IND vs AUS : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५ मोठे विक्रम जे दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बनवले गेले आहेत..

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारी पासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडणार आहे. दिल्लीच्या या मैदानावर तब्बल ६ वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी सामन्याचे आयोजन केले गेले आहे. या मैदानावर अनेक मोठ मोठे विक्रम केले गेले आहेत. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला या मैदानावर झालेल्या टॉप -५ विक्रमांबद्दल माहिती देणार आहोत.
१)सुनील गावस्करांनी याच मैदानावर केली होती डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी..
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डॉन ब्रॅडमन हे या खेळातील दिग्गज क्रिकेटपटू आहेत. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत एकापेक्षा एक अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. ज्यापैकी एक म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम.
डॉन ब्रॅडमन यांनी १९४८ मध्ये जेव्हा क्रिकटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी २९ शतके झळकावली होती. तब्बल ३५ वर्षे हा विक्रम कोणीही मोडू शकलं नाही. या विक्रमाची बरोबरी १९८३ साली सुनील गावस्करांनी केली. त्यांनी वेस्टइंडिजविरुध्द १२१ धावांची खेळी केली होती.
२) सचिनने मोडला सुनील गावस्करांचा सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम...
क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावे सर्वाधिक शतके झळकावण्याची नोंद आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावली आहेत. त्याने २००५ मध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम मोडून काढला होता. सुनील गावस्करांचा ३४ शतकांचा विक्रम मोडत त्याने ३५ वे शतक झळकावले होते.
३)अनिल कुंबळेंचे परफेक्ट १० याच मैदानावर...
फिरोजशाह कोटला मैदानाचं (आता अरुण जेटली) नाव घेताच क्रिकेट चाहत्यांना अनिल कुंबळेंची नक्कीच आठवण येत असेल. भारताच्या दिग्गज गोलंदाजाने याच मैदानावर इतिहासाला गवसणी घातली होती. याच मैदानावर अनिल कुंबळेंनी एकाच डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
४) विराटच्या नावे आहे वैयक्तिक सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम..
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला आपल्या फलंदाजी आणि फलंदाजीतील विक्रमांसाठी ओळखलं जातं. या फलंदाजाने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक अनेक मोठ मोठे विक्रम केले आहेत. त्याने २०१७ मध्ये श्रीलंकाविरुध्द फलंदाजी करताना त्याने २४३ धावांची खेळी केली होती.
५) भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्येची नोंद याच मैदानावर..
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ हा भारतात खेळताना सर्वात मजबूत संघ आहे. कुठलाही संघ भारताला भारतात येऊन पराभूत करू शकत नाही. मात्र काही वेळा फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर, नको त्या विक्रमाची नोंद होत असते. अश्याच एका विक्रमाची नोंद भारतीय संघाच्या नावे आहे. दिल्लीच्या मैदानावर वेस्टइंडिज संघाविरुद्ध खेळताना भारतीय संघ अवघ्या ७५ धावांवर ऑल आऊट झाला होता. ही भारतीय संघाची भेटत भारतात खेळताना सर्वात कमी धावसंख्या आहे.
काय वाटतं, भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल का? कमेंट करून नक्की कळवा.