कोरोनाच्या नवीन रूपाने लंडनमध्ये आणीबाणी आणली आहे...वाचा सविस्तर माहिती !!

"संपत आलं बाबा हे कोरोंना वर्ष! देवा, आता परत नको तो व्हायरस." असे बोलून अनेक जणांनी प्रार्थना करून निश्वास टाकला असेल ना? 2020 हे पूर्ण वर्षच त्याने खाल्लं. आता लसीच्या सकरात्मक बातम्याही येत आहेत. त्यामुळे खूप बरंच वाटत असेल हो ना? पण सावधान, अजून धोका संपलेला नाहीये. असं का म्हटलं जातंय ते वाचूयात..
लंडनमधून एक भयंकर बातमी आली आहे. नुकतीच इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris johnson) यांनी लंडन मध्ये लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. तिथे मोठ्या प्रमाणात नाताळच्या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. पण आता सगळं थांबवण्याची वेळ आली आहे. कोणालाही बाहेर पडायला परत नोर्बंध लागू झाले आहेत. पण हे सगळं का? तर लंडनमध्ये कोविड-१९ चे नवीन स्वरूप आढळून आले आहे. आणि हे नवीन रूप जुन्यापेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. जॉनसन म्हणाले लोकांचा जीव वाचणे हे जास्त महत्वाचे आहे.
काय आहे प्रकरण?
इंग्लडचे मुख्य आरोग्य अधिकारी ख्रिस व्हिटी यांनी शनिवारी कोरोना व्हायरसचे नवीन स्वरूप आल्याचा खात्रीलायक दावा केला आहे. त्यांनी असेही सांगितले आहे की, हा नवीन व्हायरस मूळ व्हायरसपेक्षा वेगाने पसरत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणे अधिक धोकादायक होऊ शकते. या नवीन व्हायरसच्या स्वरूपाविषयी जागतिक आरोग्य संघटनेला( WHO) सूचित केले गेले आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 30 डिसेंबरपर्यंत निर्बंध घोषित केले आहेत. गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एका आठवड्यात एक हजारापेक्षा जास्त लोक पॉझिटीव्ह आले आहेत. या आठवडयात आधीच्या आठवड्यापेक्षा 40.9 टक्क्यांनी नवीन रुग्ण वाढले आहेत.
नवीन आलेली लस यावर किती लागू पडेल याविषयी ही अनेक प्रश्न आहेत. या व्हायरसने मृत्युदर किती वाढू शकतो किंवा याचे आरोग्यावर कसे घातक परिणाम होतात याविषयी अभ्यास चालू आहे. पण एकच सर्वांत चिंताजनक गोष्ट म्हणजे हा व्हायरस जास्त वेगाने पसरत आहे असे पंतप्रधानांनी देशाला टीव्हीच्या माध्यमातून सूचित केले आहे.
लंडन आणि दक्षिण पूर्व ब्रिटनमध्ये रविवारपासूनच लोकांना घरीच राहण्याचे आणि विनाकारण बाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी न जमण्यास, जिम, हॉटेल्स अशा ठिकाणीही फिरण्यास निर्बंध आहेत. या व्हायरसने नाताळ आणि नवीन वर्षाच्या उत्सवाला ग्रहण लावले असेच म्हणता येईल.
शास्त्रज्ञ याविषयी संशोधन करतीलच. पण अशी बातमी ऐकली की परत पोटात भीतीचा गोळा आल्याशिवाय राहत नाही ना? तिथेही तसेच झाले, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केवळ आठ तासांची मुदत दिल्यामुळे लोकांनी एअरपोर्टवर मोठया प्रमाणात गर्दी केली. लोक देश आणि शहर सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या प्रकरणात सगळीकडे परत गर्दी झाली, वाहतूक कोंडी झाली. परत लॉकडाऊनच्या भातीमुळे सगळे जागा सोडून सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले.
याविषयी अजून माहिती मिळतच राहील. ही बातमी घाबरवण्यासाठी नाही, तर अजूनही कशी परिस्थिती बिघडू शकते म्हणून सतर्कता बाळगण्यासाठी आहे. आता कुठल्या प्रकारची सतर्कता हे तर आपल्याला आता गेल्या मार्चपासून माहित आहेच. म्हणतात ना सर सलामत तो पगडी पचास.
त्यामुळे असेच सावध रहा, सुरक्षित रहा. नेहमीप्रमाणेच लेख आवडल्यास शेअर करा.
लेखिका: शीतल अजय दरंदळे