computer

स्पॅम इमेलस आणि ग्लोबल वॉर्मिंगचा काय संबंध आहे? ते डिलिट केल्याने नक्की काय साध्य होईल?

आपल्या मोबाईलच्या नोटिफिकेशन बारमध्ये रोज शेकडो मेसेजेस धडकत असतात. यातले काही तर उघडून बघणे देखील आपल्याला शक्य होत नाही. इमेल्सचा माराही सुरूच असतो. स्पॅम ईमेल्सचे तर काय सांगावे? माणूस दुर्लक्ष करून थकतो, पण पाठवणारे थकत नाहीत. हे स्पॅम ईमेल्स मात्र इतर कारणांनी नुकसानकारक असो-नसो, मात्र ते ग्लोबल वार्मिंगला हातभार नक्कीच लावतात.

ग्लोबल वार्मिंगचा आणि स्पॅम ईमेल्सचा कसा परस्पर संबंध तुम्हाला पडला असेल तर त्याचेच उत्तर याठिकाणी आज मिळणार आहे. एकीकडे ग्लोबल वार्मिंग हा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत असताना आपण ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी किमान हातभार तरी लावला पाहिजे. स्पॅम ईमेल्स डिलीट करणे हे एकाअर्थाने ग्लोबल वार्मिंग कमी करण्यास प्रयत्न करणे याचाच भाग आहे.

 

मॅकॲफी नावाची एक सायबरसिक्युरिटी फर्म आहे. त्यांनी एका अभ्यासात स्पष्टपणे नमूद केले होते की, २००८ साली दरवर्षी ६२ ट्रीलीयन स्पॅम ईमेल्स पाठविण्यात येत असतात. आता तर ती संख्या कुठच्या कुठे पोहोचली असेल. हे ईमेल्स डाटा सेंटर्समध्ये स्टोअर केले जातात. एका डेटा सेंटरला हानी पोचल्यास डेटा कायमचा हरवू शकतो, तसे होऊ नये म्हणून सहसा डेटा एकाहून अधिक ठिकाणी स्टोअर केला जातो.  साहजिकच हे ईमेल्सही हा वेगवेगळ्या डाटा सेंटर्समध्ये स्टोअर केले जातात.
आता खरा मुद्दा सुरू होतो, तो म्हणजे हे सर्व डाटा सेंटर्स प्रचंड प्रमाणात वीज शोषत असतात. त्यातली अधिकांश वीज ही जीवाष्म इंधनापासून बनत असते. या मॅकॲफीच्या अभ्यासात प्रत्येक ईमेल हा ०.३ ग्रॅम कार्बन उत्सर्जनास जबाबदार ठरत असतो, यावरून स्पॅम ईमेल्समुळे पर्यावरणाची किती हानी होत असते याचा तुम्ही अंदाज लावू शकता.

याचाच अर्थ ६२ ट्रीलीयन स्पॅम ईमेल्स हे ३३ अब्ज किलोव्हॅट वीज शोषतात. ३० लाख कार्स जेवढे उत्सर्जन करतात तेवढेच उत्सर्जन हे ईमेल्स एका वर्षात करतात. यावरून यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा पुरेसा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. आता यात आपण बदल घडवू शकतो. यासाठी आपल्याला जास्त काही करायचे नसून फक्त स्पॅम ईमेल्स वेळोवेळी डिलीट करायचे आहेत.

एका ईमेलची साईज ही ७५ KB धरली आणि देशातले ५ कोटी वापरकर्ते जरी स्पॅम डिलीट करू लागले तरी मोठा बदल घडू शकतो. प्रत्येकाने १० ईमेल्स डिलीट केले तरी ३,७५,००० जीबी इतका डाटा हा डाटा सेंटर्समध्ये स्टोअर होण्यापासून वाचवता येऊ शकतो. यामुळे थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २.६ लाख किलोवॅट वीज वाचवता येऊ शकते आणि १५ लाख किलो कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित होण्यापासून वाचवता येऊ शकते.

संशोधकांचं म्हणणं आहे की  ३०,००० लाईट बल्ब तुम्ही वर्षभर बंद ठेवल्याने जितका फरक पडू शकतो तितका फरक स्पॅम इमेल्स डिलिट करून काही सेकंदात घडवू शकतात. म्हणून होतील तेवढे स्पॅम ईमेल्स आपण डिलीट करत राहायला हवे. कारण ही पृथ्वी शेवटी आपली आहे. सरकारे जे उपाय करतील ते करतील, पण आपल्या हातात जे आहे ते तरी आपण करायला पाहिजे. हा लेख जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करून त्यांना देखील या विषयाचे महत्व समजावूया...

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required