computer

मॉडर्ना औषध कंपनीची कोव्हीड-१९ वरच्या व्हॅक्सिनची चाचणी यशस्वी....वाचा संपूर्ण बातमी !!

कोव्हीड-१९ च्या अंधारात आता काही आशेचे किरण दिसायला सुरुवात झाली आहे. काल मॉडर्ना या औषध कंपनीने त्यांच्या कोव्हीड-१९ वरच्या व्हॅक्सिनचे पहिल्या टप्प्याचे म्हणजे फेज -१ चे निकाल जाहीर केले आहेत आणि व्हॅक्सीन पहिल्या चाचणीत यशस्वी ठरल्याची घोषणा केली आहे. आज थोडक्यात ही बातमी काय आहे ते जाणून घेऊ या !

१. एकूण ४५ निरोगी स्वयंसेवकांवर या व्हॅक्सिनचा प्रयोग करण्यात आला. व्हॅक्सिन दिल्यावर त्यांच्या शरीरात कोरोनाला प्रतिबंध करणार्‍या अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले. कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या रोग्यांपेक्षा जास्त अँटीबॉडीज त्यांच्या रक्तात आढळून आल्या ही व्हॅक्सिन यशस्वी असल्याची पहिली पावती मिळाली आहे. 

२. अर्ध्या स्वयंसेवकांना थकवा, हीव भरून येणे, अंग दुखणे असे काही साइड इफेक्ट जाणवले आहेत. पण कोणतेही गंभीर साइडइफेक्ट जाणवलेले नाहीत. कदाचित असेच साइड इफेक्ट यानंतरच्या डोसने पण जाणवतील असा अंदाज आहे.

३. १६ मार्च २०२० ला या विषाणूचा जनुकीय क्रम (genetic sequence) सापडल्यानंतर ६६ दिवसांनी माणसांवर व्हॅक्सिन वापरून फेज -१ पार करणारी 'मॉडर्ना' ही पहिलीच कंपनी आहे.

४. हे व्हॅक्सिन तयार करण्यासाठी अमेरिकन सरकारने मॉडर्नाला आतापर्यंत ०.५ बिलीयन डॉलरची आर्थिक मदत केली आहे. जर हे व्हॅक्सिन यशस्वी ठरले तर तर या कंपनीचे हे पहिलेच 'लायसन्स्ड प्रॉडक्ट' असेल.

५.  मॉडर्नाच्या या व्हॅक्सिनचे नाव mRNA-1273 असे आहे. रायबोन्युक्लीक अ‍ॅसिडचा यात वापर केला आहे. हे शरीराने शोषल्यावर ते पेशींना 'प्रोटीन' बनवायचा आदेश देते, जे पेशींच्या बाह्य स्तरावर आवरण चढवते. हे आवरण कोरोनाच्या विषाणूंसारखेच असते. त्यामुळे शरीर त्याचा मुकाबला करायला सुरुवात करते. अशा रितीने कोरोनाच्या विषाणूंशी लढण्यास शरीर तयारीत राहते.

६. १५ स्वयंसेवकांचा एक गट याप्रमाणे अनुक्रमे तीन गटांना २५,१००,२५० मायक्रोग्रॅमचा डोस त्यांना देण्यात आला. 

७.  २५० मायक्रोग्रॅमचा डोस ज्यांना देण्यात आला त्या स्वयंसेवकांना साइडइफेक्ट जास्त जाणवले. डोकेदुखी, अंगदुखी आणि काही जणांना १०३ डिग्रीपर्यंत ताप जाणवला. सर्वच स्वयंसेवकांना हे साइड इफेक्ट जाणवले नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते हे गंभीर स्वरुपाचे साइड इफेक्ट नाहीत.

८.  या टप्प्यावर मिळालेल्या यशामुळे या पुढच्या चाचण्या करायला कंपनीने आता सुरुवात केली आहे. २७ जुलैच्या दरम्यान फेज-३ च्या चाचण्या सुरु होतील. 

९. फेज -३ च्या चाचण्या यशस्वी झाल्या तर कंपनीने दरवर्षी ५० कोटी व्हॅक्सिनचे डोस तयार करण्याची व्यवस्था केली आहे.

१०. गेल्या काही दिवसात बर्‍याच देशात व्हॅक्सिन बनवण्याचे प्रयोग सुरु आहेत. मॉडर्नाला मिळालेले हे पहिल्या टप्प्यातील यश निश्चितच उत्साह वाढवणारे आहे पण  व्हॅक्सिन तयार होऊन बाजारात येण्यासाठी काही काळ जावाच लागणार आहे.

व्हॅक्सिनच्या उपयुक्ततेचे अनेक टप्पे परिक्षणाधीन असतात, त्यांना 'फेज' म्हटले जाते. या विषयी बोभाटाने आधी माहिती दिलीच होती. पण वाचकांच्या सोयीसाठी पुन्हा एकदा त्यावर नजर टाकू या! 

फेज १: तयार झालेले व्हॅक्सिन किंवा इतर कोणतेही औषध निर्धोक आहे का?  त्यासाठी देण्यात येणार्‍या डोसचे प्रमाण किती असावे? याची चाचणी केली जाते. 
फेज २: मोठ्या समूहावर त्याचा प्रयोग केला जातो. त्याचे परिणाम तपासले जातात.
फेज ३ : खूप मोठ्या समूहावर त्याचा वापर केला जातो आणि कितीजणांना ते लागू पडते याची नोंद केली जाते . सोबत काही 'साइडइफेक्ट' आहे काय याची चाचणी केली जाते. मॉडर्नाच्या व्हॅक्सिनसाठी या टप्प्यात ३०,००० लोकांवर ही चाचणी घेतली जाणार आहे.

या निराशेच्या काळात या बातमीच्या निमित्ताने एक आशेचा किरण दिसत आहे. लवकरच लॉकडाऊन-अनलॉक हे शब्द आपल्या रोजच्या आयुष्यातून हद्दपार होतील अशी आशा करूयात. आमेन!!

सबस्क्राईब करा

* indicates required