एकाच वेळी ९०० लोकांनी सामूहिक आत्महत्या का केली? या प्रकारातून बचावलेल्या एकमेव व्यक्तीने काय अनुभव सांगितले?

बुवा बाबांचे मठ, आणि या बाबांच्या सांगण्यावरुन जीवही द्यायला तयार असणारे त्यांचे अंधभक्त फक्त आपल्याच देशात पाहायला मिळतात असे नाही ,तर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असे प्रकार सर्रास सुरू असतात. बलाढ्य देश आणि महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही अशा प्रकारांना अजिबात तोटा नाही.
१८ नोव्हेंबर १९७८ साली अमेरिकेच्या पीपल्स टेम्पल या चर्चच्या धर्मगुरूच्या आदेशावरून सुमारे ९०० लोकांनी सायनाइड पिऊन आत्महत्या केली होती. या चर्चचा प्रमुख धर्मगुरू जिम जोन्सने १८ नोव्हेंबरच्या सकाळी अचानकच आपल्या सर्व भक्तांना प्रार्थनेसाठी एकत्र बोलवले आणि त्यांना आपल्या आयुष्याचा शेवट जवळ असल्याचे सांगितले. चर्चच्या भवितव्यासाठी येथे जमलेल्या सर्व लोकांनी सायनाइड पिऊन स्वतःला संपवणे हे धर्मकार्य असल्याचे प्रवचन त्याने दिले आणि त्याच्या शब्दावर श्रद्धा असणाऱ्या त्याच्या सर्व भक्तांनी त्याचे अनुकरण करत सायनाइड पिले. फक्त आपण पिले असे नाही, तर स्वतः पिण्याआधी आपल्या मुलांनाही पाजले. त्या दिवशी त्या चर्चमध्ये जे कुणी उपस्थित होते त्या सर्वांचा मृत्यू झालाच पाहिजे असे कदाचित आधीच ठरले होते की काय अशीही शंका या घटनेनंतर व्यक्त करण्यात आली होती. या मागचे सत्य शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण तरीही ९०० लोकांमध्ये एकालाही या प्रकाराला विरोध करण्याचे का सुचले नाही की तसे करूच का दिले नाही हे गूढ आजही कायम आहे.
जिम जोन्सहा एक गोरा धर्मगुरू असला तरी आपल्या चर्चमधून तो समानता आणि बंधुतेची शिकवण देत असे. या चर्चमध्ये येणाऱ्या अनेक रुग्णांचे दुर्धर आजार बरे होत असत. अनेकांना त्यांच्या व्यक्तिगत समस्येतून मुक्ती मिळाल्याचा दावा करणारेही बरेच भक्त या चर्चला लाभले होते.
जिम जोन्सच्या सांगण्यावरून त्या दिवशी सर्वांनी सायनाइड पिले असले तरी एका व्यक्ती मात्र या सामूहिक आत्महत्येच्या प्रकारातून सहीसलामत बचावली होती. तिचे नाव होते हायसिंथ थ्रॅश. हायसिंथ आणि जिम जोन्सची पहिली भेट झाली तेव्हा हायसिंथ ५२ वर्षांची होती. तिची बहिण झिप ही जिम जोन्सच्या चर्चची सदस्य होती. जिम जोन्सकडे रुग्णांचे दुर्धर आजार बरे करण्याची शक्ती होती असा हायसिंथ आणि तिच्या बहिणीचा विश्वास होता. हायसिंथलाही स्तनाच्या कर्करोगासारख्या दुर्धर आणि जीवघेण्या आजारातून जोन्सनेच बरे केले असा तिचा दावा होता. जोन्सच्या चर्चचे मुखपत्र असलेल्या 'द इंडियानापोलीस स्टार' नावाच्या वृत्तपत्रातून अशा कित्येक कहाण्या त्याकाळी छापून येत असत. या कथा वाचूनच सामान्य लोक या चर्चकडे आकर्षित होत असत.
ज्या दिवशी सामुहिक आत्महत्येचा तो नृशंस प्रकार घडला त्यादिवशी हायसिंथलाही सायनाइड देण्यात आले होते. पण हायसिंथने सायनाइडची ती बाटली आपल्या उशाला ठेवली आणि ती झोपी गेली. हायसिंथला त्यादिवशी इतकी गाढ झोप लागली होती की त्यानंतर तिला दुसऱ्याच दिवशी जागी झाली. हायसिंथ उठून पाहते तर काय, कालपर्यंत ज्यांच्यासोबत ती या चर्चमध्ये गुण्यागोविंदाने राहत होती त्या सर्वांचे मृतदेह चर्चच्या आवारात पसरले होते. हे सगळे मृतदेह कपड्यात गुंडाळून कुठे तरी नेले जात होते. मृतदेहांच्या त्या राशीत कित्येक चिमुकली मुले आणि तिची बहिण झिप देखील होती.
जोन्स स्वतः देखील आत्महत्या करुन मरून पडला होता.
जोन्सने आपल्या भक्तांवर हे कृत्य लादले होते. त्याला कुणीतरी आपला पाठलाग करत आहे किंवा आपल्या कृत्यावर डोळा ठेवून आहे अशी भीती होती. सामुहिक आत्महत्येची ही घटना घडण्यापूर्वी काही दिवस जोन्सच्या भक्तांनी एका अमेरिकन संसद सदस्याची हत्या केली होती. यानंतर अचानक जोन्सला शोध लागला की हे सगळेच जग नष्ट होणार आहे. १८ नोव्हेंबरच्या त्या सकाळीही तो आपल्या भक्तांना हेच सांगत होता.
हायसिंथ एक कृष्णवर्णीय स्त्री होती. तिचा जन्म १९०५ साली अलाबामामध्ये झाला. ती तेरा वर्षे अलाबामामध्ये राहिली, पण कृष्णवर्णियांचा होणारा छळ आणि त्यांची सामूहिक हत्या पाहून तिने आणि तिच्या बहिणीने अलाबामा सोडायचा निर्णय घेतला. त्याकाळी इंडियानापोलीस हे शहर सर्व दृष्टीने सुरक्षित शहर असल्याचे मानले जाई. या शहरात राहायला आल्यानंतरच दोघी बहिणी जिम जोन्सच्या संपर्कात आल्या. हायसिंथने तर जोन्सच्या चर्चसाठी स्वतःचे घर विकून मिळालेले ३५,०००डॉलर्स दान केले होते. ही चांगलीच मोठी रक्कम होती. त्यानंतर जोन्सने दक्षिण अमेरिकेतल्या गायाना देशात स्वतःच्या नावाचे एक जोन्सटाउन नावाचे शहर वसवले आणि त्याचे अनेक भक्त त्याच्यासोबत या चर्चमध्येच राहत असत. हायसिंथ आणि झिप दोघीही सगळे त्याच्यामागे तिथेच राहायला गेले.
ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून आपण इथे आलो तो असा सर्वांच्याच जीवावर उठेल याची हायसिंथला जराही पूर्वकल्पना आली नाही. या घटनेनंतर हायसिंथ १९८२साली इंडियानापोलीस येथे परत आली. आपले शेवटचे दिवस तिने इथल्या माउंट झियोन गेरीॲट्रिक सेंटर येथे घालवले. १९९५ साली वयाच्या ९०व्या वर्षी तिचे निधन झाले.
जोन्सने अशाप्रकारे सर्वांचा जीव का घेतला याची हायसिंथला अनेक वर्षे चीड होती. नंतर मात्र तिने हा झाला प्रकार विसरून त्याला माफ केल्याचे जाहीर केले. कारण आपल्या अखेरच्या प्रवासात आपण कुणाबद्दल अशी अढी ठेवता कामा नये असे तिचे मत होते. मानवी कृत्यामुळे इतक्या लोकांचा एकत्र बळी गेल्याची अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. आजही “जोन्सटाऊन मास स्युसाईड” नावाने ही घटना ओळखली जाते. या घटनेने अमेरिकेला बसलेला धक्का कदापीही विसरण्याजोगा नाही.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी