१८० वर्षे जगण्यासाठी हे उद्योगपती उपवासापासून लाखो रुपये खर्च करण्यापर्यंत काय काय उद्योग करत आहेत वाचलंत का?

आपल्याला जास्तीत जास्त आयुष्य मिळावं अशी सर्वांचीच इच्छा असते, पण आपण किती वर्षे जगणार हे मात्र कुणालाच शेवटपर्यंत माहिती नसतं. पुराणातली ययातीची गोष्ट तर आपल्याला महित आहेच. आताही मायकल जॅक्सनने आपण खूप वर्षे जगावं म्हणून स्वतःच्या शरीरावर बरेच प्रयोग केले होते. त्याला काही झालं तरी त्वरित उपचार करण्यासाठी त्याच्याकडे त्याची स्वतःची ११ डॉक्टरांची टीम होती. इतके प्रयत्न करूनही हा पॉपस्टार पन्नाशी पार करू शकला नाही.
अमेरिकेचे उद्योगपती डेव्ह ॲस्प्री यांना १८० वर्षे जगण्याची इच्छा आहे. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ते खूप वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्वतःच्याच शरीरातील हाडांमधल्या अस्थिमज्जेतल्या स्टेम सेल्स (मूलपेशी) पुन्हा आपल्याच शरीरात इंजेक्शनद्वारे टोचल्या आहेत. यासाठी त्यांनी २५,००० डॉलर्स म्हणजेच १८ लाख रुपये खर्च केले आहेत.
आपल्याला भरपूर आयुष्य मिळावे असे कुणाला वाटत नाही? पण प्रत्येकाने हे स्वीकारलेले असते की मृत्यू आपल्या हातात नाही. तो कधी, कुठे कसा येईल हेही कुणाला कळत नाही, पण डेव्ह यांना या त्यांनी केलेल्या या प्रयोगावर इतका विश्वास आहे की, त्यांना वाटते १८० वर्षे जगण्याचे त्यांचे ध्येय अवश्य पूर्ण होणार आहे. डेव्ह यांचा असा विश्वास आहे की ते २१५३ पर्यंत जगणारच आहेत. यासाठी त्यांनी वापरलेल्या वैज्ञानिक पद्धतीला ते ‘बायोहॅकिंग’ असे संबोधतात. म्हणजेच जैविक घड्याळाच्या कामात हस्तक्षेप करणे.
आपल्याच अस्थिमज्जेतल्या स्टेम सेल्स काढून त्या आपल्याच शरीरात पुन्हा टोचल्याने वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते असा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या मते चाळीशीच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जर स्वतःवर हा प्रयोग केला तर शंभराव्या वर्षीदेखील चाळीशीच्या उत्साहाने माणूस काम करु शकेल.
हे कसे शक्य आहे?
याचं कारण म्हणजे यामुळे तुमच्या शरीरातील स्टेम सेल्सची संख्या वाढते आणि त्यामुळे तुम्ही तरुण राहता. ते म्हणतात, “इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे दिवसातून १४ ते १६ तास उपाशी राहाणेसारख्या पद्धती अवलंबल्याने देखील अशा स्टेम सेल्सची संख्या वाढू शकते. आपल्याला निसर्गत: भरपूर स्टेम सेल्स मिळालेल्या असतात. त्यामुळेच लहान किंवा तरुण वयात आपण एखाद्या आजारातून लवकर बरे होतो, पण जसेजसे वय वाढत जाते तसतसे या स्टेम सेल्सची संख्या कमी होऊ लागते, ज्यामुळे आपण वृद्धत्वाकडे झुकू लागतो. मी इंटरमिटंट फास्टींग करून स्टेम सेल्सची संख्या वाढवल्यावर त्याच स्टेम सेल्स इतर अवयवात वापरतो, त्यामुळे माझे शरीर अधिकाधिक तरुण राहते.”
याशिवायही डेव्ह यांनी अनेक प्रयोग केले आहेत. जसे की क्रायोथेरपी, जिला कोल्ड थेरपी म्हणूनही ओळखले जाते. ऊतींची झीज भरुन काढण्यासाठी ही पद्धत उपयोगी पडते. यासाठी डेव्ह गेली दहा वर्षे थंड पाण्याने अंघोळ करत आहेत. शिवाय, इंटरमिटंट फास्टिंग आहेच. यामध्ये ठराविक अंतराने आहार घेतला जातो. या पद्धतीमुळे आपल्या जुन्या कमकुवत पेशी नाहीशा होतात आणि नव्या ताज्या पेशी निर्माण होतात. ज्यामुळे आपण अधिक उर्जा अनुभवतो. याचा हृदयाला देखील फायदा होतो. यावेळी ते फक्त दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण घेतात. या दोन्ही जेवणाच्या वेळी ते अधिकाधिक पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करतात.
डेव्ह यांच्या मते, अशाप्रकारे आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करणारे ते एकटेच नाहीत. आजकाल अनेकजण असा प्रयत्न करत आहेत. यासाठी केल्या जाणाऱ्या काही प्रयोगांसाठी अजिबात पैसे खर्च करावे लागत नाहीत, तर काही पद्धती मात्र खूपच महागड्या आहेत. डेव्ह यांच्या मते, “जसे काही वर्षापूर्वी सर्वांनाच फोन घेणे परवडत नव्हते, पण आज प्रत्येकाकडे फोन आहेत. तसेच आज या पद्धतीचा वापर करणे बहुतांश लोकांना परवडणारे नसले तरी काही काळाने हे सर्वांसाठी उपलब्ध होईल.”
त्यांना १८० वर्षे का जगायचं आहे याचं उत्तर देताना ते म्हणतात, “या जगात खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, खूप गोष्टींमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे आहे आणि यासाठी मर्यादित कालावधी मिळाला तर आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून मला १८० वर्षे जगायचे आहे".
डेव्ह ॲस्प्री हे अन्न आणि पोषक आहार उत्पादक कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी बुलेटप्रुफ कॉफी नावाचे एक पेय निर्माण केले आहे. आपल्या आहारात कशाकशाचा समावेश असावा याची त्यांची व्यक्तिगत यादी खूपच लांबलचक आहे. ज्यात १५० प्रकारचे पूरक आहार देखील आहेत. त्यांच्या या सगळ्या प्रयोगामुळे ते नक्कीच दीर्घायुषी जीवन जगातील यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. नुसते दीर्घायुषी नाही तर १८० वर्षे!
काही तज्ञांच्या मते मात्र त्यांच्या या पद्धती अशास्त्रीय आहेत. काहींच्या मते तर आरोग्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो. तर ॲस्प्री यांच्या मते यासगळ्या आहार पद्धतीसाठी त्यांनी हजारो पुस्तकांचा अभ्यास केला आहे आणि असंख्य संशोधकांशी याबाबत चर्चा केली आहे. ॲस्प्री यांच्या मते त्यांच्याकडे आयुष्यमान किंवा आयुमर्यादा वाढवण्याच्या अशाही काही पद्धती आहेत, ज्यासाठी अजिबात पैसा खर्च करावा लागत नाही. भविष्यात अनेक लोक यांचा वापर करून दीर्घायुषी होतील असा त्यांचा विश्वास आहे.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी