computer

लाल बहादूर शास्त्री म्हटलं की आठवतो त्यांचा निगर्वी साधेपणा !

आज आपले दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे.लाल बहादूर शास्त्री म्हटलं की आठवतो त्यांचा निगर्वी साधेपणा !  जाहिरात क्षेत्रातील एक मान्यवर राम सेहगल यांची पहिली नोकरी एअर इंडियात फ्लाइट पर्सर म्हणून केली होती. या काळात अनेक व्हिआयपी प्रवाशांसोबत त्यांचा संपर्क आला. या मोजक्या आठवणी त्यांनी त्यांच्या आत्मचरीत्रात लिहिल्या आहेत. त्यापैकी  लाल बहादूर शास्त्री यांची एक आठवण आज वाचा ! 

त्या काळी पंडित नेहरू -लाल बहादूर शास्त्री -इंदिरा गांधी हे सर्व पंतप्रधान नेहेमी इतर प्रवाशांसारखेच विमान प्रवास करायचे. व्हिआयपीना वेगळे विमान देण्याची प्रथा तेव्हा नव्हती. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती बघता आपल्यापुरते विमान वापरणे म्हणजे देशाचा पैसा वाया घालवणे, अशी ठाम श्रध्दा असलेल्या नेत्यांचे ते दिवस होते.

शास्त्रीजी एका बैठकीसाठी परदेशी जात होते. स्थानापन्न झाल्यावर त्यांनी फ्लाइट पर्सरला बोलावून सांगीतले की, 'मी आता झोपणार आहे कैरो विमानतळ येण्यापूर्वी ४५ मिनिटे आधी तुम्ही मला जागे करा". इतकं बोलून शास्त्रीजी गाढ झोपले. तो पर्सर म्हणजे राम सहगलच होते. 
गोंधळ असा झाला की राम सहगल शास्त्रीजींना जागं करण्याचं विसरूनच गेले आणि जेव्हा पायलटने येत्या २० मिनिटात आपण कैरो विमानतळावर उतरू, अशी घोषणा केली तेव्हा राम सहगल हडबडूनच गेले. पंतप्रधानांना आपण वेळेत जागे केले नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या पोटात गोळाच उठला. जर हे एअर इंडियाच्या मॅनेजमेंटला कळले तर कदाचित तो नोकरीचा शेवटचा दिवस ठरणार होता. होय, त्यावेळी अत्यंत कडक शिस्तपालनासाठी एअर इंडिया प्रसिध्द होती. 

धैर्य एकवटून ते शास्त्रीजींजवळ गेले. सीटचा दिवा चालू केला. शास्त्रीजी जागे झाले. राम सहगल यांनी त्यांची माफी मागीतली आणि त्यांना म्हणाले "मला माफ करा, मी तुम्हाला आधीच उठवायला हवे होते, पण मी विसरलो. आता फक्त २० मिनिटातच आपण विमानतळावर उतरू". यावर शास्त्रीजींनी स्मितहास्य केले आणि म्हणाले "हरकत नाही. आता उतरल्यावर विमानतळावर मी २० मिनिटं कमी बोलेन इतकेच". राम सहगल यांचा जीव भांड्यात पडला. पण विचार करा एखादा गर्विष्ठ माणूस शास्त्रीजींच्या जागी असता तर ...? 

सबस्क्राईब करा

* indicates required