अमेरिकेने आपल्याच भूमीवर २१ टन वजनी अणूबॉंब का टाकला होता?

शत्रू राष्ट्रापासून आपल्या राष्ट्राचे संरक्षण करणे हे लष्कराचे आद्यकर्तव्य असते. प्रत्येक देशाला आपल्या लष्कराचा अभिमान असतो. कारण, प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हे सैनिक आपल्या जनतेचे रक्षण करतात. अमेरिकेचे सैनिक तर आपल्या आणि इतर देशाच्याही नागरिकांच्या रक्षणासाठी झटत असतात. पण एकदा अशी काही आगळीक घडली की अमेरिकन लष्कराने आपल्याच देशातील एका मोठ्या राज्यावर अणूबॉंब टाकला होता. आपल्याच देशावर अणूबॉंब टाकणारा अमेरिका हा पहिलाच देश असेल, पण अमेरिकेन लष्कराने अशी आगळीक का केली असेल? तेच तर आम्ही या लेखातून सांगणार आहोत.
अमेरिकेने आपल्याच देशात टाकलेला हा बॉंब काही साधासुधा बॉंब नव्हता तर व्हेल माशाच्या आकाराचा आणि साडे चोवीस फुट लांबीचा हा आजवरचा सर्वात शक्तिशाली असा हायड्रोजन बॉंब होता. हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने जे बॉंबटाकले त्यापेक्षाही या बॉंबची ताकद सहाशे पट अधिक होती. हिरोशिमा आणि नागासाकीवर अणूबॉंबने फक्त एक मैल त्रिज्येच्या परिघातील क्षेत्राची हानी झाली होती. तर या अणूबॉंबमध्ये दहा मैल त्रिज्येचा परिसर व्यापण्याची क्षमता होती. म्हणजे फक्त शहरच नव्हे तर संपूर्ण राज्यही या अणूबॉंबने उध्वस्त करता येऊ शकेल इतपत शक्तिशाली असलेल्या या अणूबॉंबचे नाव आहे मार्क-१७ (मार्क सेव्हेंटीन)
२२ मे १९५७ रोजी अमेरिकन लष्करातील ‘बी-३६ पिसमेकर’ या बॉंबर विमानाच्या तुकडीला टेक्सास वरून हा अणूबॉंब न्यू मेक्सिकोतील आल्बुकर्की या लष्करी तळावर हलवण्याचे आदेश देण्यात आले होते. लष्करी शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी वेगळी आणि अधिक सुरक्षित विमाने वापरण्यात येतात. मार्क-१७ साठीही अशाच एका अतिसुरक्षित विमानाची तजवीज करण्यात आली होती. त्यातही बॉंब सुरक्षित राहावेत आणि वाहतूक करताना त्यात कोणतीही गफलत होऊ नये म्हणून न्युमोनिक सिस्टीम आणि बॅकअप लॉकिंग पिन अशी दुहेरी संरक्षण पद्धत वापरली जाते, तशी ती मार्क-१७ साठीही वापरली गेली होती. न्युमोनिक सिस्टीम हटवून त्याची बॅकअप लॉकिंग पिन काढली तरच हा बॉंब विमानातून खाली पडू शकतो, अन्यथा नाही.
ही न्युमोनिक सिस्टीम कशी हटवायची आणि त्याला असलेली बॅकअप लॉकिंग पिन कशी काढायची याच्याही काही स्टेप्स ठरलेल्या असतात. त्यानुसारच हा बॉंब विमानातून काढता येऊ शकतो. अशी सगळी खबरदारी घेतलेली असतानाही या विमानावरील एका क्रु मेंबरच्या छोट्याश्या चुकीमुळे शक्तिशाली मार्क-१७ विमानातून खाली पडलाच. आपल्याच सैनिकाकडून अनावधानाने झालेल्या या गंभीर घटनेबाबत त्याकाळी अमेरिकन सरकारने चकार शब्दही उच्चारला नाहीत, उलट त्यांनी कित्येक दशके हे सत्य जगापासून लपवून ठेवले होते. एका अमेरिकन न्यूज चॅनेलने माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीतून ही घटना उघड झाली.
त्या दिवशी ज्या विमानातून हा बॉंब नेण्यात येत होता त्या विमानातील क्रु मेंबर बॉब कॉर्पच्या हातून झालेल्या एका चुकीमुळे हा अपघात घडला होता. विमान सतराशे फूट उंचावरून उडत असताना बॉब विमानाच्या बॉंब ठेवलेल्या भागात गेला, ज्याला ‘बॉंब बे’ म्हटले जाते, तिथे गेला. विमानाने हवेत गिरकी घेतली आणि त्याबरोबर इकडे बॉबचाही तोल गेला आणि तो जाऊन त्या बॉंबवरच आदळला ज्यामुळे बॉंबला लावलेली बॅकअप पिन आपोआप निसटली. स्वतःचा तोल सावरण्यासाठी बॉबने एका फळीचा आधार घेतला आणि नेमकी ती फळी म्हणजे तो तराफा होता ज्याच्या सहाय्याने बॉंब उचलला जाणार होता.
(‘बी-३६ पिसमेकर’ बॉंबर विमान)
बॉबने त्या तराफेवर पाय टेकवताच तराफेने आपले काम केले आणि बॉंब विमानापासून सुटा होऊन खाली पडला. २१ टन वजनाचा तो बॉंब खाली पडताच विमान हलके झाले आणि विमानाने अधिक वेगाने आकाशाकडे झेप घेतली. हा वेग इतका अधिक होता की, एका सेकंदात विमानाने हजार फुटाची उंची गाठली. गोंधळलेला बॉब फक्त ‘मी काही नाही केले,’ इतकेच ओरडू शकला. तोपर्यंत बॉंब मेक्सिकन युनिव्हर्सिटीच्या गायरान जमिनीवर जाऊन आदळला होता.
अर्थात, त्यावेळी बॉंबमध्ये विस्फोटक पदार्थ नसल्याने बॉंबचा स्फोट झाला नाही. मात्र इतक्या उंचावरून इतकी जड वस्तू खाली पडल्याने त्याठिकाणी १२ फुट खोल आणि २५ फुट व्यासाचा खड्डा तयार झाला.
अणुबॉंबचा स्फोट घडवून आणण्यासाठी त्यात आधी प्लुटोनियम सारखा किरणोत्सर्ग घडवून आणणारा धातू पुरेशा प्रमाणात साठवावा लागतो. खबरदारी म्हणून विमानातून बॉंबची वाहतूक करताना त्यातील असे स्फोटक पदार्थ आधीच काढून वेगळे ठेवले जातात. म्हणूनच इतका शक्तिशाली बॉंब पडूनही याची कुणालाही कानोकान खबर लागली नाही.
विमानातील क्रु मेंबर्सनी झालेल्या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब कळवली. माहिती मिळताच आल्बुकर्की तळावरील अधिकारी मेक्सिको युनिव्हर्सिटीच्या भागात आले आणि त्यांनी हायड्रोजन बॉंबचे तुटलेले सगळे अवशेष गोळा करून लष्करी तळावर नेले. वरून या अधिकाऱ्यांनी विमानातील क्रु मेंबर्सना जे काही झाले त्या प्रकाराबद्दल पूर्णतः गोपनीयता पाळण्याची शपथ घ्यायला लावली. त्यामुळेच बराच काळ ही घटना पडद्याआडच राहिली.
१९८१ साली जेव्हा अमेरिकन सरकारने आपली काही गोपनीय कागदपत्रे उघड केली तेव्हा कुठे ही घटना जगासमोर आली. काहीही असो, पण अनावधानाने घडलेल्या या प्रसंगातून अमेरिका सहीसलामत वाचली हे सुदैवच म्हणावे लागेल नाही का?
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी