computer

५०००० वर्षांनंतर हा उनाड पाहुणा परत आलाय !

"मागच्या वेळी मी इथून गेलो त्यावेळी सगळं किती वेगळं दिसत होतं... सगळीकडे केवढं हिरवंगार होतं, अगदी माझ्या या रंगासारखंच! आणि आताची ही पृथ्वी काहीच्या काहीच वेगळी दिसते.. त्यावेळी मी पाहिलेले प्राणीही आता कुठे दिसत नाहीत, त्यांच्यासारखे दिसणारे दुसरेच कोणीतरी आहेत हे... ते सगळं कुठे गेलं? कुठे हरवलं?"

हे सगळं वाचून गोंधळात ना?  तर हे आहे एका धूमकेतूचं काल्पनिक स्वगत.तब्बल पन्नास हजार वर्षांनी तो परत एकदा पृथ्वीच्या भेटीला आलाय. आणि या वेळचा पृथ्वीवरचा नजारा त्याच्यासाठी नक्कीच खूप वेगळा आहे. आता दुसऱ्या बाजूला पृथ्वीवासीयांचं काय?
 

पन्नास हजार वर्षानंतर एक दुर्मिळ धूमकेतू पृथ्वीवरून दिसणार असल्याच्या बातम्यांनी सध्या खगोल निरीक्षकांचा उत्साह वाढवला आहे. हिरव्या रंगाचा हा दुर्मिळ धुमकेतू पृथ्वीपासून सध्या केवळ अडीच प्रकाशमिनिटं दूर आहे. आता हे प्रकाश मिनिट म्हणजे काय? तर एका मिनिटात प्रकाशाने कापलेले अंतर. प्रकाशाचा वेग प्रति सेकंद तीन लक्ष किलोमीटर आहे हे आपण शाळेत शिकलो आहोत. त्यामुळे अडीच प्रकाश मिनिटं हे अंतर 27 मिलियन मैल एवढं होईल. साध्या सोप्या भाषेत, म्हणजे किलोमीटरच्या भाषेत, हे अंतर होतं 43 दशलक्ष किलोमीटर.  या हिरव्या कॉमेंट च नाव आहे C 2022/E3 ZTF आणि तो दर पन्नास हजार वर्षांनी सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करतो.

आधी धूमकेतू म्हणजे काय हे जाणून घेऊ. धूमकेतू हे सौरमाला तयार होत असताना जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेदरम्यान तयार झालेले बाय प्रॉडक्ट्स आहेत.हे बहुतांश वायूने भरलेले असतात आणि आपल्या मागे ते विशिष्ट रंगाचा पट्टा सोडतात. हा पट्टाही त्यांच्या निर्मिती दरम्यान तयार होतो. वैज्ञानिकांच्या माहितीप्रमाणे, हा धूमकेतू धूळ आणि बर्फाने बनलेला आहे. 
आता याला हा हिरवा चमकदार रंग कुठून मिळाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा रंग येतो त्याच्या शीर्ष भागात असलेल्या कार्बन अणूच्या जोड्यांमुळे. शास्त्रज्ञांच्या मते, हा धूमकेतू दुर्बिणीच्या साह्याने तर बघता येईलच, पण नुसत्या डोळ्यांनीही तो दिसू शकेल. फक्त आकाश निरभ्र हवं. भारतात ओरिसामधून हा धूमकेतू सर्वात जवळून दिसू शकेल.
 

जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला या धूमकेतूचं आकाशात दर्शन घेता येणार आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी हे दोन दिवस तो पृथ्वीला सगळ्यात जवळ असणार आहे. चमकदार हिरव्या रंगाव्यतिरिक्त त्याची पिवळसर रंगाची शेपटी हेही या धूमकेतूचं आकर्षण आहे.
हा धूमकेतू गेल्या महिन्यात पहिल्यांदा दिसला, पण पृथ्वीपासून तो तुलनेने दूर असल्यामुळे त्याची चमक इतकी स्पष्ट जाणवत नव्हती. आता मात्र तो पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे आकाशात काही दिवस त्याची चमक अनुभवण्याचा आनंद घेता येणं शक्य आहे.
तुम्हाला जर आकाश दर्शनाची आवड असेल, दुर्मिळात दुर्मिळ अशा या घटनेचा साक्षीदार होण्याची इच्छा असेल तर जरूर या धूमकेतूचं दर्शन घ्या. काही नाही तर निदान 50,000 वर्षांपूर्वी या पृथ्वीवर राहणाऱ्या निअँडरथल या आपल्या पूर्वजांना जोडणारा एक दुवा अनुभवल्याचं अनोखं समाधान तरी मिळेल.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required