टाटा आणि शापूरजी पालनजी मेस्त्री वाद का आणि काय आहे? टाटा कंपनीचा कारभार कसा चालतो?

गेल्या दोन आठवड्यात अखेर टाटा (आणि टाटा सन्स) व शापूरजी पालनजी मेस्त्री या दोन कंपन्यांमध्ये चाललेला झगडा कोर्टापर्यंत पोहचला. एरवी आपल्या शांत स्वभावांसाठी प्रसिध्द असलेले हे दोन्ही 'बावाजी'पक्ष त्यांच्या कौटुंबिक समस्या सोडवायला कोर्टात का पोहोचले याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. पण आता हा झगडा तात्पुरता तरी शमलेला दिसतो आहे. कोर्टाने पुढची तारीख दिलेली असली तरी त्याधीच काहीतरी तोडगा निघेल असं दिसतंय. पण हा विवाद निर्माण कसा झाला? त्याची मुळं काही जुन्या मानापमानासोबत जोडली गेली आहेत का? आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी त्यात रस का घ्यावा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याआधी टाटांच्या साम्राज्याविषयी काही मूलभूत गोष्टी माहिती असणंही आवश्यक आहे.
हे वाचून आश्चर्य वाटेल पण रतन टाटा आणि शापूरजी पालनजी मेस्त्री कुटुंब यांच्यापैकी कोणाच्याही हातात वैयक्तिक पातळीवर हक्क गाजवावे इतके शेअर्स नाहीत. सगळ्या टाटा कंपन्यांच्या सर्वाधिक शेअर्सची मालकी टाटा सन्स या एकाच कंपनीकडे आहे. अशा कंपनीला होल्डींग कंपनी म्हणतात. म्हणजेच टाटा सन्सचे सर्वाधिक शेअर्स ज्या व्यक्तीच्या नावावर असतील त्याच्या मर्जीने कंपन्या चालतील.
इथे टाटा कुटुंबाच्या विचारधारेची ओळख पटावी असे काही आहे. एका किंवा मोजक्या काही व्यक्तींच्या हातात निरंकुश सत्ता दिली तर उद्योग लयाला जाण्याची भीती असल्याने टाटा सन्सचे सर्वाधिक शेअर अनेक वेगवेगळ्या सामाजिक आणि खाजगी ट्रस्टच्या नावावर ठेवले गेले आहेत. म्हणजेच टाटा उद्योग समूह हा ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जाणारा उद्योग समूह आहे.
हे समजण्यास कठीण आहे म्हणून पुन्हा एकदा सोप्या समजून घेऊ या.
१ - टाटा कंपन्यांचे म्हणजे- टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस आणि इतर कंपन्यांचे- सर्वाधिक (मेजॉरिटी) शेअर्स कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात नाहीत.
२ - या कंपन्यांचे सर्वाधिक (मेजॉरिटी) शेअर्स टाटा सन्स या होल्डींग कंपनीकडे आहेत.
३ - टाटा सन्सच्या होल्डींग कंपनीच्या ५५% शेअर्सची मालकी सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराब टाटा ट्रस्ट आणि वेगवेगळ्या प्रमाणात अनेक सामाजिक आणि खाजगी ट्रस्टच्या हातात आहे. १८% शेअर्स शापूरजी पालनजी या कुटुंबाकडे आहेत.
४- थोडक्यात टाटा उद्योगाच्या मुख्य पदावर कोण असेल हे फक्त टाटा सन्सचे मेजॉरिटी शेअरहोल्डर म्हणजेच या सर्व ट्रस्टचे पदाधिकारी (ट्रस्टी) ठरवू शकतात.
ट्रस्टींना जी व्यक्ती विश्वासार्ह वाटेल त्याच व्यक्तीच्या हातात या कंपन्यांचा कारभार असेल.
गेल्या आठवड्यात कोर्टासमोर आलेल्या झगड्याचे मूळ २०१६ साली झालेल्या एका नाट्यमय घटनेत आहे.
२०१२ साली वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर रतन टाटांनी टाटा सन्स आणि टाटा उद्योग समूहाच्या चेअरमन पदाची सूत्रे शापूरजी पालनजी कुटुंबाच्या तरुण सदस्याकडे, म्हणजे सायरस मेस्त्री यांच्या हाती सोपवली. सायरस मेस्त्री यांच्या व्यवस्थापकीय सामर्थ्याची खात्री असल्याने सर्व टाटा ट्रस्टच्या पदाधिकार्यांनीही सायरस मेस्त्री यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर चार वर्षे - म्हणजे ऑक्टोबर २०१६ पर्यंत सगळे काही आलबेल आहे असे वाटत होते. पण २४ ऑक्टोबर २०१६ च्या दिवशी टाटा सन्सच्या व्यवस्थापकीय मंडळाने सायरस मेस्त्री यांना चेअरमन पदावरून काढून टाकले.
त्यांनी राजीनामा द्यावा किंवा व्यवस्थापकीय मंडळ त्यांना विशेष सभेत काढून टाकेल असे त्यांना सांगण्यात आले. सायरस मेस्त्री यांनी राजीनामा देण्याचे अमान्य केले आणि मंडळाने विशेष सभा घेऊन त्यांची हकालपट्टी केली. इथे टाटा आणि पालनजी कुटुंबाचा झगडा सुरु झाला. केवळ सुरुच झाला असे नव्हे, तर लोकांच्या समोर आला. सायरस मेस्त्री यांनी आधी कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे दाद मागितली. ट्रिब्युनलने सायरस मेस्त्री यांची हकालपट्टी अयोग्य असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात टाटा सन्स सुप्रीम कोर्टात पोहचले. सुप्रीम कोर्टाने टाटांच्या बाजूने निवाडा दिला. पण या दरम्यान भांडणाची आग शमली नव्हती. सायरस जरी टाटा समूहातून बाहेर गेले तरी त्यांचे कुटुंब टाटा सन्सचे मायनॉरीटी शेअर होल्डर होतेच. थोडक्यात, सगळ्या टाटा कंपन्यांमध्ये ते सर्वात मोठे मायनॉरीटी शेअरहोल्डर होते.
या झगड्यानंतर १९३० सालापासूनचे टाटा -पालनजी यांचे कौटुंबिक संबंध संपुष्टात आले. तोपर्यंत या दोन्ही कुटुंबाचे संबंध एकमेकांना अडीअडचणीत सांभाळून घेण्याचे होते. टाटा समूहाला जेव्हा गरज लागली तेव्हा पालनजी उभे होते आणि पालनजी यांच्यावर संकट आले तेव्हा टाटा त्यांच्या पाठीशी उभे होते. पण हे सगळे २०१६ साली संपले. २०१६ नंतर शापूरजी पालनजी उद्योगसमूह त्यांच्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत होताच. देशात आणि परदेशातही अनेक मोठमोठे प्रोजेक्ट तडीस जात होते आणि अचानक कोरोनाचे संकट कोसळले. इथे सुरु झाला टाटा-पालनजी झगड्याचा दुसरा भाग!
कोरोनाच्या संकटाने बांधकाम क्षेत्रावर अवकळा पसरली. पालनजी यांच्या प्रोजेक्टचे लाखो मजूर गावी परतले. कामे ठप्प झाली. विक्री संपली. कोवीडच्या सहा महिन्याच्या काळात झालेली पैशाची तूट आणि आधी उभी असलेली कर्जे या सगळ्यांचा सामना करण्यासाठी शापूरजी पालनजी कंपनीला ताबडतोब काही हालचाल करणे क्रमप्राप्त होते. कंपनीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पत उत्तम असल्याने सुमारे ११,००० कोटी रुपये गुंतवण्यास काही गुंतवणूकदार तयार झाले. पण त्यांना हमी म्हणून काही भक्कम गहाणवट हवी होती. ती पूर्तता करण्यासाठी शापूररजी पालनजी कंपनीने त्यांचे टाटा सन्स कंपनीचे शेअर्स देण्याचे ठरवले.
या गहाणवटीला टाटांनी आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर शापूरजी पालनजी कंपनीने कर्ज फेडले नाही तर गेली शंभर वर्षे केवळ टाटा कुटुंबीय आणि ट्रस्ट यांच्या यांच्या अखत्यारीत असलेल्या कारभारात बाहेरची कंपनी सहज ढवळाढवळ करू शकेल. पण त्याहीपेक्षा महत्वाचा कायदेशीर मुद्दा असा आहे की टाटा सन्सच्या शेअरची विक्री करायची झाल्यास टाटांकडे 'नकाराचा पहिला अधिकार' आहे. म्हणजे जर टाटांनी नाही म्हटले तरच ते शेअर इतर कोणालाही विक्री करण्याचा परवानगी शापूरजी पालनजी यांच्याकडे आहे.
“There are restrictions in the articles of association of Tata Sons, which may prevent the SP group from selling its shares to a third party without first offering it to existing shareholders.”
आता टाटा समूहाकडे एकच उपाय शिल्लक आहे. तो म्हणजे शापूरजी पालनजी यांचे १८% शेअर विकत घेणे. हे १८% टक्केवारीच्या आकड्यात छोटे दिसत असले तरी त्या १८%ची आजची किंमत १.५ लाख कोटी आहे. थोडक्यात टाटांना काही करून १.५ लाख कोटी आहे उभे करावे लागणार आहेत. इतर उद्योग समूहांच्या कामावर जसा कोवीड इफेक्ट आला आहे त्याला टाटा पण अपवाद नाहीत. सध्याच्या डळमळलेल्या वातावरणात १.५ लाख कोटी आणणार कसे? काही उपाय असे आहेत की टीसीएससारख्या कंपनीचे शेअर्स विकून टाकणे. टीसीएस हा टाटा समूहाचा मुगुट आहे. टाटांच्या टीसीएसच्या हिश्शाची किंमत ६.७ लाख कोटीपर्यंत जाऊ शकते. ते शेअर त्यांनी विकायचे ठरवले तर बाजारात मोठ्या विक्रीचे उधाण येईल. त्यामुळे शापूरजी पालनजी यांना टाटा सन्सचे शेअर गहाणवट ठेवायची परवानगी द्यायची किंवा त्यांना १.५ लाख कोटी पोच करायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.
"धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं" अशी परिस्थिती सध्या आहे! टाटा आणि शापूरजी पालनजी यांच्या कार्पोरेट युध्दात सध्या तरी शापूरजी पालनजी यांची सरशी झाली आहे असं तुम्हाला वाटतं का?