९१ वर्षांत एक संपूर्ण समुद्र जगाच्या नकाशावरून नाहीसा कसा झाला? या मृत समुद्राची कहाणी विचार करायला भाग पाडेल!!

पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे आणि याचे अनेक दूष्परिणाम अलीकडे मोठ्याप्रमाणावर दिसून येऊ लागले आहेत. वरचेवर येणारे पूर, पावसाचे बिघडलेले वेळापत्रक असो की, अमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग किंवा आता भेडसावत असलेली प्रचंड उष्णतेची लाट, या सगळ्या गोष्टी याचेच तर संकेत देत आहेत. हे तर काहीच नाही, पण अशाच पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे आशिया खंडातील एका देशात तर चक्क अख्खा समुद्रच आटून गेला आहे. जगाच्या नकाशावरून हा समुद्रच गायब झाल्याचे पाहून संशोधक आणि शास्त्रज्ञांनाही धक्का बसला आहे. आता हा समुद्र कोणता आणि मानवी हस्तक्षेपामुळे तो कसा जगाच्या नकाशावरून नाहीसा झाला, हे जाणून घ्यायचे असेल तर हा संपूर्ण लेख नक्की वाचा.
जगाच्या नकाशावरून नाहीशा झालेल्या या समुद्राला ‘एरल सी’ या नावाने ओळखले जात होते. कझाकस्तान आणि काराकल्पकस्तान (उझबेकिस्तानचा नुकताच स्वतंत्र झालेला भाग) या दोन देशांच्या मध्ये असणारा हा समुद्र म्हणजे खरे तर एक मोठा गोड्या पाण्याचा तलाव होता. आकारमानानुसार जगातील चौथ्या क्रमाकांकाचा हा तलाव खरे तर समुद्राएवढाच अथांग होता. समुद्रात असतात त्यापेक्षाही जास्त बेटे या तलावात होती. तब्बल १५०० बेटांना सामावून घेणाऱ्या या तलावाला म्हणूनच बेटांचा समुद्र असेही म्हटले जाई.
६७,००० स्क्वे. किमी. इतके क्षेत्रफळ असणाऱ्या या तलावाचे १०%ही अस्तित्व उरलेले नाही. आमु दर्या आणि सर दर्या अशा दोन नद्यांचे पाणी या ठिकाणी येऊन मिळत होते. कधीकाळी पाण्याने आणि जलजीवांनी समृद्ध असणाऱ्या या तलावाची शोकांतिका १९३० पासूनच सुरु झाली. या भागातील लोकांनी शेतीवर भर द्यायला सुरुवात केली. कापसाच्या उत्पादनावर भर देण्यात आल्याने पाण्याचा अधिकाधिक उपसा सुरू झाला.
पुढे १९५० साली सोव्हिएत युनियनने आणलेल्या कृषी धोरणानुसार या दोन्ही नद्यांचे पाणी त्यांच्या शेतीसाठी वळवण्यात आले. परिणामी या तलावात येणारे पाणीच कमी कमी होत गेले. याच तलावाच्या पाण्यावर कापूस, तांदूळ, कलिंगड, डाळी, अशा विविध पिकांची शेती केली जाऊ लागली. पाणी अडवण्यासाठी मोठमोठी धरणे, कालवे बांधण्यात आले. निकृष्ट दर्जाच्या या कालव्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होऊ लागली. आशियातील सगळ्यात मोठा क्वॅराम कॅनॉल याच तलावावर बांधला गेला आहे. पाण्याच्या ३० ते ७०% नासाडीला तर हाच एक कालवा पुरेसा होता असे म्हटले जाते. या सगळ्यांच्या एकत्रित परिणामाने, दिवसेंदिवस तलावातील पाण्याची पातळी खाली खाली जाऊ लागली. पाण्याच्या पातळीसोबतच या समुद्रातील जलजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले. सोबत दोन्ही काठावर राहणाऱ्या मच्छिमारांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
१९६० – १९९८ या कालावधीत या समुद्र ६०% इतका आटला होता. या एवढ्या मोठ्या तलावाच्या दुखण्याकडे वेळीच लक्ष दिले गेले असते तर पुढचे गंभीर परिणाम टाळता आले असते. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. यानंतरही या तलावाचे क्षेत्रफळ कमी कमीच होत गेले. आता तर या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की इथे कधी काळी समुद्रासारखा भला मोठा तलाव होता हे कुणाला सांगूनही पटणार नाही. या तलावाचे चक्क दोन तुकडे पडले आहेत आणि याच्या दक्षिणेकडील भागात जेमतेम पाणी टिकून आहे. तर, उत्तरेकडील भाग पूर्णतः कोरडा झालेला आहे.
आटलेल्या या तलावामुळे भौगोलिक बदल तर झालेच आहेत पण, मासेमारी व्यवसायाला आणि या व्यवसायावर तगून राहिलेल्या जनतेच्या आर्थिकस्थितीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. कधीकाळी तब्बल ४०,००० लोकांना रोजगार पुरवणारा तलावच नाहीसा झाला आहे. यावरून याचे दुष्परिणाम किती व्यापक असतील याची कल्पनाच केलेली बरी. कधीकाळी पाण्यावर स्वार होणाऱ्या नौका आता गंज खात पडून आहेत. माणसांचे सोडाच, पण या पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढल्याने मासे आणि त्यातील इतर जलचरांसाठीही हा तलाव आता धोकादायक बनला आहे.
कारखान्यांचे सांडपाणी, शस्त्रास्त्रांची चाचपणी, शेतातून येणारा रसायन खतांचा गाळ, या सगळ्या कृत्रिम घटकांनी जलचरांचा नैसर्गिक अधिवासच संपवून टाकला आहे. तलावातील पाण्यात आता फक्त क्षार आणि विषच पसरलेले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी जे लोक याच तलावावर अवलंबून होते त्यांचीही खूप मोठी दैना झाली आहे. दोन देशांना जोडणारा हा भला मोठा तलाव असा आटून गेल्याने किती लोकांना याचा फटका बसला असेल याची कल्पनाही करणे शक्य नाही.
त्यात भर म्हणून या परिसरातील लोकांना कॅन्सर, फुफ्फुसाचा आजार, श्वसनाचे विकार, पचनसंस्थेचे विकार, विविध संसर्गजन्य रोग अशा अतिरिक्त प्रश्नांनी ग्रासले आहे.
१९९१ साली उझबेकिस्तानला सोव्हिएत रशियाकडून स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांतर उझबेकिस्तानने आपल्या या समस्येवर काम करण्यास सरुवात केली. उझबेकिस्तान सोबतच कझाकस्तान आणि कराकल्पकस्तान मधील सरकारनेही या तलवाच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. हे सगळे देश कधीकाळी रशियाचे गुलाम होते. त्यांना आता स्वातंत्र्य मिळाल्याने स्वतःच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आता कुठे ते सक्षम झाले आहेत. कझाकस्तान, ताझिकिस्तान, किर्गीझिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि कराकाल्पकस्तान या देशांनी आता हा समुद्रच दत्तक घेतला आहे. या समुद्राला जीवनदान देण्यासाठी या देशांनी एरल समुद्र खोऱ्याचे पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला जागतिक बँकेनेही अर्थसहाय्य दिले आहे.
या परिसरातील पर्यावरणाचे पुनरुज्जीवन करणे आणि या समुद्रालाही जीवनदान देणे हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. या तलावावर विसंबलेल्या शेतीला आणि इतर उद्योगांची पुन:उभारणी करण्याचेही आव्हान हा देशांसमोर आहे. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून या प्रकल्पाला यश येईल आणि पुन्हा एकदा या समुद्राला आपले गतवैभव प्राप्त होईल अशी अशा करण्यास हरकत नाही.
माणूस निसर्गापेक्षा मोठा नाही हा धडा आता तरी माणसाने शिकला पाहिजे, तुम्हाला काय वाटते?
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी
आणखी वाचा:
प्लास्टिकमुळे नाही तर चक्क या गोष्टीमुळे होत आहे समुद्र सर्वाधिक दूषित!!