computer

संपूर्ण गाव जगाच्या नकाशातून खोडायला लावणारी किश्तीम अणु दुर्घटना!!

अणुस्फोट म्हटल्यावर तुम्हाला काय आठवेल? चेर्नोबल अणु दुर्घटना, फुकुशिमाचा अणुस्फोट, हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्ब स्फोट, किंवा फारतर तुम्ही थ्री मिल आइसलँडबद्दल ऐकले असेल. या व्यतिरिक्तही जगात आणखी एका ठिकाणी अणु दुर्घटना झाली होती. जगातील या तिसऱ्या अणु दुर्घटनेबद्दल मात्र फारशी कुणालाही माहिती नाही. अशी कोणतीही घटना जगापासून लपवून ठेवणेच त्यात्या देशातील सत्ताधीशांना फायद्याचे ठरते. म्हणूनच या तिसऱ्या अणु दुर्घटनेची माहिती जगापासून फार काळ लपवून ठेवण्यात आली होती. या दुर्घटनेचे दुष्परिणाम आणि त्याला दडपून टाकण्याची पद्धती इतकी भयावह होती की, फुकुशिमा आणि चेर्नोबलच्या घटनाही यासमोर फिक्या ठरतील. 

जगातील ही तिसरी अणु दुर्घटना सोव्हिएत रशियामध्ये १९५७ साली म्हणजे चेर्नोबिल आणि फुकुशिमोच्याही खूप दशके आधी घडली होती. सोव्हिएतच्या कालखंडात आणि तेही दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्ध शिगेला पोहोचण्याच्या काळातील ही घटना म्हणूनच फारशी प्रसिद्ध झाली नाही किंवा तिला प्रकाशझोतात येऊ दिले नाही असेही म्हणता येईल. बाहेरच्या जगाला तर याची खबरबात लागली नाहीच ते सोडा, पण जे लोक या अणु दुर्घटनेला बळी पडले, ज्यांच्यावर याचा परिणाम झाला त्यांनाही कळले नाही की, त्यांच्यासोबत नेमके काय घडले आहे. सोव्हिएतने याबाबत इतकी काटेकोर गुप्तता पाळली होती. यामागचे कारणही तसेच होते. 
 

दुसऱ्या महायुद्धाचा भडका नुकताच कुठे निवला होता. रशियाला तर दोन्ही युद्धात मोठाच फटका बसला होता. अमेरिकने जपानवर अणुबॉम्ब टाकून स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले होते. अमेरिकेची ही वाढती मुजोरी पाहून रशियाला पोटशूळ उठणे साहजिकच होते. हिरोशिमा आणि नागासाकी नंतर तर प्रत्येक देशाला अण्वस्त्र सज्ज होण्याची घाई लागली होती. एकीकडे या स्फोटाचे भयावह परिणाम पाहता संपूर्ण जग अण्वस्त्रांच्या संहारक शक्तीपुढे दिग्मुढ झाले असताना सोव्हिएत रशिया मात्र गुप्तपणे स्वतःचा अणु प्रकल्प राबवत होते. संयुक्त राष्ट्रांनी अण्वस्त्रांच्या चाचणीवर आणि अणुबॉम्ब निर्मितीला काही काळ लाल झेंडा दाखवला होता. अशावेळी ही दुर्घटना जर जगासमोर आली असती तर चहुबाजूंनी  सोव्हिएत रशियावर टीकेची झोड उठली असती. त्यात रशियाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आधीच डागाळलेली असताना हे आणखी एक गालबोट नकोच होते. म्हणूनच रशियाने हा अणुप्रकल्प इतका गुप्त ठेवला होता की या अणुप्रकाल्पाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ही याबद्दल काडीची माहिती नव्हती. खरे तर आज हा अपघात किश्तीम अपघात म्हणून ओळखला जात असला तरी त्यावेळी तो किश्तीममध्ये घडला नव्हताच. तर तो चेल्याबिस्क-६५ नावाच्या एका गावात घडून आला होता. नंतर या गावाचेही ओझ्योस्क असे नामकरण करून हा दुर्घटनाग्रस्त परिसरच जगाच्या नकाशावरून गायब करण्यात आला. सोव्हिएत सरकारच्या मते चेल्याबिस्क-६५ नावाचे गावच त्यांच्या देशात अस्तित्वात नाही. 

अण्वस्त्र आणि त्याचे दूरगामी घातक परिणाम काय असू शकतात याची अजूनही जगाला माहिती नव्हती, असा तो काळ होता. आज आपण अण्वस्त्राच्या घातक परिणामांना पुरेपूर जाणतो. त्याकाळी याबाबत एवढी जागरूकता नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प उभारणीपासूनच त्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. ज्या परिसरात ही अणुभट्टी उभारली होती त्याला चेल्याबस्की-४० म्हटले गेले आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर चेल्याबस्की-६५ म्हणून ओळखले जात होते. काहीशा घाईतच ही अणुभट्टी उभारण्यात आली होती. या अणुभट्टी सहा रिअॅक्टर होते ज्यात प्लुटोनियमवर प्रक्रिया केली जात होती. अणुभट्टीतून उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो याची पुरेशी कल्पना नसल्याने इथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठीही कुठलीही उपाययोजना नव्हती  की, खबरदारी घेण्यात आली नव्हती. या अणुभट्टीच्या परिसरात नागरिकांना राहण्यास मज्जाव केला पाहिजे हे माहीत असूनही सोव्हिएत सरकारने आजूबाजूला स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबाना कसलाच सतर्कतेचा इशारा दिला नाही. 

अणुभट्टीतून निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचरा जवळच्याच टेचा नदीत टाकला जात होता. अणुभट्टीतून उत्सर्जित होणारा धूर आणि इतर घनकचरा यांच्या विल्हेवाटीसाठीही काहीच उपाय राबवले नव्हते. त्यातून आजबाजूच्या हवेत मिसळणारे प्रदूषण, याबाबतही कसलीच चिंता सरकारला नव्हती. त्यांना फक्त लवकरात लवकर अण्वस्त्र सज्ज व्हायचे होते. अमेरिकेपेक्षा शक्तिशाली व्हायचे होते बस्स! याठिकाणी काम करणारे कामगार म्हणजे तुरुंगातील कैदी होते त्यांच्याकडून जबरदस्तीने हे काम करवून घेतले जाई. आपण किती असुरक्षित वतावरणात काम करत आहोत याची कल्पना या कामगारांनाही नव्हती. १९५३ सालीच इथे पहिला छोटा अपघात घडला होता. त्यानंतर तरी सरकारने जागरूकता दाखवायला हवी होती. त्याऐवजी काम रेटण्यातच सरकारने धन्यता मानली. एका कामगाराला किरणोत्सर्गामुळे अपंगत्व आले. आणखी चार कामगारांवरही याचे परिणाम दिसू लागले होते. अशा छोट्यामोठ्या तक्रारी घडतच होत्या. तरीही त्याकडे लक्ष देण्यास कुणालाच फुरसत नव्हती.

२९ सप्टेंबर १९५७ रोजी या मायाक भट्टीवरील शितकरण प्रणालीत बिघाड निर्माण झाला. कुणाचेच याकडे लक्ष गेले नाही. ज्या टाकीत अणुभट्टीतील कचरा जमा होत होता त्यातच स्फोट झाला. किरणोत्सर्गी वायूंनी भरलेले धुराचे मोठमोठे लोट आकाशाच्या दिशेने झेपावू लागले. त्यातून बाहेर पडणारा कचरा इस्तत: विखुरला गेला. सुमारे २०,००० चौ किमी परिघातील परिसर या कचऱ्याने प्रभावित झाला. या परिसरात २, ७०,००० लोक राहत होते. त्यातील फक्त ११,००० लोकांचे स्थलांतरण करण्यात सरकारला यश आले. उरलेल्या लोकांना तिथून सुरक्षित स्थळी हलवण्या ऐवजी त्यांनाच परिसरात जमा झालेला किरणोत्सर्गी कचरा साफ करण्याची सक्ती करण्यात आली. हा कचरा म्हणजे नेमके आहे काय, तो कसा हाताळायचा याचे कसलेच ज्ञान नसलेल्या लोकांनी जमेल त्यापद्धतीने त्याची विल्हेवाट लावली. शेतातील पिकांवर आणि पाळीव जणांवरही याचा परिणाम झाला होता म्हणून त्यांच्या शेतातील पिके नष्ट करण्यात आली. शेतकऱ्यांनी पोटाच्या लेकरांप्रमाणे पाळलेल्या जनावरांची कत्तल करण्यात आली. इतके सगळे करून त्यांना तिथेच रामभरोसे सोडण्यात आले. त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही प्रयत्न सरकारने केले नाहीत. उलट या अपघाताची जबाबदारीच सरकारने झटकून टाकली. 

किरणोत्सर्गाचा संसर्ग झाल्याने या मयाक अणुभट्टीच्या परिसरातील ३०० गावातील ५००० नागरिक काही दिवसातच मृत्युमुखी पडले. या परिसरातील उच्च वंशीय रशियन लोकांचेच तेवढे पुनर्वसन करण्यात आले. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यांनतरही तिथल्या लोकांची कुणीही विचारपूस केली नाही. 
 

आज या परिसरातील लोक कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांशी झुंझत आहेत. त्यांच्या मुलांच्यात अपंगत्व, अनुवांशिक बिघाड आणि इतरही असंख्य आजार दिसून येत आहेत. १९७६ पर्यंत तरी या प्रकरणाबाबत कुणालाच काही माहिती नव्हती. १९७६ साली सोव्हिएत मधील जैवशास्त्रज्ञ डॉ. झोरेस मेदवेदेव यांनी न्यू सायंटिस्ट या जर्नलमध्ये या परिसरातील वस्तुस्थितीवर एक शोधनिबंध सादर केला. या परिसरातील लोकांमध्ये असे दुर्धर अनुवांशिक आजार दिसून येत असले तरी त्यामागचे नेमके कारण मेदवेदेव यांनाही सापडले नव्हते. १९८२ साली तिथे काही पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी भेट दिली आणि त्यांनी असा अनुमान लावला की, ही परिस्थिती औद्योगिक प्रदूषणापेक्षा अणू दुर्घटनेमुळेच निर्माण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला

सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्यांनतरच याबाबतचे सत्य उघड झाले. म्हणून शेकडो दशकांपूर्वी घडलेल्या या भीषण आणि तितक्याच क्रूरतेने दडपलेल्या दुर्घटनेबाबत कुणालाच  फारशी माहिती नाही. 

१९४९ मध्ये ही अणुभट्टी उभारण्यात आली होती. तेव्हापासून १९५६ पर्यंत यातील किरणोत्सर्गी कचरा टेचा नदीतच टाकला जात होता. त्यामुळे या नदीचे पाणी पूर्णतः दूषित झाले आहे, ज्याचे परिणाम अर्थातच या नदीच्या पाण्यावर जगणाऱ्या नागरिकांना भोगावे लागत आहेत. आज हा परिसर पृथ्वीवरील सर्वात दूषित परिसर म्हणून ओळखला जातो.

इथल्या येणाऱ्या पिढ्यांना तरी न्याय मिळेल का? हा खरा प्रश्न आहे.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required