जगातले १० सर्वात वेगवान प्राणी!! यादी पाहा आणि तुमचे अंदाज कितपत बरोबर आले ते ही सांगा़!!

जगातला सर्वात वेगवान धावणारा प्राणी कोणता असे विचारल्यास ठराविक प्राण्यांची नावे आपण ऐकली असतील. जमिनीवर राहणारे सर्वात जलद प्राणी वेगवेगळ्या शारीरिक वैशिष्ट्यामुळे ओळखले जातात. म्हणून आज आम्ही सर्वात वेगवान प्राणी म्हणून ओळखले जातात अशा प्राण्यांची यादी घेऊन आलो आहोत.
१. चित्ता

चित्ता सर्वात वेगवान म्हणून आपण ऐकलेच असेल. चित्ता ३ सेकंदात ताशी९५ किमीपेक्षा जास्त वेगाने धावू शकतो. मांजरकुलातला हा प्राणी सर्वात चपळ म्हणून ओळखला जातो. काही परिस्थितीत ताशी १२० किमी या वेगाने देखील हा धावू शकतो. चित्त्याची शरीराची रचना, त्याचे लांब पाय यामुळे त्याच्या तावडीतून शिकार करताना भक्षक सहसा सुटत नाही.
२. प्रोंगहॉर्न

प्रोंगहॉर्न ही एक हरणाची जात आहे. याला अमेरिकन मृग किंवा उत्तर अमेरिकन खूर असलेला प्राणी देखील म्हणतात. फांद्यांसारखी शिंगे असणारा हा जगातला एकमेव प्राणी आहे आणि ही शिंगे झडून पुन्हा उगवून येणाराही हाच जगातला एकमेव प्राणी आहे. मराठीत अँटलर्स (antlers) आणि हॉर्न्स (horns) यासाठी शिंगे हा एकच शब्द आहे. या प्रोंगहॉर्न्सना शिंगे असतात, अँटलर्स नाही. ही शिंगे अँटलर्ससारखी झडून पुन्हा येऊ शकतात.
प्रोंगहॉर्न्स ताशी ७० किमी (४० मैल) वेगाने धावू शकतात. तसेच एका उडीत ६ मीटर (२० फूट) झेप घेऊ शकतात. प्रॉन्गहॉर्नची दृष्टीही अतिशय तीक्ष्ण असते. त्यामुळे दूरवर असलेला शिकारी प्राणी त्यांना लगेच दिसतो आणि वेगाने धावून स्वतःचे रक्षण करतात.
३. स्प्रिंगबोक

स्प्रिंगबोक हा सुद्धा हरणाचा प्रकार आहे. ही दक्षिण आफ्रिकेत आढळतात. स्प्रिंगबॉक्स ताशी ८८ किमी (५५ मैल) पर्यंत पळतात. हे एकेकाळी मोठ्या कळपात फिरत असत. परंतु आता त्याची संख्या कमी झाली आहे. त्यांच्या वेगाबरोबरच ते धावताना उंच उडीही मारतात. त्यांची उडी ३ मीटर इतकी उंच जाऊ शकते. त्यामुळे भक्षकांपासून त्यांचा बचाव होतो.
४. वाइल्डबीस्ट

वाइल्डबीस्ट हा बैलासारखा प्राणी पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत आढळतो. वाइल्डबीस्टच्या रंगामुळे दोन प्रजाती आहेत - ब्लू वाइल्डबीस्ट आणि ब्लॅक वाइल्डबीस्ट. याची शरीराची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. पुढच्या भागापेक्षा मागचा भाग हा हलका आहे. याचे पुढचे पाय मोठे आहेत, तर मागचे पाय तुलनेने लहान आहेत. हे ताशी ८० किमी धावण्यास सक्षम आहेत.
५. सिंह

जंगलाचा राजा सिंहाला म्हणले जाते. तो शक्तिशाली आहेच, पण त्याचबरोबर वेगाने धावून शिकार करण्यात पटाईत आहे. चित्ता हा लांब अंतरापर्यंत वेगाने धावतो, पण सिंह कमी अंतरावर सर्वात वेगाने धावतो. शिकार करताना दबा धरून भक्ष्यावर वेगाने हल्ला करताना सिंह दिसतो. ताशी ८० किमी वेगाने सिंह धावू शकतो.
६. काळवीट

काळवीट प्रामुख्याने दक्षिण आशियामध्ये म्हणजे भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळते. हे हरीण भारतातही खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते. हे हरिणांच्या कुरंग कुळातील प्रमुख हरीण आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असतो आणि मादी भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे नसतात.
तो ताशी ८० किमी वेगाने धावू शकतो. तसेच २ मीटरपेक्षा जास्त उंच उडी मारू शकतात. .
७. ससा (hare)

सामान्य सशांपेक्षा हे आकाराने मोठे असतात. यांचा रंग तपकिरी असतो. यांचे मागचे पाय लांब व जास्त शक्तिशाली असतात. त्यामुळे गवताळ प्रदेशात भक्षकांपासून वाचण्यासाठी ते वेगाने धावू शकतात. ताशी ८० किमी वेगाने ते पळू शकतात. सामान्य सशांप्रमाणेच या ससाला लांब कान असतात.
८. ग्रेहाउंड

ग्रेहाऊंड हे शिकारी कुत्र्यांच्या कुलातले प्राणी आहेत. त्यांना english Sourhounds ही म्हणतात. ग्रेहाउंड कुत्र्यांची खास रेसिंगसाठी पैदास केली जाते. यांची उंची सामान्य कुत्र्यांपेक्षा जास्त असते. तसेच शेपूट ही लांब असते. त्यांचे शरीर मागच्या भागात निमुळते होत जाते, त्यामुळे वेगाने धावणे त्यांना शक्य होते. त्यांचा सर्वाधिक वेग ताशी ७४ किमी आहे.
९. कांगारू

कांगारू हे मुखतः ऑस्ट्रेलिया आणि काही न्यू गिनी बेटांवर आढळतात. त्यांची लांब, भक्कम पाठ आणि शेपटी यामुळे ते वेगाने धावू शकतात. त्यांचा वेग ताशी ७१ किमी इतका नोंदविला गेला आहे.
१०. आफ्रिकन जंगली कुत्रा

आफ्रिकन जंगली कुत्र्याला आफ्रिकन पेंटेड कुत्रा किंवा आफ्रिकन शिकारी कुत्रा देखील म्हणतात. हा आफ्रिकन जंगली कुत्रा सुमारे ७६-१०२ सेमी (३०-४१इंच) लांब असतो. ही प्रजाती शिकारीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे कुत्रे ताशी ६६ किमी वेगाने उडी मारू शकतात आणि ताशी ७१ किमी प्रतितास या वेगाने धावू शकतात.
ही माहिती आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा.
शीतल दरंदळे