जयपूरचा दहावी नापास रिक्षावाला झाला फ्रान्सचा जावई...वाचा त्याचा प्रवास !!

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. म्हणूनच भारतातील जयपूर सारख्या शहरात राहणारा एक साधा रिक्षावाला देखील फ्रान्सचा जावई होऊ शकला. आता हे जर तुम्हाला पटत नसेल तर, जयपूरच्या या राजू रिक्षावाल्याची ही हकीगत नक्की वाचा.
जयपूरच्या दलित वस्तीत जन्मलेल्या रणजीत सिंग राजचे बालपण काही फार सुखवस्तू होते असे नाही. लहानपणीच त्याने परिस्थितीचे चटके सोसले होते. प्रत्येक सामान्य आई-वडिलांची असते तशीच राजच्या आई-वडिलांचीही इच्छा होती की, आपला मुलगा शाळा शिकेल, काही तरी मोठे काम करेल आणि आपली परिस्थिती बदलेल. त्यांनी राजला शाळेत घातले, पण राजचे काही शिकण्यात आणि शाळेत मन रमत नव्हते.
राज सांगतो, “मला काही शाळा शिकण्यात रस नव्हता. लहानपणी मी काही तेवढा हुशारही नव्हतो. मोठा झाल्यावर नेमकं काय करायचं हेही माझं ठरलं नव्हतं.”
दहावी नापास झाल्यावर राजने शाळेला आणि शिक्षणाला कायमचाच रामराम ठोकला. वयाच्या १६ व्या वर्षीच त्याने एक रिक्षा घेतली. जयपूर हे एक जागतिक पर्यटन स्थळ आहे. जगभरातून लोक हे गुलाबी शहर पाहायला येतात. त्यामुळे इथे पर्यटन व्यवसाय चांगला चालतो, हे तर तुम्हालाही माहिती असेलच. आजूबाजूच्या तरुणांचे पाहून राजनेही हाच व्यवसाय स्वीकारला. पाण्यात पडल्यावर पोहता येते तसेच राजचेही या व्यवसायात पडल्यावर झाले. रिक्षा चालवायला लागल्यावर त्याला कळले की, परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इतर व्यावसायिक परदेशी भाषा शिकून घेतात. फ्रेंच, स्पॅनिश, इंग्लिश अशा आणि याहूनही दुसऱ्या जागतिक भाषाही या लोकांना अवगत होत्या. हे पाहिल्यावर त्यालाही परदेशी भाषा शिकण्याची ओढ लागली.
राज म्हणतो, “त्याकाळी तरुणांमध्ये आयटीची क्रेझ होती आणि मला फक्त परदेशी भाषा शिकायची होती. माझ्यातील छुप्या व्यावसायिकाचा शोध मला लागला होता आणि आता मला माझा व्यवसाय वाढवायचा होता.”
त्याने नंतर एक टूरिस्ट कंपनी सुरू केली. परदेशी पर्यटकांना संपूर्ण राजस्थानचे दर्शन घडवण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला. राजस्थान बद्दल परदेशी पर्यटकांना किती कुतूहल आहे हे वेगळे सांगायलाच नको. फ्रान्सहून काही मुलींचा एक ग्रुप राजस्थानच्या टूरवर आला होता. या ग्रुपमधीलच एका मुलीशी राजचे सूत जुळले.
“आम्ही पहिल्यांदा जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये भेटलो. ती आपल्या काही मैत्रिणींसोबत राजस्थान फिरण्यासाठी आली होती. मी तिला आणि तिच्या मैत्रिणींना संपूर्ण राजस्थान फिरवून दाखवले. त्यानतंर ती फ्रान्सला निघून गेली, पण आम्ही स्काईपद्वारे संपर्कात राहिलो. नंतर आम्हाला जाणवले की, आम्ही प्रेमात पडलो आहोत,” राज सांगतो, “ती मला फ्रान्सला बोलवत होती, पण मला व्हिसा मिळत नव्हता. मी व्हिसासाठी खुपदा प्रयत्न केले, पण वारंवार माझा व्हिसा नाकारण्यात येत होता. आम्ही खूपच निराश झालो होतो. मला तर आता अजिबात चैन पडत नव्हते. इतक्या दूरदूर राहून आम्ही आमचं नातं कसं निभावणार हाच मोठा प्रश्न होता. शेवटी वैतागून तीच भारतात आली. प्रेम तुम्हाला काहीही करायला भाग पाडतं.”
“वाट माझी बघतोय रिक्षावाला,” हे तर तुम्ही हजारदा ऐकले असेल, पण एका रिक्षावाल्याची सातासमुद्रापार कुणीतरी वाट पाहत होते. हे मात्र पहिल्यांदाच ऐकले असेल, होना?
राजला व्हिसा मिळवून देण्याच्या उद्देशानेच ती भारतात आली. इथे आल्यावर दोघांनीही भारतातील फ्रेंच दूतावासासमोर धरणेच धरले. त्यांना भारतातील फ्रान्सच्या राजदुतांना भेटून आपली समस्या सांगायची होती. दूतावासातील एका अधिकाऱ्याने त्यांच्या या हट्टाची दखल घेतली. त्याने दोघांना भेटायला बोलावले आणि त्यांची समस्या सविस्तर जाणून घेतली. इतके सगळे होऊनही फ्रान्स दूतावास राजला व्हिसा देण्यास उत्सुक नव्हते. का-कू करत करत त्यांनी त्याला तीन महिन्यासाठीचा पर्यटन व्हिसा दिला. आता राज फ्रान्सला जाऊ शकत होता. पर्यटन व्हिसाच्या जोरावर तो तीनदा फ्रान्सला जाऊन आला.
आता मात्र त्याला मोठ्या कालावधीसाठीचा व्हिसा हवा होता आणि यासाठी त्याने पुन्हा एकदा अर्ज केला. तेव्हा मात्र फ्रान्स दूतावासाने त्याला फ्रेंच शिकण्याची अट घातली. शेवटी त्याने फ्रेंच क्लासला अॅडमिशन घेतले आणि फ्रेंच भाषेचे सर्टिफिकेटही मिळवले. या सर्टिफिकेटमुळे त्याला मोठ्या कालावधीचा व्हिसा मिळवणे सोपे गेले.
राज पुन्हा एकदा फ्रान्सला गेला. २०१४ मध्ये त्याने आपल्या प्रेयसीसोबत लग्नही केले. दोघांना एक अपत्यही आहे. तो आता स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा येथे राहतो. तिथे एका रेस्टॉरंटमध्ये काम करतो. लवकरच त्याला स्वतःचे रेस्टॉरंट सुरु करायचे आहे. सध्या तो एक युट्युब चॅनल चालवतो आहे, ज्यावरून तो लोकांशी आपल्या स्पेशल रेसिपी शेअर करतो.
म्हणतात ना, ‘हिंमत ए मर्दा तो मदद दे खुदा.’ प्रयत्न, चिकाटी आणि जिद्द असेल तर तुम्ही कुठल्याही टप्प्यावर स्वतःच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकता. राजूने तरी हे करून दाखवले आहे. यासाठी कुठल्याही विद्यापीठाच्या सर्टिफिकेटची गरज नसते. गरज असते ती तुमच्यातील अतूट इच्छाशक्तीची.