पाकव्याप्त जम्मु-काश्मीर भाग १: पाकव्याप्त काश्मीर म्हणजे फक्त आझाद काश्मीर?

पाकिस्तानच्या कब्जात असलेल्या आपल्याच भागाबद्दल आपल्याला किती माहिती आहे? चला जाणून घेऊया त्याबद्दल.
पाकव्याप्त जम्मू-काश्मिर म्हणजे पाकिस्तान ज्याला 'आझाद काश्मिर' म्हणते तेव्हढाच भाग का? यातील सगळा भाग पाकिस्तानने किंवा तथाकथित पठाणी टोळ्यांनी युद्धात जिंकला आहे का? नाही. हा तेव्हढाच भाग नाही! कसे ते समजून घ्यायला इतिहासात डोकावूयात.
ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा राजा हरीसिंग हा अख्ख्या जम्मू आणि काश्मिरचा राजा होता हे आता आपल्याला पाठ आहे. या राज्यात कोणते प्रमुख प्रांत होते? तर या मूळ राज्यात जम्मू प्रांत, काश्मीर प्रांत, गिलगिट प्रांत, बाल्टिस्तान प्रांत, लडाख प्रांत आणि अक्साई चीन प्रांत इतके भाग होते.
१५ ऑगस्ट रोजी भारत, पाकिस्तान हे देश जन्माला आले खरे पण जम्मू आणि काश्मिरने स्वतंत्रच रहायचे ठरवले होते. अर्थातच त्यांना ते झेपले नाही आणि तथाकथित 'पठाणी टोळ्यांनी' आक्रमण केले. त्यांनी हे आक्रमण फक्त काश्मिर प्रांतात केले होते. इतर प्रांतात नाही. हे आक्रमण झाल्यावर जेव्हा त्या टोळ्या श्रीनगरपाशी पोचल्या तेव्हा नाईलाजाने २६ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतात समाविष्ट होण्याच्या करारावर राजा हरिसिंग यांनी स्वाक्षरी केली.
मात्र तोवर या टोळ्यांनी जम्मू-काश्मिरचा बराच भाग बळकावला होता. भारतीय सैन्याने मोठा पराक्रम गाजवत त्यातील बराच भाग पुन्हा जिंकला व टोळ्यांना बरेच मागे सारले. हे युद्ध चालू असतानाच अजून एक घटना घडली ती याच राज्यातील 'गिलगिट' आणि 'बाल्टिस्तान' भागात. हा भाग तेव्हा (व आताही) शियाबहुल भाग होता. त्यांना सुन्नी बहुल पाकिस्तानात जायचे नव्हते मात्र त्यांना भारतातही जाण्यात रस नव्हता. त्यांना स्वतंत्र रहायचे होते. मात्र हरिसिंगाने भारतात समाविष्ट होणे तेथील काही नेत्यांना रुचले नाही व ते बघून तेथील लोकांच्या मताचा आढावा न घेताच, तेथील सैन्य अधिकारी मेजर विल्यम ब्राऊन याने १ नोव्हेंबर रोजी तेथील गव्हर्नर 'घणसारा सिंग' यांच्या विरोधात बंड पुकारले व राजा 'शाह रईस खान' याला तेथील प्रमुख घोषित केले.
(वरच्या चित्रात तुम्ही एक दुर्मिळ छायाचित्र पाहताय. डावीकडे आहे १९४७मधील गिलगिटचा तात्पुरता प्रमुख शाह खान आणि उजवीकडे आहे बंड पुकारणार्यांचा म्होरक्या झालेला कॅप्टन विल्यम ब्राउन)
आधी स्वतंत्र रहायचे म्हणणार्या या शाह खानने भारताला गाफिल ठेवत थेट पाकिस्तानला शरण जात हा भाग पाकिस्तानच्या घश्यात घातला, अगदी एकही रक्ताचा थेंब न घालवता! ना तेथील सर्व नेत्यांची सहमती विचारली गेली ना तेथील सामान्य लोकांकडे विचारणा. या घडामोडी इतक्या जलद गतीने झाल्या की भारताला त्यात पडण्याची संधीही दिली गेली नाही. १६ नोव्हेंबरला पाकिस्तानने या भागाचा ताबा घेतला होता. या आतातायी बंडामुळे हा प्रांत अलगद पाकिस्तानच्या ताब्यात तर गेलाच - मात्र त्याने तेथील शिया नागरीकांच्या हालात भरच पडली आहे. या दगेखोरीने झालेल्या घटनेकडे भारताने नेहमीच पाकिस्तानची घुसखोरी म्हणून पाहिले आहे ते योग्यच म्हणायला हवे!