computer

डायनासोरच्या जीवाश्म गर्भामुळं आताचे पक्षी आणि डायनासोरच्या परस्परसंबंधांचं नक्की कोणतं रहस्य उलगडलंय??

डायनासोरबद्दलचे कुतूहल आजही तितकेच आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ त्यावर संशोधन करतच असतात. अलीकडेच पुरातत्व शास्त्रज्ञांना चीनच्या जिआंग्जी प्रांतातील गांझू शहरात असेच एक सुंदर गुपित सापडले आहे. काय आहे हे सुंदर गुपित माहितेय? एका डायनासोरचा जीवाश्म अवस्थेतला गर्भ!
या जीवाश्म गर्भामुळे पक्ष्यांचे प्रजनन आणि डायनासोरचे प्रजनन यांच्यातील दुवा शोधण्यात यश मिळेल असा दावा केला जात आहे.

डायनासोरची जीवाश्म अंडी तर नेहमीच सापडत असतात, पण बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या जीवाश्म शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच असे जीवाश्म अंडे सापडले आहे ज्यात डायनासमोरचा पूर्ण वाढलेला गर्भ जीवाश्म अवस्थेत आहे. तब्बल ७ कोटी वर्षापूर्वीचा हा गर्भ अजूनही उत्तम अवस्थेत असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. या गर्भाला संशोधकांनी बेबी यिंगलियांग नाव देण्यात आले आहे.

डायनासोरचा हा गर्भ दात नसलेल्या चोचीच्या थेरोपॉड प्रजातीशी संबधित असल्याचे संशोधकांचे मत आहे. या प्रजातीलाच ओविराप्टोरोसॉर असेही म्हटले जाते. हा यिंगलियांगचा गर्भ आणि पक्ष्याचा गर्भ यांचात बरेच साम्य आढळते. हा गर्भ दिसायलाही‌ तंतोतंत पक्षाच्या गर्भासार्खाच दिसतो. यावरून आजच्या पक्ष्यांची वैशिष्ट्ये ही त्यांना या प्रजातीच्या डायनासोरकडूनच मिळाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा भ्रृण जवळपास अंड्यातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत होता. कारण त्याचे डोके शरीराच्या खालच्या दिशेने वळले होते.

तसेही ओविराप्टोरोसॉर प्रजातीचा डायनासोरआणि सध्याचे पक्षी यांचा जवळचा संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. हे डायनासोरअजूनही उत्क्रांत होत होते. लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या उल्कापिंड आणि ‌पृथ्वीच्या‌ अपघाताच्या घटनेत इतर डायनासोरसोबतच त्यांचीही संपूर्ण प्रजाती नष्ट झाली.

हा बेबी यिंगलियांग २७ सेंमी लांबीचा आहे. सध्या यिंगलियांग स्टोन नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये तो जतन करून ठेवण्यात आलेला आहे. हा डायनासोर जर जन्मास आला असता तर नक्कीच तो तीन मीटरपर्यंत वाढला असता.

बेबी यिंगलियांगमुळे पक्ष्यांच्या उत्क्रांतीच्या टप्प्यातील काही महत्वाचा दुवा हाती लागू शकतो अशी आशा ठेवण्यास हरकत नाही.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required