computer

स्वप्नातलं घर पूर्ण झाल्यावर या माणसाला चक्कर का आली? त्याचं घर पाहून तुम्हालाही येईल !!

लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून अशी आपल्याकडे एक म्हण आहे. दोन्ही गोष्टी करताना होणारा खर्च, धावपळ, मनस्ताप, हेवेदावे रुसवे-फुगवे यांना काही अंत नसतो. त्यातल्या त्यात घर बांधताना किंवा तयार घर विकत घेताना तर खूपच दक्ष राहावं लागतं. आता हेच पहा ना नेपाळच्या या व्यक्तीने सिडनीमध्ये आपलं स्वप्नात्ल्म घर बनवून घेतलं आणि बिल्डरने घर तयार केल्यावर त्याच्यावर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. नेमकं काय घडलं आहे तुम्हीच पहा.

स्वतःचं आणि हक्काचं घर असलं की माणसाला हायसं वाटतंच. हाच विचार करून बिष्णू आर्यल या व्यक्तीने सिडनीतील बिल्डरसोबत करार केला होता. महत्वाचे म्हणजे या घरासाठी त्याने ४ कोटी रुपये मोजले होते. आता इतका पैसा मोजला म्हणजे आपल्याला घरही तशाच पद्धतीचं मिळणार, अशी अपेक्षा ठेवण्यात गैर ते काय? पण बिल्डरने जेव्हा बिष्णूला त्याचे घर तयार करून सोपवले तेव्हा तो चकितच झाला. कारण, बिल्डरने चक्क अर्धं घर तयार केलं होतं. वरील फोटोत तुम्ही पाहूच शकता. या बिल्डरशी करार करून आता त्याला पश्चाताप होत आहे. स्वतःच्या घराचे त्याचे स्वप्न पूर्णतः धुळीला मिळाले आहे.

बिष्णूने सिडनीतील एडमंडसन पार्क मध्ये घर बांधायचे ठरवले होते. त्याने त्यासाठी झॅक होम्ससोबत करार केला होता. या करारानुसार त्याने या कंपनीला जमिनीसाठी सुमारे १.८५ कोटी रुपये, तर घर बांधण्यासाठी म्हणून २.२ कोटी रुपये दिले होते. म्हणजे जवळपास त्याने या कंपनीला चार कोटी रुपये दिले. त्याचे म्हणणे आहे की, ‘बिल्डरने मला फसवले आहे. अशा अर्धवट घरासाठी मी पैसे मोजले नव्हते.’ त्याने याबाबत जेंव्हा त्या बिल्डरला जाब विचारला तेव्हा त्यांच्याकडून असे उत्तर मिळाले की, ‘ते पूर्ण घर नसून सेमी डुप्लेक्स हाउस आहे.’ पण बिष्णूच्या मते हे घर कुठल्याही बाजूने सेमी ड्युप्लेक्स देखील वाटत नाही.

एका नव्या आयुष्याची सुरूवात म्हणून बिष्णू नेपाळहून ऑस्ट्रेलियामध्ये राहायला गेला होता. त्याच्या या स्वप्नातील घरासाठी दहावर्षे पैसे वाचवले होते. हा सगळा पैसा त्याने प्लॉट आणि घर दोन्हींसाठी खर्च केला. शेवटी त्याच्या हाती जे लागलं त्याला घर म्हणावं का असा प्रश्न पडतो. या घरात जशा हव्या तशा सोईसुविधा नाहीत. एका बाजूला भली मोठी भिंत बांधलेली आहे, पण त्याला खिडकीच ठेवलेली नाही. त्याला जितकी जमीन मिळायला हवी होती तितकी जमीन न मिळता त्याच्या निम्मीच जागा मिळाली आहे. त्यामुळे आपण मोजलेला कष्टाचा पैसा पाण्यात गेल्याचे त्याला दुःख होत आहे.

शेवटी प्रश्न पडतोच की घर पूर्ण होई पर्यंत त्याने आपल्या घराचं बांधकाम कसं सुरु आहे हे एकदाही बघितलं नाही का? डिझाईन तयार करताना बिल्डरशी बोलणं झालं नाही का? असे अनेक प्रश्न विचारता येतील. सध्या बिष्णूच्या हातात डोक्याला हात लावून बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required