computer

व्यंग असलेली मुले, गर्भातच होणारा मृत्यू, कॅन्सरग्रस्त रुग्ण....तैवानच्या एकाच सोसायटीत हे सगळं का घडत होतं?

शहराजवळ नवी सोसायटी तयार होतेय, त्यांच्या जाहिराती आणि सोयीसुविधा पाहून तुम्ही घर घेतलं खरं, पण एखाददोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येक घरात कोणीतरी आजारी पडायला लागलं. विशेषतः लहान मुलं, काही व्यंगासकटच जन्माला आली, तर काही जन्माला येतायेताच या जगातून गेली. कोणालातरी कॅन्सर झाला. एक अस्वस्थ वातावरण सोसायटीत पसरलं! मग कोणीतरी वास्तूतज्ञाला बोलावलं, त्यालाही काही कळेना. पण सोसायटीत काहीतरी विचित्र घडतंय हे सगळ्यांना कळत होतं. आपण चुकून अण्णा नाईकाच्या घरात राहतोय का काय असं वाटायला लागलं!

थोडा विचार करा ही काल्पनिक परिस्थिती प्रत्यक्षात घडली तर? हो हे घडलंय. भारतात नाही, पण तैवानमध्ये काही वर्षांपूर्वी घडलं आहे. फरक इतकाच की हे आपल्या गृहसंकुलात घडतं आहे हे त्या सदस्यांना फार फार उशीरा कळलं. वाचू या हा काय प्रकार होता..

१९८२च्या ऑक्टोबर महिन्यात तैवानच्या एका रि-बार म्हणजे लोखंडाच्या सळया बनवणार्‍या फॅक्टरीत ६०४ टन भंगारलोखंड येऊन पडलं. फॅक्टरीच्या भाषेत त्याला एचएमएस म्हणजे हेवी मेल्टिंग स्क्रॅप असं म्हटलं जातं. जगभरात अशाच भंगारातून लोखंडाच्या सळया बनवल्या जातात. या सळ्या इमारतीच्या बीम आणि कॉलममध्ये वापरल्या जातात. तर हे ६०४ टन भंगार इतर भंगारात मिसळलं गेलं आणि २०००० टन सळया कारखान्यातून बाहेर पडल्या. या सळयांचा उपयोग करून तैवानमध्ये जवळजवळ २०० इमारती उभ्या राहिल्या, अनेक टॉवर्स उभे राहिले, १७०० अपार्टमेंटचं एक गृहसंकुल म्हणजेच हाऊसिंग कॉम्लेक्स उभे राहिले. लोकं रहायला आली. पण आपण एका भयंकर संकटाच्या छायेत राहतो आहे हे समजायला मध्यंतरात १० वर्षं सहज निघून गेली. 

१९८५साली या संकुलात असलेल्या एका डेंटिस्टच्या एक्स-रे मशीनची तपासणी करायला सरकारी अधिकारी आले. जगात सगळीकडे जिथे एक्स-रे मशीन वापरली जातात तिथे मशिनद्वारे होणार्‍या किरणोत्सर्गाचे प्रमाण बघून त्यानंतर परवाना दिला जातो. त्याप्रमाणे हे अधिकारी तपासणीला आल्यावर त्यांना क्लिनिकमध्ये आल्यावर त्यांना किरणोत्सर्गाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आढळले. साहजिकच त्यांनी ते एक्स-रे मशीन वापरण्यास मनाई केली. असा अपवाद वगळात १९९२ पर्यंत आपल्या संकुलात किती भयंकर धोका वावरतो आहे हे कोणाच्याही ध्यानात आले नाही. 

१९९२ साली तैपॉवर या कंपनीत काम करणार्‍या आणि या संकुलात राहणार्‍या एका माणसाने त्याच्या मुलाला गीगर काउंटर नावाचे एक छोटे मशीन दाखवायला घरी आणले. तो न्युक्लीअर पॉवर कंपनीत काम करणारा असल्याने तेथील किरणोत्सर्ग मोजण्यासाठी हे मशिन तो नेहेमीच वापरायचा. घरी आल्यावर मुलाला ते मशीन दाखवताना त्याचे काटे गरगरा फिरायला लागले आणि त्याच्या लक्षात आले की आपल्या घराच्या भिंतींतून मोठ्या प्रमाणात रेडीएशन होते आहे. एखाद्या न्युक्लिअर प्लँटमध्येसुद्धा होत नाही इतका किरणोत्सर्ग त्याच्या घरात होत होता. किरणोत्सर्ग मोजण्याचे माप असते 'सिव्हर्ट'. त्याच्या घरात होणारा किरणोत्सर्ग सामान्य किरणोत्सर्गाच्या शंभर पट होता. 100 milliSieverts हे रेडीएशन घरात होईलच कसे? या विचाराने तो चक्रावून गेला. नेमकी ही बातमी लिबर्टी टाईम्स वृत्तपत्राच्या वार्ताहराला मिळाली आणि त्यानंतर एकच गदारोळ सुरु झाला! 

 

(गीगर काउंटर)

घराच्या भिंतींमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ आले कसे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आणि त्याचे उत्तर सापडले लोखंडाच्या सळ्यांमध्ये. त्याच त्या भंगारातून बनवलेल्या सळ्या!!  सळ्या बनवण्यात वापरल्या गेलेल्या भंगारातल्या ६०४ टन भंगारात Cobalt-60 हे अतिकिरणोत्सर्गी मूलद्रव्य मिसळले गेले होते. ते आले कुठून ?? ६०४ टन भंगार तैवानच्या ३ मोठ्या न्युक्लिअर पॉवर प्लँटमधून आले होते, की चोरीच्या मालातून आले होते, की जुन्या टाकून दिलेल्या वैद्यकीय उपकरणातून आले होते? अनेक चर्चा सुरु झाल्या. पण वस्तुस्थिती एकच होती की तपासणी न करता बाहेर आलेल्या भंगारात Cobalt-60 होते.

थोडक्यात, प्रचंड मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग असलेल्या घरांमध्ये ही सर्व माणसे १० वर्षांहूनही अधिक कालावधी राहत होती. अनेकांना कॅन्सर झाला होता. अनेक घरात जन्मत: शारिरीक व्यंगं असलेली मुलं जन्माला आली होती आणि त्याचे मूळ होते भंगारातून आलेल्या Cobalt-60 मिश्रित लोखंडी सळ्यांमध्ये!

ही बातमी व्हायरल झाल्यावर तैवानच्या अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशनने हे सर्वसामान्य रेडीएशन आहे असे म्हणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर जनतेकडून आलेल्या दबावामुळे त्यांना तपास करावाच लागला. शेवटी तो सरकारी तपासच! तपास करण्यात ४ वर्षे गेली. कोट्यावधी डॉलर्सचा खर्च करण्यात आला.  त्यातून आलेले निष्कर्ष कोर्टासमोर आल्यावर ३ अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. ५७ कॅन्सरग्रस्त लोकांना भरपाई देण्यात आली.

आजच्या तारखेस ते संकुल उजाड झाले आहे. इमारती पाडण्यात आल्या आहेत. कोणीही तेथे राहत नाही. कोबाल्टचे परिणामही कमी झाले आहेत, पण त्यात राहणार्‍या कुटुंबांची वाताहत झाली हे ढळढळीत सत्य आहे.
 
असे अनेक अपघात घडत असतात. सरकारी यंत्रणा चौकशी करत बरीच वर्षे घेतात. लोकांच्या स्मृतीतून या घटना हद्दपार होतात आणि नवे अपघात घडत राहतात! 
गेल्या आठवड्यात भंगारातून जप्त झालेल्या ७ किलो युरेनियमच्या घटनेनंतर अशा बर्‍याच घटना आम्हाला आठवल्या, त्यांपैकी ही एक!

सबस्क्राईब करा

* indicates required