विमानातल्या ऑक्सिजन मास्कमधला ऑक्सिजन इथून येतो बरं !!

तुम्ही कधी विचार केला आहे का, विमानात एमर्जन्सीच्या वेळी वापरण्यात येणारा ऑक्सिजन कुठून येत असावा ? साधारणपणे ऑक्सिजन बाहेरून पुरवण्याची वेळ आली तर त्यासाठी ऑक्सिजन टँक्स वापरले जातात. म्हणजे विमानात मोठमोठे ऑक्सिजन टँक्स असतात का ? खरं तर विमानात ऑक्सिजन टँक्स नसतात. एमर्जन्सीच्या वेळी वापरण्यात येणारा मास्क टँकशी जोडलेला नसतो. मग ऑक्सिजन येतं तरी कुठून ?

आज जाणून घेऊया विमानात ऑक्सिजन तयार कसा होतं ते...

स्रोत

जड ऑक्सिजन टँक्स घेऊन विमानाचं उड्डाण शक्य नसतं. त्यामुळे प्राणवायू मिळवण्यासाठी क्रिकेटच्या बॉलच्या आकारातील एका लहानशा डबीचा वापर केला जातो. आता तुम्हाला वाटेल की या डबीत ऑक्सिजन असेल ! पण त्या डबीत ऑक्सिजन नसतं. इथेच गंमत आहे राव. या डबीच्या आत असलेल्या एका रसायनाच्या आधारे ऑक्सिजन चक्क तयार केला जातो.

या डबीत ‘सोडियम क्लोरेट’ रसायन असतं. (याच रसायनाचा वापर कागद तयार करताना होतो.) सोडियम क्लोरेट उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर त्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते. विमानात आपल्या ऑक्सिजन मास्कला अशा प्रकारची डबी जोडलेली असते. हवाई सुंदरी ऑक्सिजन मास्क बद्दल सांगताना मास्क जोरदार हिसक्याने खेचायला सांगते. ते यासाठी की खेचल्यानंतर एक प्रकारची यंत्रणा काम सुरु करते आणि त्याद्वारे सोडियम क्लोरेटला उष्णता मिळते. या उष्णतेतून तयार झालेला ऑक्सिजन २० मिनिटापर्यंत टिकतो.

सोडियम क्लोरेट (स्रोत)

मंडळी, अशा प्रकारे ऑक्सिजनच्या भल्यामोठ्या टँक्सची जागा एका लहानशा डबीने घेतली आहे. याला म्हणतात वैज्ञानिक जुगाड !!

 

आणखी वाचा :

विमानाच्या खिडक्यांना असलेल्या या छिद्रामागाचे लॉजिक पटकन वाचून घ्या बरे !!

सबस्क्राईब करा

* indicates required