computer

५७०० वर्षापूर्वीच्या च्युईंगमच्या आधारे त्याला खाणाऱ्या व्यक्तीचा शोध कसा लागला ?

तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकात वाचलं असेलच की अमुक एका ठिकाणी प्राचीन मानवाचे अवशेष सापडले. आता हा माणूस प्राचीन होता हे कसं समजतं? तर त्यासाठी हाडांमधून जीनोम मिळवला जातो. त्याच्या परीक्षणातून या गोष्टी समजतात. पण यावेळी पहिल्यांदाच शास्त्रज्ञांनी एका च्युईंगमच्यामधून तब्बल ५७०० वर्षे जुन्या मुलीचा जीनोम मिळवला आहे.

डेन्मार्कच्या लोलंड बेटावरील एका पुरातत्व उत्खननात हे च्युईंगम सापडलं होतं. आता तुम्ही म्हणाल की ५७०० वर्षापूर्वी च्युईंगम कुठून आलं? त्याचं असं आहे. हे च्युईंगम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बर्चच्या झाडापासून तयार केलाला डांबरासारखा पदार्थ होता.

जीनोम म्हणजे काय ?

अनुवांशिक आराखड्याला जीनोम म्हणतात. यात डीएनएची संरचना, त्यांचे स्थान, प्रकार, जाळे, क्रम, कार्य, विकृती इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. ज्या च्युईंगमबद्दल आम्ही बोलत आहोत त्या च्युईंगमवर मिळालेला जीनोम हा एका मुलीचा असल्याचं परीक्षणात सिद्ध झालं आहे.

या जीनोमवरून काय काय माहिती मिळाली.

ही मुलगी पश्चिम युरोपातील शिकाऱ्यांच्या जमातीतील असावी असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तिचा रंग सावळा होता, केसांचा रंग काळा होता, तर डोळे निळे होते. तिने मारण्यापूर्वी बदक आणि हेझेल झाडाचं फळ खाल्लं असावं असं या संशोधनात दिसून आलं आहे. दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे तिला दातांचा पीरियडॉन्टल आजार असावा. तसेच ती मोनोन्यूक्लिओसिस आजाराने ग्रस्त असावी.

तिचं वय किती होतं याबद्दल अजून ठोस माहिती मिळालेली नसावी, पण ती तरुण असावी असा एक तर्क आहे. शास्त्रज्ञांनी तिला लोला नाव दिलंय.

तिच्या एकूण माहितीवरून ती काहीशी अशी दिसत असावी.

मंडळी, इतिहासात पहिल्यांदाच ५७०० वर्षापूर्वीच्या एका लहानशा च्युईंगममधून एवढी मोठी माहिती मिळाली आहे. हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही.