सायकलवर फिरून लोकांचे प्रश्न सोडवणारे कोल्हापूरचे उपमहापौर...त्यांच्या कामाबद्दल प्रत्येकाला माहिती असायला हवी !!

कोल्हापूरची माती ही रांगडी आहे, तसेच तेथील लोक म्हणजे भन्नाट आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर संजय मोहिते आपल्या वेगळ्या प्रकारे काम करण्याच्या शैलीमुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत.
रोज सकाळी ७ वाजता मोहिते आपले घर सोडतात. आपल्या सायकलवर ते या राजेशाही शहरातील आपल्या वॉर्डचा चक्कर मारतात. रोजच्या रोज सायकलवर फिरून लोकांच्या समस्या सोडवतात. त्यांची धडाडी बघून त्यांचं वय ६० वर्षे आहे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
मोहिते आपल्या सायकलफेरी दरम्यान त्याना दिसणाऱ्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. ते सांगतात की त्यांच्या या फेरीदरम्यान त्यांना कुणीतरी रस्त्याच्या बाजूला असलेले ड्रेनबद्दल सांगितले.त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून समस्या सोडविण्यास सांगितले. जर एखादी समस्या एका दिवसात सुटू शकणार नसेल तर आपण दुसऱ्या दिवशीच्या फेरीदरम्यान फॉलोअप घेतो, असे देखील त्यांनी सांगितले.
मोहिते सांगतात की, 'आपल्यावर महात्मा गांधी यांचा प्रभाव आहे. म्हणूनच थेट लोकांपर्यंत पोहोचण्यास आपण प्राधान्य देत असतो. लोकांना समस्या लवकरात लवकर सोडवून हवी असते, आणि तो त्यांचा अधिकार देखील आहे.'
मोहिते सांगतात की, आपल्याला संपूर्ण वॉर्डाचे लोक ओळखतात. 'तुम्ही कुठल्याही पक्षाच्या आमदार, खासदाराला विचारले तरी ते माझ्या कामाबद्दल कौतुक करतील' असे देखील ते नमूद करतात.
कोल्हापूर येथील स्थानिक लोक सांगतात की, 'ते लोकांच्या समस्यांना चांगल्या पद्धतीने समजतात. आपला वॉर्ड सर्वांना राहण्यासाठी सुयोग्य व्हावा म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात, याला ते एक आव्हान म्हणून स्वीकारतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचे पूर्ण महत्व मान्य करून ते सांगतात की, लोकांशी थेट भेटीगाठी होऊन त्यांच्या समस्या दूर होणे जास्त महत्वाचे आहे. सुरुवातीला हे काम स्कुटरवर फिरून करत असत. पण काही काळाने त्यांनी सायकलचा वापर करण्यास सुरूवात केली. या माध्यमातून ते लोकांना सायकलिंगचे महत्व देखील पटवून देत असतात.
मोहिते यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींचीदेशभरात गरज आहे, असेच या निमित्ताने सिद्ध होते.