computer

करोडोंचं युरेनियम म्हणजे नक्की काय असतं? असं कुठेही मिळू शकतं?यातले व्यवहार-गैरव्यवहार काय असतात??

सूचना : काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीचा योग्य अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे. केवळ सनसनाटी बातमी देणे हा 'बोभाटा'चा उद्देश कधीही नसतो. हे वाचूनच सोबतचा लेख पुढे वाचावा.

चारच दिवसांपूर्वी '२१ कोटी रुपयांचे ७ किलो युरेनियम बाळगणार्‍या आणि ते विकण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन तरुणांना अटक' या बातमीने एक भितीची नवी लाट निर्माण केली आहे. या बातमीत '२१ कोटींचा' वरवर होणारा उल्लेख ज्यांना खटकला नसेल त्यांना खर्‍या मानसिक ताणाचा सामना करावा लागणार नाही. पण '७ किलो युरेनियम' हे शब्द या बातमीत जास्त महत्वाचे आहेत. ते शब्द ज्यांना कळले असतील त्यांच्या जीवाला नक्कीच मानसिक घोर लागला असेल. आता बातमीत '२१ कोटी' रुपयांचा उल्लेख करणे तद्दन मूर्खपणाचे लक्षण आहे, कारण युरेनियम म्हणजे सोनं नाही, ते बाजारात जाऊन विकता येत नाही. जे युरेनियम विकत घ्यायला तयार झाले असतील ते नक्कीच सज्जन नाहीत. जे युरेनियमचे प्रत्यक्ष वापरकर्ते आहेत, म्हणजे 'एंड युजर' आहेत त्यांनाच या किमतीशी देणं घेणं आहे. अर्थातच हे 'एंड युजर' घातपाती कारवायांशी जोडलेले अतिरेकी असतील यात शंका नाही.

(अटक करण्यात आलेले ते दोन तरुण)

त्यामुळे वाचकहो, हो बातमी वाचताना '७ किलो युरेनियम' हे शब्द जास्त महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. हा मुद्दा इतक्या तीव्र शब्दात तुमच्यापुढे मांडायचा उद्देश असा आहे की ७ किलो काय ७०० ग्रॅम युरेनियम सुध्दा जर चुकीच्या हातात पडले तरी ते विघातकच आहे. तेव्हा हे असे घडते आहे हा मुद्दा काळजीचा आहे. गंभीर आहे.

तुलनात्मक आकडेवारीच बघायची झाली तर हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या पहिल्या अ‍ॅटोमीक बॉंबमध्ये ६४ किलो समृध्द (एनरिच्ड) युरेनियम वापरले गेले होते आणि त्यापैकी काही ग्रॅममध्येच९०% शहर काही क्षणात उध्वस्त झाले होते. त्यानंतरच्या नागासाकीवर टाकण्यात आलेल्या बाँबमध्ये ६.४ किलो प्लुटोनियम वापरण्यात आले होते. याची तुलना केली तर असे लक्षात येते की प्लुटोनियम हे युरेनियमपेक्षा जास्त विघातक आहे.

दुसर्‍या महायुध्दात  इंटरनेट जन्माला आले नव्हते. आण्विक तंत्रं मोजक्या काही देशांकडे गोपनियरित्या जपून ठेवलेली होती. आता जमाना बदलला आहे. या बाँबची 'रेसेपी' डार्क नेट सारख्या अंधार्‍या भागात सहज उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अनेक 'ओपन सोर्सेस' म्हणजे फुकट तंत्रज्ञान वाटणारी सूत्रे आणि त्याची देवघेव करणारे, वेगवेगळे उद्देश असणारे लोकही आहेत. घातपाती कारवाया 'मोलोटोव्ह' कॉकटेल म्हणजे पेट्रोल बाँबपुरत्या मर्यादित राहीलेल्या नाहीत. पिस्तूले आणि एके-४७ चा जमाना संपून 'डर्टी बाँब'चा जमाना सुरु झाला आहे. अतिरेकी गटांना अतोनात मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करून देणारे लोकं जगात आहेत. एखाद्या ठिकाणी वापरून संपलेली आयडीया दुसर्‍या अतिरेकी गटांना विकणारे 'कन्सलटंट' आता जन्माला आलेत. थोडक्यात घातपाती विद्यापीठात 'न्यूक्लीअर टेररिझम' ही नवी शाखा जोर धरायला लागली आहे. 'चेचेन'च्या युध्दात रशियाला या 'न्यूक्लीअर टेररिझम'ने भयंकर धसका दिलेला आहेच.

(अशुद्ध स्वरूपातील युरेनियम)

पण वाचकहो, याचा अर्थ तुम्ही आम्ही आता देवाचा धावा करायला सुरुवात करा असा या '७ किलो' युरेनियम बातमीचा अर्थ नाही. पण इतक्या सहज कोणाच्यातरी हातात हे विघातक शस्त्र यावं ही काळजी करण्याची बाब आहे. आता तपास एनआयएकडे दिला आहे, त्यामुळे सत्य लवकरच उलगडेल यात शंका नाही पण डोळ्यावर कातडे ओढून दुर्लक्ष करण्याचीही ही बाब नाही.

आता अगदी शास्त्रीय पध्दतीने या बातमीचा मागोवा घेऊ या. सापडलेले युरेनियम 'स्क्रॅप' म्हणजे भंगारातून आलेले आहे. ते अतिशय शुध्द आहे. याचे दोन वेगवेगळे अर्थ काढता येतात. ते आधी तपासून बघू या. 

१. 

(Uranium concentrate)

युरेनियम किंवा कोणतेही किरणोत्सर्गी रसायन फक्त नाशासाठीच वापरले जाते असे नाही. ते वैद्यकीय शास्त्रात विधायक कामासाठी पण वापरले जाते. उदाहरणार्थ; कॅन्सरसारख्या आजारात ' रेडीएशन' थेरपी ही किरणोत्सर्गाचा वापरच आहे. आपण एक्स रे काढतो तो पण किरणोत्सर्गी प्रयोगच आहे. हे आपल्या माहितीतले आहेत. त्याखेरीज अनेक औद्योगिक वापरात पण ज्या मशिनरी वापरल्या जातात त्यात पण किरणोत्सर्गी मटेरिअयल असू शकतं. फक्त यामध्ये निरुपयोगी आणि टाकून देण्याच्या लायकीचे जे भंगार बाहेर पडते ते बेजबाबदारपणे फेकण्यात आले, तर हा '७ किलो' युरेनियमसारखा प्रकार घडू शकतो.

सर्व औद्योगिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारचे 'हॅझार्डस मटेरियल' हाताळण्याचे सरकारी निर्देश जागेवर आहेत पण ते न पाळता जेव्हा 'स्क्रॅप डिस्पोजल'केले जाते तेव्हा भंगारवाल्याकडे असे मटेरियल जमा होते. भंगारवाले किंवा स्क्रॅप डिलर' ही अशिक्षित जमात असते. त्यांचे लक्ष फक्त मिळणार्‍या किमतीकडे असते. साहजिकच असा धोकादायक माल चुकून हातात पडलाच तर तो सरकारी यंत्रणांच्या हाती तातडीने सोपवणे त्यांच्याकडून होत नाही. परिणामी हे मटेरियल चोरी-छुपे पध्दतीने विकण्याचा प्रयत्न केला जातो आणि फसतो. लक्षात घ्या अशा पध्दतीने सापडलेले युरेनियम हे पहिल्यांदा घडलेले प्रकरण नाही. या अगोदरही अशी प्रकरणे घडली आहेत. त्यामुळे आपण घाबरायलाच पाहिजे अशी परिस्थिती नाही.

२.

(अणुभट्टी)

आपल्या देशात इतर देशांकडूनही भंगार आयात केले जाते. जुनी वाहने- जहाजे- औद्योगिक प्रकल्प- पेट्रोलीयम-खत प्रकल्प अशा वेगवेगळ्या दिशांनी जमा झालेले भंगार कायदेशीर मार्गाने आपल्या देशात येते. जेव्हा औद्योगिक वातावरण तेजीचे असते तेव्हा भंगाराची मागणी वाढत जाते. धातूंचे भाव वाढत जातात. खाणीतून येणार्‍या 'व्हर्जीन' मटेरियलपेक्षा हे 'रिसायकल्ड' धातू स्वस्त असतात. या कारणाने बाहेरील देशातून लाखो टन भंगार आयात केले जाते. यामध्ये एक धोकादायक प्रकार म्हणजे 'वॉर स्क्रॅप'.

संपूर्ण जगात युध्दं चालूच असतात. गेली अनेक वर्षे इराक, इराण, अफगाणिस्थान, सिरिया अशा अनेक देशात, त्या अगोदर युगोस्लाव्हीया -बोस्नीया -सारायेवो -या बाल्कन भागात, जुन्या सोव्हिएट रशियाच्या चेचेन-युक्रेन अशा भागात, वेगवेगळ्या रितीने युद्धं चालूच असातात-चालू होती. या युध्दात निर्माण झालेले भंगार म्हणजे 'वॉर स्क्रॅप'. हे वॉर स्क्रॅप' अत्यंत स्वस्त मिळते. धोका असा असतो की त्यात न फुटलेले तोफगोळे-बाँब पण येतात. भारतात हा स्क्रॅप आणण्यावर बंदी आहे, पण परदेशातील व्यापारी इंडस्ट्रीयल स्क्रॅप मध्ये वॉर स्क्रॅप मिसळतात. या स्क्रॅपमध्ये पण किरणोत्सर्गी स्क्रॅप येण्याची शक्यता असते.

वर दिलेल्या मुद्द्यांवरून हे लक्षात आले असेल की बेपर्वाई, हलगर्जीपणा, नियम न पाळणे, एका रात्रीत श्रीमंत होण्याची हाव अशा मानवी स्वभावामुळे हे अपघात घडत असतात. 

आता बघू या की आपल्याला त्यापासून काय धोका आहे. 

'७ किलो युरेनियम' हे शब्द वाचून घाबरू नका. आपल्या देशात असे 'अ‍ॅटम बाँब' तयार होतील अशी परिस्थिती नाही. आपल्या देशात युध्दाचे वातावरण नाही, आपल्या देशात इतर देशांसारखी यादवी माजलेली नाही. आपल्या देशात जागरुक लोकशाही आहे. काही अपवाद वगळता शांतीपूर्ण वातावरण आहे. अर्थातच हे आपल्याला भूषणावह आहे, पण ज्यांना हे नको आहे अशी काही अतिरेकी तत्वे पण भारतात अनेक वर्षे मूळ धरून आहेत. अशा लोकांच्या हातात हे युरेनियमसारखे घातक द्रव्य पडले तर त्याचा उपयोग 'डर्टी बाँब' बनवण्याकडे केला जाऊ शकतो. आता डर्टी बाँब म्हणजे काय ते समजून घेऊ या .

(प्रातिनिधिक फोटो)

'डर्टी बाँब' म्हणजे  किरणोत्सर्गी रसायनाचे मिश्रण करून बनवलेले बाँब! अशा बाँबस्फोटात तात्काळ मनुष्य हत्या तर होतेच, पण किरणोत्सर्गी रसायनामुळे अनेकांना संसर्ग होऊन अनेक लोक हळूहळू मरण पावतात. ही प्रेरणा अतिरेक्यांना फ्रान्समधल्या एका अपघातातून मिळाली. फ्रान्समध्ये एका वाहन अपघातात ९०० स्मोक डिटेक्टरचा चुराडा झाला तेव्हा किरणोत्सर्गाची भीती पसरली होती. बर्‍याच वेळा किरणोत्सर्ग तर होतोच पण सोबत घबराट जास्त होऊन त्याचा परिणाम मोठा होतो. 

आता सगळ्यात महत्वाची गोष्टः आपल्या तपासयंत्रणा आणीबाणीच्या प्रसंगी अत्यंत वेगाने हालचाली करून अशा प्रकरणांचा फडशा पाडतात. या प्रकरणाचाही ते असाच तपास करून त्याला संपवतील याबद्दल खार्त्री बाळगा. 

जयहिंद !!

सबस्क्राईब करा

* indicates required