मतदारयादीत नांव नाही? नांव आहे पण चुकीचं आहे? असं असेल तर भरा हे फॉर्म्स..

होतं काय, गेल्यावर्षी आपण मतदान केलं होतं, मग याही वर्षी मतदारयादीत नांव असेलच म्हणून आपण निर्धास्त राहातो... आणि तिथंच फसतो.

बरं आता झालं ते झालं, पुढच्यावेळेस तरी मतदारयादीत नांव यावं म्हणून काय करावं? किंवा नांव तर यादीत आहे, पण तपशीलात काहीतरी चूक आहे.. ही चूक कशी सुधारायची? मनात काही शंका आहेत, पण विचारायच्या कुणाला? हे सगळे प्रश्न पडले असतील तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला मिळाली म्हणून समजा. 

१.  मतदार मदत केंद्र-

 तुम्हांला मतदारसंघ, केंद्र किंवा काहीही बाबतीत माहिती विचारायची असेल, तर या लिंकवर क्लिक करा.  सरकारी साईट आहे, तेव्हा दमानं लोड होते. तुम्हीही आपण जणू काही सरकारी हापिसात आहोत अशी कल्पना करून निवांत वाट पाहा. दोन-एक मिनिटांत साईट उघडेल. मग तिथं Select District (सिलेक्ट डिस्ट्रिक्ट) असा मेन्यू येईल, त्यावर क्लिक करून आपला जिल्हा निवडा. मग त्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदार मदतकेंद्रांची नावं आणि तिथल्या संपर्क अधिकार्‍यांची नांवं त्यांच्या फोननंबरासह येतील. मग काय,  विचारा प्रश्नच प्रश्न. तुमचा आणि त्यांचा दोघांचा वेळ आणि आपलं बिल वाचवायचं असेल, तर आधीच आपले विचारायचे प्रश्न आणि मुद्दे एका कागदावर लिहून काढा बरं..

२.  यादीत नांव नसणं-

हे मत्र वाईट प्रकरण आहे. आपण जिथं राहातोय, तिथंच मतदानाचा अधिकार नसणं हा अन्याय आहे. सरकार म्हणतं, तुमचं जन्मगांव कोणतंही असो, तुम्ही नोकरीच्या निमित्तानं दुसरीकडे राहात असाल, तर नोकरीच्या गावी मतदान करा. आणि  या याद्या बनवणारे घरी येतात तेव्हा आपण नेमके अडकलेलो असतो ऑफिसात. 

अशा वेळेला मात्र तुम्ही फॉर्म ६ भरू शकता.  या फॉर्म मधल्या काही माहितीसाठी मदत हवी असेल, तर आहेच मग वरचा मतदार मदत केंद्राचा नंबर आणि पत्ता!!

३. यादीत चुकीचं नांव असणं- 

खोटं वाटेल, पण या प्रकारात सगळ्यात जास्त जर त्रास कुणाला होत असेल, तर तो लग्न झालेल्या मुलींना. मुलीच्या नावाला बाबाचं आडनांव, पण बाबांच्या नावाच्या ठिकाणी नवर्‍याचं नांव, असला जोक एक निवडणूक आयोगातले लोकच करू जाणे. असो, यावरही उपाय आहे- फॉर्म ८

हे दोन्ही फॉर्म जरा लांबलचक आहेत. पण न भरून सांगता कुणाला? असा विचार करा, की जर त्या मतदार मदत केंद्राला भेट दिली असती तर किती वेळ आणि पैसा खर्च झाला असता? मग आअता तोच वेळ या वेबसाईटचे फॉर्म भरण्यात कारणी लावा.. 

सबस्क्राईब करा

* indicates required