computer

डोक्यावर पडून झाला संगीतकार !

एखाद्याला थेट मूर्ख आहेस का हे विचारण्यापेक्षा 'डोक्यावर पडलास का' ? असं विचारण्याची सध्याची फॅशन आहे ! दिवसातून एकदा तरी  हा डायलॉग कानावर पडत असतोच,नाही का ?पण आज जी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती नेमकी उलटी आहे , म्हणजे डोक्यावर पडून शहाणं होण्याची आहे !

ही गोष्ट आहे,डेरेक अ‍ॅमेटो नावाच्या माणसाची.या माणसानी एका उथळ स्विमींग पूलमध्ये सूर मारला आणि व्हायचं तेच झालं .त्याच्या डोक्याला म्हणजेच पर्यायाने मेंदूला मार बसला ज्याला डॉक्टरी भाषेत concussion म्हणतात.परीणामी त्याची श्रवणशक्ती ३५% कमी झाली.दुसरा परीणाम काही दिवसातच लाक्षात आला तो असा की त्याची संगीताची जाण अचानक अनेक पटीने विकसित झाली आणि कधीही पियानोशी सबंध ना आलेला  डेरेक अचानक पियानोची 'नोटेशन्स' म्हणजे 'धून' लिहायला लागला.पियानोच्या अशा प्रकारची नोटेशन्सची निर्मिती हा बरीच वर्षे रियाझ - सराव केल्यानंतर मोजक्याच व्यक्तींना अवगत होणारा प्रकार आहे.सध्या जगभरात या लायकीच्या जेमतेम ५० व्यक्ती आहेत.  डेरेक मात्र डोक्यावर पडून अचानक संगीतकार झाला.

 

हा काय चमत्कार होता ? डॉक्टरी भाषेत त्याला Savant syndrome  असे म्हटले जाते. 
Savant  हा शब्द फ्रेंच भाषेतल्या idiot savant या शब्दातून आलेला आहे.idiot savant म्हणजे शिकलेला मूर्ख किंवा पढतमूर्ख. Savant syndrom म्हणजे मेंदूला बसलेल्या मारामुळे किंवा इजेमुळे एखाद्या क्षमतेमध्ये होणारी वाढ. बर्‍याचदा या सिंड्रोमने प्रभावित असलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती अफाट वाढते. काहीजणांची क्षमता इतर क्षेत्रात वाढू शकते. उदाहरणार्थ काहीजण अचानक कॅलेंडर सॅव्हँट होतात.कॅलेंडर सॅव्हँट म्हणजे तारखा आणि वार अचूक सांगाणार्‍या व्यक्ती. काहीजण चित्रकार होतात , शिल्पकार होतात.  काही जणांची संगीताची जाण अचानक वाढते.डेरेकचे तेच झाले त्याच्या मेंदूला झालेल्या इजेमुळे तो अचानक संगीतकार झाला. म्हणून त्याची वर्गवारी musical  savant अशी करण्यात आली. 

 

अशा अनेक प्रकारच्या सॅव्हँटपैकी डॅनीयल टॅमेट या विलक्षण स्मरणशक्ती असलेल्या एका तरुणाची  कहाणी तर हैराण करणारी आहे. त्याला लहानपणी वारंवार फीट यायच्या. त्यानंतर त्याची स्मरणशक्ती अचानक वाढली. या स्मरणशक्तीचे एक उदाहरण वाचू या. पाय (π) ही संख्या आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे .आपल्याला πची किंमत ३.१४ इतकीच माहितीची आणि पुरेशी वाटते. पण २००४ साली डॅनीयलने π ही संख्या  दशांश चिन्हाच्या पलीकडे २२५१४ स्थळे घडाघडा म्हणून दाखवली. याखेरीज त्याला ११ भाषा अवगत आहेत. आइसलँडीक ही भाषा तो केवळ ७ दिवसात शिकला.

अशा अनेक विलक्षण व्यक्तिमत्वांची ओळख आपण नंतर कधीतरी करून घेऊच पण तूर्तास वाचकांसाठी एक महत्वाची सूचना !!
वेगवेगळे  Savant syndrom असलेल्या व्यक्तींमध्ये अर्ध्याहून अधिक लहान मुलं  autism (स्वमग्नता)ने ग्रस्त असतात, मुलांना हा त्रास जास्त होत असल्याची सांख्यिकी नोंद आहे.दहा लाखात एखाद्यालाच हा त्रास होण्याची शक्यता असते.तुमच्या बघण्यात  एखाद्या लहान बालकात असे विलक्षण गुण आढळले तर त्याचा संबंध दैवी चमत्कारासोबत न जोडता योग्य त्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा इतके वाचकानी लक्षात ठेवावे. 

सबस्क्राईब करा

* indicates required