एक दिवसाची मुख्यमंत्री, ती ही फक्त १९ वर्षांची? कोण आहे ही मुलगी आणि कोणत्या राज्याची ती मुख्यमंत्री बनली आहे?

अनिल कपूरचा नायक सिनेमा गेली कित्येक वर्षे लोकप्रिय आहे. नायकमधल्या शिवाजीराव गायकवाडसारखा कुणीतरी यावा आणि त्याने राजकारण स्वच्छ करावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. सध्या उत्तराखंड या राज्यात अशीच एक नायिका निर्माण होऊ पाहत आहे. सृष्टी गोस्वामी हे तिचे नाव!! वय वर्ष फक्त १९ आणि काम काय, तर उत्तराखंडची मुख्यमंत्री!!! सांगून खरं वाटत नाही ना?

पण ही सृष्टी गोस्वामी ही रविवार २४ जानेवारी २०२१ रोजी पूर्ण एका दिवसासाठी उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळणार आहे. राष्ट्रीय बालिका दिवसाचे निमित्त साधून तिच्याकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे. अगदी नायक सिनेमासारखीच ही गोष्ट आहे. स्वतः उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत हे विधानसभेत तिच्याकडे सूत्रे सोपविणार आहेत.

 सृष्टी ही हरिद्वारच्या दौलतपूरची रहिवासी आहे. रुरकीच्या BSM कॉलेजमधून ती बीएस्सी ऍग्रीकल्चरचे शिक्षण घेत आहे. तिचे वडील गावात किराणा दुकान चालवतात, तर आई सुधा अंगणवाडी कार्यकर्ती आहे. 

सृष्टीची निवड अचानक झाली नसावी. याआधीही तिने आपल्या गुणांची चुणूक दाखवली आहे. यापूर्वी सृष्टीला  २०१८ साली झालेल्या बाल विधानसभेत कायदे निर्माता म्हणून निवडण्यात आले होते. तसेच २०१९मध्ये ती गर्ल्स इंटरनॅशनल लीडरशिप कार्यक्रमात थायलंड येथे भारताचे प्रतिनिधित्व करून आली आहे. गेली दोन वर्ष सृष्टी आरंभ नावाची योजना चालवत आहे. याव्यतिरिक्त ती गरीब मुलांसाठी त्यातही मुलींनी शिक्षण घ्यावे म्हणून प्रेरित करत असते. 

हे सर्व पाहता १९ वर्षे हे मुख्यमंत्री होण्यासाठी खूप कमी वय असलं तरी सृष्टी गोस्वामीसाठी हा एक उत्तम अनुभव असू शकेल. तुम्हांला काय वाटतं?

-उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required