१० रुपयांसाठी तब्बल २ लाखांचा दंड? का आणि कशासाठी ते जाणून घ्या !!

२०१७ साली एका रेस्टॉरंटला पाण्याच्या बॉटलसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्यामुळे २०,००० रुपयांचा दंड भरावा लागला होता. २०१९ साली बाटाच्या एका शोरूमने पिशवीसाठी अधिकचे ३ रुपये आकारल्यामुळे त्यांना ९००० रुपयांचा दंड आकरण्यात आला होता. हे सगळं ठीक आहे. पण कधी १० रुपये जास्त आकारले म्हणून २ लाखांचा दंड भरावा लागल्याचं ऐकलंय का? हे प्रकरण नुकतंच घडलंय.
२०१४ साली मुंबईचे सबइन्स्पेक्टर भास्कर जाधव आईस्क्रीम घेण्यासाठी शगुन रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यांनी २ फॅमिली पॅक विकत घेतले. बिल बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की रेस्टॉरंटने त्यांना १६५ रुपये छापील किंमत असलेल्या आईसक्रिमसाठी १७५ रुपये आकारले आहेत. त्यांनी याची तक्रार केली, पण रेस्टॉरंटवाल्यांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही.
हा खटला शेवटी ग्राहक न्यायालयात गेला. आपली बाजू मांडताना रेस्टॉरंटने म्हटलं की आईस्क्रीम साठवण्यासाठी जो खर्च येतो त्यासाठी हे अधिकचे पैसे आकारण्यात आले आहेत. हा दावा कोर्टाने फेटाळून लावला. कोर्टाने निर्णय देताना म्हटलं की ग्राहकाने केवळ आईस्क्रीम विकत घेतलं होतं, रेस्टॉरंटमध्ये पाणी मागवलं नव्हतं किंवा आईस्क्रीमसाठी रेस्टॉरंटचं फर्निचर-भांडी वापरली नव्हती, त्यामुळे या दाव्याला आधार नाही.
ग्राहक कोर्टासमोर शगुन रेस्टॉरंट गुन्हेगार ठरलं आहे. कोर्टाने शेवटचा निर्णय देताना हे स्पष्टपणे म्हटलं की ‘ग्राहकांना अधिकचे पैसे आकारून रेस्टॉरंटने नफा कमावला आहे.’ शगुन रेस्टॉरंटला आता २ लाख रुपयांचा दंड आणि ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
तर वाचकहो, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा दुकानदाराने जास्तीचे पैसे आकारल्याचा अनुभव तुम्हाला आला आहे का? तुम्ही अशा परिस्थितीत काय केलं होतं? आम्हाला नक्की सांगा.