computer

अँड्रॉईड पाय : गुगलच्या या नव्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिममध्ये आहेत हे १० महत्त्वाचे फिचर्स!!

आज सकाळीच तुम्ही बातमी वाचली असेल, गुगलनं अँड्रॉईडचं नवं व्हर्जन लाँच केल्याची. ते त्यांच्या नियमानुसार अँड्रॉईडच्या प्रत्येक व्हर्जनला काहीतरी गोड पदार्थाचं नांव देतात. गेल्यावेळचं नांव होतं O अक्षरावरुन. त्यामुळं या वेळेस P अक्षरावरुन नांव असलेल्या या व्हर्जनचं म्हणजेच आवृत्तीचं नांव आहे 'पाय'. हा फळं, भाज्या किंवा मांस घालून बेक केलेला गोडसर पदार्थ पदार्थ असतो. 

सध्या ही पाय ऑपरेटिंग सिस्टिम गुगलच्या पिक्सेल फोनमध्ये आहे. आपल्यासारख्यांसाठी मात्र ती उपलब्ध होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. हां, जर का तुम्ही गुगलच्या बिटा प्रोग्रॅममध्ये असाल, तर ती तुम्हांला या वर्षाअखेरपर्यंत मिळायला हरकत नाही.

या नव्या ओएसमध्ये काय आहे हा प्रश्न तर तुम्हांला पडला असेलच. वाचा तर मग...

१. ही नवी ओएस ॲप्पल X फोनसारखा डिस्प्ले कटआऊट नॉच सपोर्ट करेल.

एक काळ असा येईल की आयफोन फिचर्स आणि अँड्रॉईड ओएस फीचर्समध्ये जास्त काही फरकच राहणार नाही. हे कट आऊट नॉच फिचर आयफोनसारखंच आहे. यामध्ये फुल स्क्रीन मोबाईलफोनमध्ये स्पीकर आणि कॅमेरासाठी खाच असेल, जेणेकरुन तुम्हांला जास्तीत जास्त स्क्रीन पाहायला मिळेल. 

हा पाहा आपला सध्याचा फोन आणि हा आहे डिसप्ले कट आऊट नॉचवाला फोन. फरक जाणवतोय ?

स्रोत

 

२. मेसेजेस मध्ये जीमेलसारखे स्मार्ट उत्तरं असतील.

सध्या जीमेल ॲपमध्ये इमेल वाचताना तुम्हांला इमेलमधल्या मजकुराच्या अनुषंगानं तयार उत्तरं मिळतात. आपण फक्त त्यातलं एक निवडायचं असतं. तशीच 'तयार उत्तर' आता मेसेजेसमध्ये पण तयार असतील. म्हणजे आतापर्यंत गुगल फक्त आपले इमेल्सच वाचत होते, आता मेसेजेस पण वाचायला लागतील. आतापर्यंत त्यांनी मेसेजेस वाचले नसतीलच असं म्हणता येणार नसलं, तरी आता इथून पुढे ते वाचत आहेत हे सिद्ध होतंय बरं..

३. मेसेज नोटिफिकेशनमध्येच इमेजेस दिसतील.

सध्या आपल्याला मेसेज उघडल्याशिवाय त्यात नक्की काय ॲटॅचमेंट आलीय हे पाहू शकत नाही. आता या नव्या ओएससोबत नोटिफिकेशन ट्रे खाली सरकवला, की तिथेच आपल्याला काय इमेजेस आल्या आहेत हे आपण पाहू शकू.

४. मेसेज एकटयाला आला आहे की ग्रुपमध्ये हे नोटिफिकेशनमध्येच समजेल.

आलेला टेक्स्ट मेसेज एकट्याला आहे की ग्रुपमध्ये, हे वापरकर्त्याला नोटिफिकेशनमध्येच समजण्याची सोय या नव्या व्हर्जनमध्ये आहे. थोडक्यात, नोटिफिकेशनमधूनच आपल्याला अधिकाअधिक माहिती देण्याची सोय यांनी केलीय. त्यामुळं कोणत्या नोटिफिकेशनचं ॲप आताच उघडायचं आणि कोणतं नंतर, हे  ठरवता येईल ना भाऊ!!

५. ॲपल आयफोन एक्ससारखं टेक्स्ट झूमिंग टूल्

हे फीचर अँड्रॉईड पायच्या ऑफिशियल ब्लॉगवर दिलं नाहीय. या फीचरमुळं टाईप करताना कर्सर एखाद्या शब्दावर किंवा वाक्यावर नेला, तर तिथली  अक्षरं मोठी दिसू लागतील.

६. नव्या वायफाय प्रोटोकॉलसाठी सपोर्ट्

हे थेट आपल्याला काही उपयोगाचं नसलं, तरी ते वापरुन ॲप लिहिणारे जे काही करु शकतील, ते आपल्यासाठी भारी उपयोगाचं आहे मंडळी. या नव्या फीचरमुळं IEEE 802.11mc Wi-Fi protocol या वायफाय प्रोटोकॉलसाठी सपोर्ट मिळणार आहे. तो वापरुन ॲप डेव्हलपर्स इन डोअर मॅप्स थेट ॲपमध्येच लिहू शकणार आहेत. त्यामुळं मोठ्या मॉलमध्ये गेलात तर मॉलच्या किंवा तिथल्या दुकानांचे ॲप तुमच्या फोनमध्ये असतील, तर त्यामधूनसुद्धा तुम्हांला तिथला अंतर्गत नकाशा दिसेल.

७. नवी इमेज कॉम्प्रेशन टेक्नॉलॉजी

कुणीही कितीही म्हटलं, तरी आपण गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेजेस पाठवणं थांबवणार नाही. त्यातच ढीगभर ग्रुपमध्ये इतके फोटो  येतात, की त्या इमेजेसमुळं सगळी फोन मेमरी संपायला येते. हे टाळण्यासाठीच, या नव्या ओएस व्हर्जनमध्ये त्यांनी नवं इमेज कॉप्रेशन आणलं आहे. म्हणजे फोटोज पाठवताना आणि फोनवर स्टोअर करताना, दोन्ही वेळेस कमी मेमरी आणि डेटा लागेल. भारी आहे ना? हो, पण म्हणून लगेच इमेजेसचा रतीब सुरु करु नका.. हो, आणि हे ही फीचर ॲपलमध्ये आधीच आहे बरं..

८. थर्ड पार्टी ॲपसाठी मल्टिपल कॅमेरा सपोर्ट्

आजकाल सगळ्या फोन्समध्ये ड्युअल कॅमेरा असतोच. आता या नव्या फीचरमुळे ॲप डेव्हलपर्स हे सगळे कॅमेरे वापरु शकतील आणि  विषेशत: मोबाईल शॉपिंगचा एक वेगळाच अनुभव आपल्याला येऊ शकतो.

९. सुधारित ऑटोफिल पासवर्ड फीचर

ऑटिफिल म्हणजे काय? तर आपण आधी कधीतरी एखाद्या फॉर्ममध्ये किंवा अशाच एखाद्या ठिकाणी भरलेली माहिती पुन्हा सजेशन म्हणून समोर येते. आताही हे फीचर सध्याच्या अँड्रॉईडमध्ये आहे. पण नव्या व्हर्जनमध्ये त्याची सुधारित आवृत्ती आपल्याला दिसेल.

१०. सेटिंग रिडिझाईन

इथं त्यांनी थोडे सौंदर्यदृष्टीच्या अनुषंगानं बदल केले आहेत. आताच्या आपल्या मोबाईलमध्ये सेटिंग मेन्यू अगदी बोरिंग आहे. नव्या व्हर्जनमध्ये तो जरा रंगीबेरंगी असेल. तसेच   सध्याच्या आपल्या फोनमध्ये व्हॉल्यूम बार वरती आडवा येतो. तो नव्या व्हर्जनमध्ये उभा आणि उजव्या बाजूला असेल.

 

चला तर मग वाट पाहूयात आपल्यासाठी ही ओएस कधी उपलब्ध होते याची...

सबस्क्राईब करा

* indicates required