राजीव गांधींनी सुरक्षा ताफ्यातल्या गाड्यांच्या चाव्या काढून गटारात फेकून दिल्या होत्या तेव्हा..

पंतप्रधान होण्यापूर्वी राजीव गांधी एखाद्या सर्वसाधारण नागरिकासारखे राहत होते. सुरक्षा पथकाच्या निगराणीखाली आयुष्य काढायची त्यांना सवयच नव्हती. ते ज्या घटनेमुळे पंतप्रधानपदावर आले ती घटना म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची, म्हणजे त्यांच्या आईची, अंगरक्षकांनी केलेली हत्या! साहजिकच राजीव गांधी यांच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक काळजी घेणे अत्यावश्यक होते. ज्याला आपण एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) म्हणतो त्या दलाची निर्मिती यानंतरच झाली. राजीव गांधींना मात्र ही सुरक्षा म्हणजे डोकेदुखी वाटायची आणि त्या सुरक्षेला कंटाळून जायचे. बर्याच वेळा राजीव गांधी यांना सर्वसामान्य नागरिकासारखे फिरायची लहर आली की सुरक्षा दलाच्या नकळत ते घराबाह्रेर पडायचे आणि मोठ्ठाच गोंधळ निर्माण व्हायचा. त्यांचे असे वागणे सुरक्षा दलाच्या पोटात गोळा उभा करायचे.
त्यावेळी केंद्रीय गृह खात्याचे मुख्य सचिव श्री राम प्रधान होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी My years with Rajiv and Sonia हे पुस्तक लिहिले. राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त त्याच पुस्तकातून घेतलेल्या दोन कथा आज आम्ही सांगणार आहोत .
३० जून १९८५ रोजी त्या दिवशी दिल्लीत मुसळधार पाऊस होता. रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. दिल्लीत रस्त्यावर ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झाला होता. आणि त्याच दिवशी भारताचे चीफ एअर मार्शल एल. एम. कात्रे यांचे अकस्मात हृदयविकाराने निधन झाले. पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या पत्नीच्या सांत्वनासाठी पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या घरी गेले. सोबत सोनिया गांधी पण होत्या. त्यानंतर सोनिया गांधी एकट्याच घरी परततील की राजीव गांधींच्या सोबत असतील याची कल्पना नसल्याने दोघांचेही सुरक्षा वाहनांचे ताफे त्यांच्यासोबत होते. पंधरा मिनिटानंतर राजीव गांधी बाहेर आल्यावर त्यांनी सुरक्षावाहनांची झालेली गर्दी पाहून एका पोलीस अधिकार्याला आदेश दिले की ते आणि सोनिया गांधी थेट घरीच जाणार आहेत तेव्हा कोणत्याही सुरक्षा वाहनाने त्यांच्या सोबत येऊ नये. इतकं बोलून ते आपल्या खास जीपमध्ये बसून घरी जायला निघाले. राजीवजी त्यांची जीप स्वतःच चालवायचे. ही सुध्दा एक मोठी समस्या होती. कारण त्यांच्याइतक्या वेगाने गाडी चालवताना एसपीजीच्या जवानांची तारांबळ उडायची. आता त्या पोलीस अधिकार्याला निरोप समजला नाही अथवा सुरक्षा दलांना मिळाला नाही असा काही तरी गोंधळ झालाच आणि सर्च सुराक्षा वाहने त्यांच्या मागोमाग निघाली.
सूचना देऊनही गाड्या आपल्या मागेच आहेत हे दिसल्यावर राजीव गांधी रागावले. भडकून अचानक त्यांनी जीप थांबवली. त्यांच्या मागोमाग दिल्लीच्या असिस्टंट पोलीस कमिशनरांची गाडी उभी राहिली. राजीवजीना उतरताना पाहून कमिशनरही उतरले आणि त्यांच्याशी ते बोलणार इतक्यात राजीव गांधींनी त्यांच्या गाडीच्या चाव्या काढून घेतल्या. ताडताड चालत ते पुढे जातच राहिले आणि नंतरच्या आणखी दोन गाड्यांच्या चाव्या त्यांनी काढून घेतल्या. आपल्याकडे जीपकडे परत येताना त्यांनी सगळ्या चाव्या रस्त्यावरून वाहणार्या पाण्याच्या लोंढ्यात फेकून दिल्या. वाहनांचा ताफा रस्त्यातच खोळंबून राहिला. संपूर्ण राजाजी पथ ब्लॉक झाला. हे होता होता गाड्यांमधली बिनतारी यंत्रणा पण बंद पडली. सुरक्षा दल गोंधळून गेले. थोड्याच वेळात राजीव गांधी घरी पोहचल्याचे समजले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्याच दिवशी रात्री आणखी एक प्रकार घडला त्यामूले सुरक्षा दलाने डोक्याला हातच लावला. राजीव गांधी अचानक जीप घेऊन बाहेर पडले. त्यांच्या रक्षकांच्या हे लक्षात येण्यापूर्वीच जीप दिसेनाशी झाली होती. नशिब असे बलवत्तर की वाहतूक नियंत्रण करणार्या एका शिपायाने त्यांची जीप ओळखून बिनतारी संदेश पाठवला. पुन्हा एकदा जीव भांड्यात पडला.
दुसर्या दिवशी या सगळ्या प्रकारांची बातमी झाली. राम प्रधानांच्या टेबलवर रिपोर्ट आल्यावर त्यांनी तडक राजीव गांधी यांना गाठले. नाराजी व्यक्त केली. त्यांना सिक्युरिटी प्रोटोकॉल पाळायची हात जोडून विनंती केली आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी सर्व नियम पाळायचे कबूल केल्रे पण.... पण ...... पुढच्याच काही दिवसांत त्यांनी राम प्रधान सोबत असतानाच सगळे नियम तत्यांनी मोडूनही दाखवले.
त्याचं झालं असं की एक दिवस ऐन मध्यरात्री राम प्रधान यांच्या RAX ची घंटी वाजली. फोनवर राजीवजी होते . ते म्हणाले प्रधानजी तुम्ही कुठे आहात सांगा, मी माझी गाडी पाठवतो आहे. थोड्याच वेळात राम प्रधान राजीव गांधींच्या निवासस्थानी पोहचले. पंजाब प्रश्नाविषयी पंजाबचे राज्यपाल सिध्दार्थ शंकर रे यांच्यासोबत चर्चा झाल्यावर रात्रीचे दोन वाजले. ते गेल्यावर राजीवजींनी राम प्रधानांना जीपमध्ये त्यांच्यासोबत बसायला सांगीतले. प्रधानांना वाटले की राजीवजी सिक्युरीटी गेटवर त्यांना सोडून परतातील. पण झाले भलतेच. राजीव गांधी बाहेर पडून प्रधानांना विचारते झाले, "तुमच्या घरी कसं जायचं हे सांगता का?"
लक्षात घ्या, रात्रीची दोन वाजताची वेळ. सिक्युरिटी गोंधळात आणि सोबत पंतप्रधान. काय अवस्था झाली असेल?
पण वेळीच भान राखून प्रधान म्हणाले, "राजीवजी तुम्ही मागे वळा नाहीतर मीच आता गाडीतून उडी मारतो" यावेळी मात्र राजीव गांधीना गांभीर्य कळले आणि हसत हसत त्यांनी गाडी मागे वळवली.
राजीव गांधींनी सुरक्षा हा विषय हसण्यावारीच नेला आणि त्यामुळे सुरक्षेत ढिलाई येत गेली. त्याचे पुढे काय परिणाम झाले हे तर आपल्याला माहिती आहेच.