तिरळेपणाचा संबंध केवळ बाह्यरूपाशी नाही. त्यामुळे इतर दुष्परिणाम होत असल्याने आयुष्याच्या दर्जाचाही त्याच्याशी संबंध आहे. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार केलेले चांगले. नाही का?

अनेकदा तिरळ्या लोकांना उद्देशून 'कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना' या गाण्याच्या ओळी विडंबनात्मक अर्थी वापरल्या जातात. अशा प्रकारे कुणाला हिणवणे चुकीचे असले तरी तिरळेपणा हा विषय एकंदर थट्टेचा मानला जातो. पण अशा लोकांनी काळजी करू नका. यावर उपाय आहे आणि त्यांच्या मदतीने तिरळेपणा पूर्णपणे नष्ट करता येतो. पण मुळात काही लोकांच्या बाबतीतच हा विकार का निर्माण होतो? तो कायमस्वरूपी आहे का? त्यावर उपाय कोणते? हे पाहू.
सगळ्यात मुख्य प्रश्न, तिरळेपणा म्हणजे काय?
दोन्ही डोळ्यांंपैकी एका डोळ्याचे बुब्बुळ समोर बघत असताना दुसऱ्याचे बाहेरच्या (कानाच्या) बाजूला, आतल्या (नाकाच्या) बाजूला, वर किंवा खाली बघणे म्हणजे तिरळेपणा. अर्थात ह्यात दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशांना बघतात. विशेषतः लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. यालाच काही लोक काणेपणा म्हणतात. हा विकार आपोआप बरा होत नाही, शिवाय त्यावर वेळेत उपचार न केल्याने डोळ्यांच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
तिरळेपणा होण्याची कारणे:
तिरळेपणा जन्मतः असू शकतो, आनुवंशिकतेने येऊ शकतो आणि अपघातामुळेही निर्माण होऊ शकतो.
स्नायूंंचे चुकीचे संतुलन, रिफ्रॅक्टिव्ह एरर (नेत्रभिंगाची गोलाई बदलणे), गोवरासारखे आजार, नर्व्ह पाल्सी (डोळ्यांच्या स्नायूंकडे संदेश वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंमध्ये बिघाड होणे), जवळचे अथवा लांबचे स्पष्ट न दिसणे हीदेखील त्यामागील कारणे आहेत.
तिरळेपणाचे निदान
मूल सतत तिरळे पाहत असेल, मूल ३ महिन्यांंपेक्षा जास्त वयाचे असेल आणि तरी तिरळेपणा कमी होत नसेल, मूल एकाच बाजूला डोके वळवत असेल किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहताना एक डोळा मिटून ठेवत असेल तर हे तिरळेपणाचे लक्षण असू शकते. भविष्यात अशा व्यक्तींंना डबल व्हिजनचा धोका संभवतो. मुलांमधला तिरळेपणा किती टक्के आहे, नंबर काढण्यासाठी केलेली टेस्ट इ. चाचण्यांद्वारे तिरळेपणा ओळखून निदान केले जाते.
तिरळेपणा कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी अनेक उपाय आहेत.
तिरळेपणावरचे उपाय
१. तज्ञांच्या सल्ल्याने योग्य नंबरचा चष्मा वापरणे. जर मुलाला लांबचे दिसत नसल्याने तिरळेपणा आला असेल तर चष्मा वापरल्याने तो कमी होतो.
२. डोळ्यांच्या स्नायूंचे विविध व्यायाम नियमितपणे करणे हाही एक प्रभावी उपाय आहे. या व्यायामानं दोन्ही डोळ्यांची एकत्र काम करण्याची क्षमता वाढते.
३. अजून एक खात्रीचा उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. यात स्नायूंंच्या चुकीच्या हालचाली दुरुस्त केल्या जातात. किती वेळा ही शस्त्रक्रिया करावी लागेल हे डोळ्यांच्या तिरळेपणाच्या प्रमाणावरून ठरते.

४. डोळ्यांतील स्नायूंंमध्ये इंजेक्शन देणे हाही एक उपाय आहे. याद्वारे डोळ्यांतील स्नायू कमकुवत करून त्यांना एका रेषेत आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण या उपचाराचा परिणाम जास्तीत जास्त 3 महिने राहतो.
५. लेझी आय (एका डोळ्याची क्षमता कमी असणे) ही समस्या असल्यास तिरळेपणा दुरुस्त करताना आधी लेझी आय वर उपचार करावे लागतात. यामध्ये दृष्टिदोष कमी करून अधिक चांगल्या कार्यक्षमतेसाठी निरोगी डोळ्यापुढे पॅच वापरला जातो, जेणेकरून दुसऱ्या डोळ्याची क्षमता सुधारते.
तिरळेपणाचा संबंध केवळ बाह्यरूपाशी नाही. त्यामुळे इतर दुष्परिणाम होत असल्याने आयुष्याच्या दर्जाचाही त्याच्याशी संबंध आहे. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार केलेले चांगले. नाही का?
स्मिता जोगळेकर