अवघ्या २३ वर्षांचा इंजिनियर जुन्या कार्सना इलेक्ट्रिक कारमध्ये कसे बदलतोय? ताडपोल प्रोजेक्ट्स आहे तरी काय?

इलेक्ट्रिक कार्स भविष्य आहेत हे एव्हाना स्पष्ट होऊ लागले आहे. भारतात इलेक्ट्रिक मोटरसायकल मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर दिसू लागल्या आहेत. मोठ्या कंपन्या आता इलेक्ट्रिक बाईक आणि कार्स बनिवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल विशेष गोष्ट म्हणजे अनेक मोठे गॅरेज तसेच तज्ञ इंजिनियर्स हे स्वतःच इलेक्ट्रिक गाड्या बनवू लागले आहेत. पुढे जाऊन कार्स आणि बाईक बनविणे ही मूठभर कंपन्यांची मक्तेदारी राहणार नाही असेच हे चित्र आहे. मात्र जम्मूच्या एका इंजिनिअरचे काम मात्र इतरांपेक्षा वेगळे आणि तितकेच भन्नाट आहे.
आपल्याकडे टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना खूपच लोकप्रिय आहे. मोहम्मद जवाद खान हा मूळ जम्मूचा आणि सध्या दिल्लीत असलेला २३ वर्षीय इंजिनिअर आपल्या ताडपोल प्रोजेक्ट्स या स्टार्टअप मार्फत जुन्या कार्सना इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बदलण्याचे काम करत आहे. जवादने गेल्या वर्षी जून महिन्यात आयआयटी दिल्ली येथील सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर रिसर्च ऑन क्लीन एयर यांच्या साहाय्याने हे काम सुरू केले आहे.
त्याच्या स्टार्टअपकडून आधीच फॉक्सवॅगन बीटल आणि ऑस्टिन १० या गाड्या इलेक्ट्रिक कार्समध्ये बदलण्यात आल्या आहेत. जवाद सांगतो की, "देशात इलेक्ट्रिक गाड्या वाढाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. पण त्यासाठी नव्या गाड्या रस्त्यावर आणण्याची गरज नाही. आम्ही यासाठी शाश्वत आणि स्वस्त उपाय तयार करत आहोत. त्याचप्रमाणे आमच्या या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या गाड्या चालवताना जुन्या इंजिनच्या गाड्या चालविण्याचा आनंद लोकांना घेता येणार आहे."
जवादने आपली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पंजाब येथे असलेल्या स्वामी विवेकानंद ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथून पूर्ण केली. २०१९ साली त्याने तब्बल १५ महिने फक्त हाय स्पीड इलेक्ट्रिकल गाडी तयार करण्यात घालवले आणि ताशी १०० किमी वेगाने चालणारी गाडी तयार करून दाखवली. फॉक्सवॅगन बीटलला इलेक्ट्रिकल गाडीमध्ये बदलण्यासाठी त्याला आणि त्याच्या टीमला ६ महिने एवढा वेळ लागला आहे.
या गाड्या तयार करत असताना ते जुने इंजिन बदलून त्यात १५ किलोवॅट इलेक्ट्रिक मोटर टाकतात. या मोटरमुळे कारला ताशी ६० किमी एवढा वेग मिळू शकतो. या टीमकडून जुन्या गाडीचे ९०% पार्टस हे जसेच्या तसे ठेवले जातात. या बदललेल्या गाड्यांत लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी या गाडीत वापरले जातात आणि त्या बॉनेटखाली व्यवस्थित ठेवलेल्या असतात.
या तयार झालेल्या गाड्या एकदा फुल चार्ज केल्या की त्या जवळपास १५० किलोमीटर अंतर पार करतात आणि बॅटरी पूर्णपणे चार्ज व्हायला ६ तास लागतात.
सध्याचा काळ जरी कठीण वाटत असला तरी देशात असलेल्या अशा महत्वाकांक्षी हुशार युवकांमुळे उद्याचा काळ हा नक्की चांगला असेल अशी आशा बाळगता येईल असे हे चित्र आहे.