computer

एकेकाळी IIT त रघुराम राजन यांना शिकवणारे प्रोफेसर आदिवासींसाठी झटत आहेत!!

चूक की बरोबर सांगता येणार नाही, पण दिखाऊपणाच्या या दुनियेत तुम्ही कोण आहात यापेक्षा कसे दिसता, कसे राहता या गोष्टींना फार महत्त्व आहे. त्यामुळे अनेकदा परवडत नसतानाही अनेकजण फॅशनेबल कपडे, ब्रँडेड ऍक्सेसरीज, महागडे फोन, लक्झरी लाईफस्टाइल यांच्या आहारी जातात. नाही तो आव आणण्याचा केविलवाणा आटापिटा करतात. अर्थात थोडं खरवडलं, की त्यांचं सामान्यपण उघड होतंच. पण याच जगात अशीही काही माणसं आहेत, जी ज्ञानाने अतिशय समृद्ध, उच्चविद्याविभूषित आहेत, पण त्यांच्याकडे नुसतं बघून त्यांची महती लक्षात येत नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी आहे, गरजा खूप कमी आहेत. किंबहुना त्यांच्या ध्येयापुढे आणि ते साध्य करण्याच्या प्रवासात त्यांना या ऐहिक सुखांची, प्रतिष्ठेची, कोण काय म्हणेल याची पर्वाही नाही. आलोक सागर हे त्यापैकीच एक नाव.

हे आलोक सागर कोण, ते तुम्हाला माहीत आहे का? त्यांची कारकीर्द म्हणाल तर त्यांनी आयआयटी दिल्लीमधून इंजिनिअरींग केलं आहे, त्यानंतर अमेरिकेतील ह्युस्टन येथून मास्टर्स डिग्री आणि पीएचडी मिळवली आहे. सर्वात उल्लेखनीय म्हणजे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे ते आयआयटी दिल्लीमधले शिक्षक आहेत. त्यांना अनेक भाषा येतात, त्यामुळे कुणाशीही संवाद साधताना अडथळा येत नाही.

एवढा उच्चशिक्षित असलेला हा मनुष्य राहतो कुठे? तर मध्यप्रदेशातल्या एका दुर्गम आदिवासी खेड्यात. असं खेडं जिथे अजूनही वीज, चांगले रस्ते अशा सुविधा पोहोचू शकलेल्या नाहीत. शाळा आहे ती पण एकच प्राथमिक शाळा. मात्र या गैरसोयींबद्दल त्यांची काहीही तक्रार नाही. उलट तिथल्या आदिवासींबरोबर ते इतके एकरूप झाले आहेत की त्यांनी त्यांच्यासारखीच राहणी स्वीकारली आहे. केवळ कमरेला पंचा एवढ्याच वेशात सायकलवर मैलोनमैल फिरणारे आलोक सागर आदिवासी लोकांना बियांचं वाटप करतात. या परिसरात त्यांनी ५० हजारांपेक्षा जास्त झाडं लावली आहेत. गेल्या ३२ वर्षांपासून ते आदिवासी मुलांना शिक्षण देण्याचं काम करत आहेत. त्यांची मालमत्ता म्हणजे तीन कुर्ते आणि सायकल.

त्यांच्या या साध्या, लो प्रोफाईल राहणीमुळे अनेकदा काही गमतीजमती झाल्या आहेत. एकदा बेतूलच्या स्थानिक निवडणुकांच्या वेळी त्यांच्याकडे पाहून निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांना हाकलून देण्याचाही प्रयत्न केला होता. शेवटी आलोक यांनी आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रं त्यांना दाखवल्यावर आणि ते खरंच उच्चशिक्षित आहेत याची शहानिशा झाल्यावर त्या अधिकार्‍यांचा यांच्यावर विश्वास बसला. अजूनही आपण वरवरच्या भपक्याला किती भुलतो याचंच हे उदाहरण.

मात्र ते स्वत: एवढ्यातेवढ्याने हार मानणारे नाहीत, ना स्वस्थ बसणं हा त्यांचा स्वभाव आहे. देश बदलायचा तर मुळाशी जाऊन काम करण्याची गरज आहे हे त्यांनी कधीच जाणलं आहे. सध्या ते त्यांचा या दिशेने होणारा प्रवास मनसोक्त आनंदाने अनुभवत करत आहेत. कृतार्थ आयुष्य म्हणजे अजून काय असतं?

 

लेखिका : स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required