आज रात्री या महायुतीकडेही लक्ष ठेवा !!

आधीच सांगतोय गैरसमज नकोत,आम्ही कोणत्याही राजकीय युतीबद्दल बोलत नाही आहोत.राजकीय युती तर पहाटे होऊन आणि रात्री संपू शकते.पण आम्ही म्हणतोय ती युती ८०० वर्षांनंतर घडून येते आहे. ही युती आहे आकाशस्थ गुरु आणि शनी या दोन ग्रहांची युती जी आज घडून येणार आहे.ही इतकी महत्वाची खगोल शास्त्रीय घटना आहे की आजचे गुगलच्या डुडलचा विषय पण गुरु शनी युती हाच आहे. या युतीत सहभागी असलेले ग्रह इतके मोठे आहेत की या युतीला 'महायुती'च म्हणावे लागेल. 

आधी आजच्या दिवसाबद्दल बोलू या ! आपल्या भारतीय कालगणनेप्रमाणे आज उत्तरायणाचा प्रारंभ होतो. ज्याला उत्तर गोलार्धात Winter Solstice म्हटलं जातं. Winter Solstice नेहेमी १९ ते २३ डिसेंबरच्या दरम्यान येतो. या वर्षी तो आज म्हणजे २१ डिसेंबर रोजी आहे. हा उल्लेख करायचं कारण असं की प्राचीन रोमन संस्कृतीत हा दिवस शनीचा समजला जातो. शनी ही कृषी देवता समजली जाते. याच दिवशी शनी आणि गुरु यांची युती व्हावी हा खगोलशास्त्रातला योगायोग आहे.

ही युती आज आकाशात बघायला गेले तर इतकी अंशात्मक आहे की दोन जुळे ग्रह एकाचवेळी दिसल्याचा भास होईल पण प्रत्यक्षात त्यांच्यामधील अंतर ४५ कोटी मैलांचे असेल.  २१ डिसेंबरला ही घटना घडत असल्याने काही ठिकाणी या युतीचा उल्लेख 'ख्रिसमस स्टार' असा केलेला दिसेल पण ते चुकीचे आहे . स्टार ऑफ बेथलेहेम हा वेगळाच नैसर्गिक चमत्कार होता ज्याचा आज होणार्‍या युतीसोबत काहीही संबंध नाही. 

 सूर्याभोवती फिरणारे सर्व ग्रह वेगवेगळ्या कक्षेत असतात. या कक्षेतून भ्रमण करताना ते एकमेकांच्या समोत येण्याच्या घटना अनेक वेळ घडत असतात. हे दोन्ही ग्रह दर २० वर्षांनी समोरासमोरून प्रवास करतात. असे जर असेल तर आज घडणारा हा योग वेगळा कसा ?  हे असे समोरासमोर येण्यात प्रत्येक वेळी काही अंशांचा फरक असतो. तो फरक या वर्षी नाही. म्हणून त्याला 'अंशात्मक पूर्ण युती' असे संबोधन आहे. 

आता दुसरा प्रश्न असा की अशी युती १६२१ साली घडली होती. तेव्हा या युतीला-ग्रेट कंजंक्शन -महायुतीअसे नाव देण्यात आले. मग हा योग ८०० वर्षात घडणारा योग असे सर्वजण का म्हणत आहेत ? त्याचे उत्तर असे आहे की रात्रीच्या वेळी घडून येणारी युती ८०० वर्षांनी  येते आहे. 

आता सकाळपासून अनेक फलज्योतिषी या युतीचे अनेक भविष्य कथन करत असतील पण हा बोभाटाचा विषय नाही. आम्ही फक्त ही युती आकाशात कशी बघावी याबद्दल नासाने तयारी केलेली फिल्म सोबत जोडत आहोत. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required