computer

सहारा वाळवंट आणि सौदीच्या भयानक उष्ण ठिकाणी चक्क हिमवर्षाव होतोय!! फोटोही पाहून घ्या..

२०२० पासून जगभर अनपेक्षित अशा बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि रोज दर काही दिवसांनी यात भरच पडत आहे. ज्या गोष्टींवर सामान्य व्यक्तींनी कधीही विश्वास केला नसता त्या गोष्टी राजरोज घडताना दिसत आहेत. मुंबईत इतकी थंडी पडेल हा विचार कुणीही केला नसेल. तसेच वाळवंटात बर्फ जमा होणे ही सुद्धा एक अशीच न पटणारी गोष्ट याची देही याची डोळा आपल्या पिढीला अनुभवायला मिळत आहे.

जानेवारी महिना जगभरात बऱ्याच भागांत थंडी घेऊन येतो. पण तरीही वाळवंटात थंडी हे समीकरण मात्र आजवर शक्य झालेले दिसले नाही. आफ्रिका आणि मध्य आशियात तापमान हे गोठणबिंदूच्या खाली आले आहे. याचा थेट परिणाम म्हणजे सहारा वाळवंटातील काही भागांत चक्क हिमवर्षाव होत आहे.

आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळूचे वाळवंट समजले जाते. या ठिकाणी बर्फ पडत आहे म्हटल्यावर लोकांना विचित्र वाटणे साहजिक आहे. या वाळवंटाजवळ मकाली नावाचे एक शहर आहे. हे शहर आणि वाळवंटाजवळ राहणाऱ्या इतर लोकांना यामुळे नेहमीच्या गरम वातावरणापासून मोठा दिलासा मिळत आहे.

सहारा वाळवंटाने उत्तर आफ्रिकेचा बहुतांश भाग व्यापला आहे. गेली काही हजार वर्षं हा भाग दमट तापमान अनुभवत आहे. वाळवंटी भागात कधीही तापमान कमी होऊ शकते हे कुणीही सांगेल, मात्र काही दिवसांपूर्वी ५८ अंश असलेले तापमान २ अंशावर येणे ही काही वैज्ञानिकांनी धोक्याची घंटा वर्तवली आहे.

सहारा वाळवंटातील ही घटना प्रसिद्ध फोटोग्राफर करीम बुचेटाटा यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. १८ जानेवारीला आफ्रिका खंडातल्या अल्जेरिया देशात एइन सेफ्रा भागात वाळूवर बर्फाची चादर अंथरली आहे असा नजारा दिसत होता. गेल्या ५० वर्षांत असे खूपच कमी वेळा घडले आहे. याआधी १९७९, २०१६, २०१८, २०२१ साली अशी घटना घडली होती आणि तीची आता २०२२मध्ये पुनरावृत्ती होत आहे.

अल्जेरियातला एइन सेफ्रा भाग हा सहारा वाळवंटाचा दरवाजा म्हणून ओळखला जातो. ही जागा समुद्र सपाटीपासून ३,००० फूट उंचावर आहे. गेल्या काही वर्षांत घडणाऱ्या घटना बघता येत्या १५,००० वर्षांत हा भाग पुन्हा हिरवागार होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याआधी भयानक उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियात वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या हिमवर्षावाने लोकांना हैराण केले होते. सौदीच्या उत्तर - पश्चिमी भागातील शहर ताबुक येथे निसर्गाच्या या अनोख्या अविष्काराचा मात्र लोक आनंड लुटताना दिसले आहेत. गेल्या वर्षी जेव्हा इथे बर्फ पडला होता, तेव्हा गेल्या ५० वर्षांतील तापमानाचे सर्व विक्रम मोडले गेले होते. सौदीच्या असिर या भागाने पहिल्यांदाच बर्फ पडणे अनुभवले होते. याच बरोबर इतर भागातही बर्फ पडला होता.

दोन वर्षांपासून लॉकडाऊन आणि त्याच्या अनुषंगाने न भूतो (देव करो) न भविष्यति गोष्टी अनुभवत आहोत, आता वाळवंटातला हिमवर्षावही पाहू. काय म्हणता?

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required