीस लावलं होतं. त्यामुळे मशीनवरचा माणूस उतरला तरी ते थोडावेळ सुरु राहात होते आणि कुणीतरी गंमत म्हणून तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकांनी यावर जोक पण करायला सुरुवात केली होती. एकाने तर कोरोनामुळे भुतांनासुद्धा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करावा लागत असल्याचे म्हटले होते. लोकांची भीती आता दूर झाली असली तरी दोन तीन दिवस लोकांची झोप मात्र चांगलीच उडाली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required