पन्नास दिवसात काय केलं? वर्‍हाड उपाशी झोपवलं!!!

आज आम्ही फारच खुशीत होतो. आमच्या बारने एका स्कीम जाहीर केली होती. प्रत्येक  "मित्रों" उच्चारासोबत एक बिअर फक्त एकतीस रुपयात मिळणार होती.
पण त्यांनी आमची निराशा केली.

ते "मित्रों" म्हणालेच नाहीत आणि आम्ही आता कोरड्या घशाने की-बोर्ड बडवतो आहोत.
असो  मित्रों असो..
पण आमचे मित्र खरे एंटरटनेर आहेत.
त्यांनी नमनालाच यज्ञातले सगळेच तेल ओतून टाकले.
मग त्यांनी दिनदयाल उपाध्याय ते गांधीबापू , सगळयांच्या नावानी चांगभलं केलं.
बँकवाल्यांच्या आणि पोस्टवाल्यांच्या नावानी डफ-दिमडी वाजवली.
आम्ही गोंधळाच्या दिवट्या घेऊन नाचायला तयार झालो तोपर्यंत यांनी गोंधळाच्याच्या ऐवजी वगनाट्य सुरु केलं.
आम्ही म्हटलं गोंधळ काय किंवा वगनाट्य काय, वर्षाच्या अखेरीस मोफत  करमणूक तर करा आणि येऊ द्या ठुमकत गौळणी......
आता गौळणी येणार म्हणून जोरदार शिट्टी वाजवायला तोंडात बोटं घातली तर यांनी हातचलाखीचे खेळ सुरु केले आणि आमची बोटं आमच्या घशातच अडकली.
थोडं भानावर आलो तर यांनी ढोल वाजवायला सुरुवात केली,
आणि
ते असे काही ढोल पिटतात की ऐकणारा तहानभूक विसरतो.
ढिंग चॅन्ग  ढीचांग
ढिंग चॅन्ग  ढीचांग
वाजवलं दादा वाजवलं..
वऱ्हाड उपाशी झोपवलं... 

आम्ही  उधार आणलेली शिग्रेट पेटवली आणि ऐकतच राह्यलो. हातातली शिग्रेट संपून चटका बसला आणि ........
आम्ही वास्तवात आलो.
काय केलं आज मोदींनी?
आज त्यांनी पुन्हा एकदा बॅकांना दिवाळखोरीतून बाहेर आणलं.
आता तुम्ही विचाराच, कसं?
कसं??
 ते असं..
"आपण सगळ्यांनी म्हणजे चवली -पावली -चिरीमिरी-पेटी खोकावाल्यांपर्यंत सगळ्यांनी पैसे बँकेत जमा केले. म्हणजे नक्की काय झालं , तर बँकेच्या खात्यात क्रेडीट वाढलं. आता हे जमा झालेलं क्रेडीट बँकेत पुरेशी रोकड नसल्यानं  बँकेच्या गळ्यात बांधलेली घोरपड झाली. या क्रेडीटचा जोपर्यंत निचरा होत नाही, तोपर्यंत त्यावर व्याज देणं हा वाढता खर्च झाला. कर्ज घेणार्‍यांची संख्या घटत असल्यानं क्रेडीट व्यापारी व्याजानं विकलं पण जात नाही. म्हणजे शुद्धीकरणाच्या गडबडीत आधीच दुर्बळ असलेल्या  बँकींग सिस्टीमवरचा ताण वाढला किंवा जोपर्यंत रोकड सुलभता येत नाही तोपर्यंत वाढत जाणार. थोडक्यात काय, तर बँकींग सिस्टीम मध्ये इन्वेंटरी ढिगभर जमा झाली. एखादा हुषार व्यापारी इन्व्हेंटरी वाढली की काय करतो? तो अ‍ॅन्युअल स्टॉक क्लियरींग सेल जाहीर करतो. काल पंतप्र्धान मोदींनी नेमके हेच केलं आहे. जनतेचे जमा  पैसे अधिक व्याजानी जनतेला परत देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे."
 

तर मित्रों... पंतप्रधानांनी  काही दिले नाही  तर त्यांनी त्यांचा नाईलाज आकर्षक पॅकींग करून शोकेसमध्ये विकायला ठेवला आहे.  बघा पटतंय का?

सबस्क्राईब करा

* indicates required