computer

या भारतीय कुटुंबाला १० लाख डॉलर्सचे लॉटरी तिकीट सापडले, पण ते त्यांनी परत का केले?

वेळेच्या आधी आणि नशीबापेक्षा जास्त कुणाला मिळत नाही असे म्हटले जाते. अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय कुटुंबाजवळ नशीबाने घबाड आयते चालून आले होते. एखादी गोष्ट मिळाली तर लॉटरी लागली असे आपण म्हणतो, पण या कुटुंबाला लॉटरी न लागता आयते १ मिलियन डॉलरचे म्हणजे १० लाख डॉलरचे लॉटरी तिकीट सापडले होते. पण या कुटुंबाचा मोठेपणा असा की त्यांनी ते तिकीट योग्य त्या व्यक्तीला परत केले.

हि अमेरिकेतील मॅसेच्युसेटस राज्यातील गोष्ट आहे. या भागातील रोज फिगा नावाच्या महिलेने मार्च महिन्यात एका भारतीय कुटुंबाच्या 'लकी स्टॉप' नावाच्या दुकानातून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. अमेरीकेत बहुतेक सर्वच दुकानात लॉटरीची तिकीटं विक्रीस ठेवलेली असतात. या लॉटरीचे बक्षीस तिकीट स्क्रॅच करून जो नंबर येईल त्यावर असते. या बाईने दुकानात तिकीट घेतले-स्क्रॅच केले आणि नंबर लागला नाही असे समजून तिकीट टाकून दिले. परंतु झाले असे होते की चुकून त्या तिकीटावरचा एक नंबर स्क्रॅच करायचा राहून गेला होता आणि तिकीट कचर्‍यात भिरकावून ती निघून गेली. लॉटरीचे तिकीट वाया गेले तर नैराश्य येऊन त्याचे तुकडे करून ते फेकले जाते, पण नशिब असे की रोज फिगाने तिकीट फेकताना ते फाडले नव्हते.

दुसर्‍या दिवशी दुकानाच्या मालकाच्या मुलाने, अभि शहाने, तेच तिकीट उचलून बघीतल्यावर त्याच्या लक्षात आले की तिकीटाचा एक नंबर स्क्रॅच करायचा बाकी आहे. तो स्क्रॅच करून त्यानी लॉटरीचा रिझल्ट पुन्हा एकदा पाहिला आणि काय आश्चर्य त्या या तिकीटाला चक्क १ मिलियन डॉलरची लॉटरी म्हणजे भारतीय रुपयात ७.५ कोटींची लॉटरी लागली होती.

अभि शहाच्या जागी दुसरा कुणी असता तर त्या तिकिटाचे पैसे स्वतः घेऊन दुकान बंद करून चांगला मोठा बिजनेस सुरु केला असता. पण येस्स ! या भावाने भारताचे नाव एका कृतीतून जगात गाजवले आहे. अभिने जेव्हा आपल्याला तिकीट मिळाले आहे ही गोष्ट घरात सांगितली तेव्हा सर्वांनी मिळून ते तिकीट त्या महिलेला परत करण्याचा निर्णय घेतला.

ती महिला त्यांच्या लॉटरीच्या दुकानाची नियमित ग्राहक असल्याने तिला शोधणे तसे कठीण काम नव्हते. अभिचे वडील आणि दुकानाचे मालक मौनीश शहा सांगतात की, 'जेव्हा तिकीट मिळाले तेव्हा आपल्याला रात्रभर झोप लागली नाही. आपण तिकीट परत केल्यावर आपल्याला जगभरातून मुलाखतीसाठी फोन येत आहेत. जर तिकीट परत केले नसते तर आपण एवढे प्रसिद्ध झालो नसतो.'

अशाप्रकारे त्या महिलेला तिकीट मिळून ती श्रीमंत झाली, तर शहा कुटूंबाचे कौतुक जगभर होऊन त्यांना देखील प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र एवढे महाग तिकीट परत करण्याचे धाडस केले हे देखील कौतुकास्पद आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required