एकाच दिवसात रिलायन्सच्या शेअर्सचे भाव खाली का उतरले? शेअर्सचे भाव खाली वर होणाचे हे टेक्निक समजून घ्या!!

काल रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्या अगोदरच्या चार दिवसात कंपनीच्या शेअरचे भाव वरवर चालले होते. काल जशी वार्षिक सर्वसाधारण सभा संपत आली तसे शेअरचे भाव पडायला सुरुवात झाली. आज सकाळी हा लेख लिहित असताना कालच्या २१४८ रुपयाच्या गच्चीवरून हा शेअर बर्याच पायर्या खाली उतरला आहे. गेल्या महिन्याभरात या शेअरचा भाव जवळजवळ ३०० रुपये वर गेला आणि काल एका दिवसात २% खाली आला.
नव्याने बाजारात आलेल्या 'बोभाटा'च्या वाचकांना असे झोके बघायची सवय नसेल तर त्यांना हे काय चाललंय हा प्रश्न नक्की पडला असेल. म्हणून या निमित्ताने भाव वरखाली जाण्याच्या कारणांची आपण थोडी चर्चा करू या. पण एक महत्वाची गोष्ट ! आजचा लेख केवळ शेअरबाजारापुरताच मर्यादीत आहे. रिलायन्स येत्या काही वर्षात काय करणार आहे हे समजण्यासाठी 'बोभाटा'चा विशेष लेख या पाठोपाठ येणारच आहे!
रिलायन्स ही शेअरबाजारातली एक खास कंपनी आहे. खास अशासाठी की या कंपनीचे दोन प्रकारचे गुंतवणूकदार आहेत. पहिल्या प्रकारात 'रिलायन्स लव्हर्स' आहेत. त्यांना रिलायन्स कंपनीची कोणतीही घडामोड सकारात्मकच आहे याची खात्री असते. दुसर्या प्रकारात 'रिलायन्स हेटर्स' आहेत. या प्रकारातल्या गुंतवणूकदारांना रिलायन्सची प्रत्येक हालचाल संशयास्पदच वाटत असते.असे 'लव्हर्स आणि हेटर्स' प्रत्येक कंपनीच्या नशिबात लिहिलेले असतात, पण रिलायन्सच्या बाबतीत हे विशेष महत्वाचे आहेत. कारण, त्यांच्या भागधारकांची संख्या प्रचंड मोठी आहे. रिलायन्सच्या एकूण ६७६ कोटी समभागांपैकी अर्धे समभाग 'पब्लिक' कडे आहेत.
जेव्हा वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख नक्की होते तेव्हा 'लव्हर्स' समभाग विकत घ्यायला सुरुवात करतात. कंपनी यावर्षी जास्तीतजास्त लाभांश देणार आहे, बोनस शेअर देणार आहे अशा चर्चा सुरु होतात. जेव्हा 'लव्हर्स' शेअर विकत घेतात तेव्हा त्यांच्यासोबत 'हेटर्स'पण खरेदीला सुरुवात करतात. पण उद्देश एकच असतो, 'हवा' निर्माण करायची आणि बाजारभावाने अपेक्षित पातळी गाठली की विक्रीकरून नफा जमा करायचा. बाजारभाव वरखाली होण्यामागे हे एक कारण असते.
पण हे कारण गुंतवणूकदारांपुरतेच मर्यादित असते. बाजारात सगळेच गुंतवणूकदार नसतात. बाजारात 'ट्रेडर्स' नावाची एक जमात असते. ज्यांना वरखाली होणार्या भावांचा फायदा घ्यायचा असतो. हे ट्रेडर्स कंपनीच्या प्रेमात पडत नाहीत किंवा कंपनीचे दुश्मन पण नसतात. त्यांच्या व्यवहाराचे तंत्राला 'Buy the Rumor, Sell the News' Strategy म्हटले जाते
हे समजण्यासाठी गेल्या मौसमात लग्न झालेल्या जोडप्याचे उदाहरण घेऊ या. लग्नाला वर्ष होत आले आहे आणि ती 'गुड न्युज' कन्फर्म झाली आहे. 'गुड न्युज' सुरुवातीला फक्त त्या जोडप्यालाच माहिती आहे. नंतरच्या टप्प्यात ती दोन्ही बाजूंच्या पालकांना मिळते. नंतरच्या महिन्यात जवळच्या नातेवाईकांना कळते. दोघांच्या खास मित्रमैत्रीणींना कळते. पुढच्या काही महिन्यात' गुड न्यूज' दिसायला लागली की सर्वांनाच कळते. त्यांना सल्ले दिले जातता- त्यांना मदत केली जाते- काळजी घेतली जाते. म्हणजेच दोन माणसांपासून सुरुवात होऊन बातमी हळूहळू सार्वजनीक होते. सगळेच लोक त्या बातमीसोबत 'कनेक्ट' होतात. त्यातल्याच एका दिवशी बाळ जन्माला येते आणि बातमीशी जोडलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. पण बाळाच्या जन्माच्या दुसर्या दिवशी जर हॉस्पीटलमध्ये गेलं तर आई -बाळ आणि एक केअरटेकर या खेरीज कोणीही तिथे नसतं. कारण सोप्पं आहे, ज्या बातमीची अपेक्षा होती ती पूर्ण झाली आहे. आणि बातमीशी संबंधित सर्वजण आपापल्या मार्गाला लागलेले आहेत.
शेअर बाजारात असेच घडत असते अपेक्षेवर भाव वाढतात आणि बातमी आली की भाव खाली येतात. ट्रेडर्स याच हालचालीचा फायदा घेतात. बाजाराच्या अपेक्षेसोबत खरेदी करतात आणि बातमी आली की ताबडतोब विक्री करतात. हे सगळ्याच कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी घडत असते. सुरुवातीला ज्या पातळीवरून भाव वाढत जातात त्याच पातळीवर येऊन उभे राहतात.
बर्याच वेळा असेही घडते की बातमी आल्यावर काहीच दिवसात सुरुवातीच्या पातळीपेक्षाही भाव खाली कोसळतात. हे असे होण्याच्या कारणाला 'ट्रेडर्स रिमोर्स' असे म्हणतात. अपेक्षेवर वाढ वाढतात पण आलेली बातमी त्या अपेक्षेपेक्षाही वाईट असली की हातात असलेले सौदे आणखी महाग वाटायला लागतात. आतापर्यंत अपेक्षेवर कमाई करण्यासाठी खरेदी करणारे ट्रेडर्स या पातळीवर विक्री करून आणखी नफा कमावतात.
आता रिलायन्स इंडस्ट्रीचा एका महिन्यात वाढलेला भाव एका दिवसात का कमी झाला हे कळले असेलच. पण 'पिक्चर अभी बाकी है दोस्त ' इतकेच आज म्हणूया. जेव्हा तुम्ही आम्ही २०२१चा विचार करत असतो तेव्हा रिलायन्स सारख्या कंपन्या २०४१चा विचार करत असतात. कसे ते समजून घेऊ या पुढच्या भागात !