computer

राणीच्या सत्तेला निरोप देऊन प्रजासत्ताक बनलेल्या बार्बाडोसबद्दल तुम्हांला काय माहित आहे?

मध्ययुगीन काळात ब्रिटीश साम्राज्याची सत्ता अर्ध्या जगावर होती असे म्हटले जाते. त्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे असेही म्हटले जायचे आणि ते खरेही होते. अजूनही काही देश राणी एलिझाबेथलाच आपली प्रमुख मानतात. अशा देशांना कॉमनवेल्थ राष्ट्रे म्हटले जाते. राणी एलिझाबेथ-२रीच्या अधिपत्याखाली असे एकूण ५४ कॉमनवेल्थ देश आहेत. अलीकडेच यातील एका देशाने या कॉमनवेल्थ समूहातून बाहेर पडून आपल्या देशाला संपूर्ण प्रजासत्ताक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटिशांच्या अधिपत्याखालून नुकतेच स्वतंत्र झालेल्या या देशाचे नाव आहे, बार्बाडोस. कॅरिबियन बेटावरील या देशाने राणी ऐलीझाबेथ-२ चे आधिपत्य आता झुगारून दिले आहे. ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या सोहळ्यासाठी खुद्द प्रिन्स चार्ल्स देखील उपस्थित होते.

बोभाटाच्या या लेखातून सुमारे ४०० वर्षे ब्रिटिश अधिपत्याखाली राहिल्यानंतर आता स्वतंत्र होत असलेल्या या देशाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया..

बार्बाडोस हा एक कॅरेबियन देश आहे. कॅरेबियन प्रदेश हा मुख्यत: कॅरेबियन समुद्राला वेढणाऱ्या बेटसमूहाने ओळखला जातो. वेस्ट इंडिज, क्युबा, हैती, बहामाज असे एकूण १६ देश या समूहात येतात. भौगौलिकदृष्ट्या पाहायचं तर उत्तर आणि अमेरिकेच्यामध्ये हा प्रदेश येतो.

इथल्या या बार्बाडोसवरती १६२७पासूनच ब्रिटिश अंकुश होता. १९६१पर्यंत बार्बाडोसला ब्रिटिश वसाहत मानण्यात येत होते. तसा तर बार्बाडोस ५४ वर्षांपूर्वीच म्हणजे ३० नोव्हेंबर १९६६ रोजीच स्वतंत्र झाला होता. तरीही या देशाचे सर्वोच्च अधिकार राणी एलिझाबेथ-२ हिच्याच हाती एकवटलेले होते. १९७९ पासून देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. १९९८ साली या देशाने राणीचा एकछत्री अंमल संपवून स्वतःचे प्रजासत्ताक आणण्यासाठी एक घटना समिती स्थापन केली. २००३ शेवटी सप्टेंबर २०२० मध्ये नवनिर्वाचित राष्ट्रपती सँड्रा मेसन यांनी आता आम्ही आमचा कारभार हाताळण्यास पुरेसे सक्षम झालो आहोत आणि आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याचा अधिकार असल्याचे ठणकावून सांगीतले. बार्बाडोसच्या नागरिकांना आता त्यांचा स्वतःचा नेता आणि स्वतःचे प्रशासन हवे आहे, आपली वसाहतवादी भूतकाळ मागे सारून एका नव्या भविष्याकडे वाटचाल करण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.

या नवस्वतंत्र देशाची पहिली राष्ट्रपती एक महिला असणार आहे. डेम सँड्रा प्रुनेल मेसन यांच्याकडे या देशाच्या राष्ट्रपती पदाची धुरा दिली जाणार आहे. या देशाच्या दोन्ही संसदेत याबाबतीत एकमत झाले आहे आणि लोकसभेचे सभापती आर्थर होल्डर यांनी मेसन यांना देशाच्या राष्ट्रपती घोषित केले आहे. या देशाचे पंतप्रधान मिया अमोर मॉटली यांनी मेसन यांच्या राष्ट्रपती निवडीचा हा क्षण आपल्या देशातील इतिहासातील एक सुवर्ण क्षण असल्याचे म्हटले आहे.

नवस्वतंत्र देशाच्या राष्ट्रपती पदाची धुरा सांभाळणाऱ्या या मेसन आहेत तरी कोण?

मेसन सध्या ७२ वर्षांच्या आहेत. २०१८ पर्यंत त्या या देशाच्या गव्हर्नर जनरल होत्या. मेसन यांनी लंडनमधून आपले कायदेविषयक शिक्षण पूर्ण केले आहे. लंडनच्या क्वीन्स कॉलेजमधून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी कॅनडा येथे फेलोशिप मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मेसन यांनी काही काळ शिक्षण क्षेत्रात आणि त्यानंतर १९७८ पर्यंत बँकिंग क्षेत्रात काम केले.. त्यानंतर त्यांनी बाल आणि कुटुंब न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले.

१९९१ ते १९९९ या दरम्यान त्या संयुक्त राष्ट्राच्या बालहक्क समितीच्या उप-सभापती आणि त्यानंतर सभापती होत्या. २००५ पर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार पदही भूषवले. २००८ साली मेसन बार्बोडोस सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणार्‍या त्या पहिल्या न्यायाधीश ठरल्या. २०१४ साली त्या कॉमनवेल्थ अर्बिट्ररल ट्रीब्युनल (CSAT) चे सदस्यत्व मिळणाऱ्या पहिल्या बार्बाडोस नागरिक होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांच्याकडे या ट्रीब्युनलचे अध्यक्षपदही आले. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

३० नोव्हेंबर २०२१ रोजी संड्रा मेसन यांनी स्वतंत्र देशाची पहिली राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आणि पदभार स्वीकारला. मेसन यांना राष्ट्रपती पदाचा मान दिल्याने बार्बाडोसचे नागरिकही योग्य हातात सत्ता गेल्याच्या आनंदात आहेत. जनतेतील या आनंदाच्या वातावरणातूनच मेसन यांच्या कार्याला उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

सध्या बार्बाडोससमोर गरिबी, सरकारी भ्रष्ट्राचार, सरकारी कारभारातला अपारदर्शीपणा, हिंसाचार आणि साधारण लोकांप्रती विशेषत: LGBT बद्दलची असंवेदनशीलता अशा बऱ्याच मोठ्या समस्या आहेत. प्रजासत्ताकत्व मिळाल्यानंतर नव्या नेतृत्वाखाली यात सकारात्मक बदल घडतील अशी आपण आशा बाळगूया.

भविष्यात बार्बाडोस एक प्रभावी आणि संपन्न राष्ट्र म्हणून पुढे येईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required