१८६८ साली हेलियमचा शोध भारतात गुंटूर आणि विजयदुर्ग या दोन ठिकाणी एकाचवेळी लागला.. त्याची ही गोष्ट

हेलियम नावाचा वायू माहीतच असेल. चवहीन, रंगहीन, वास सुद्धा नसलेला या वायू तसा माणसासाठी बराच उपयुक्त आहे बरं.. अवकाशयानांत किंवा थेटच सांगायचं तर अपोलोच्या अंतराळयानांत वायूरूपातला ऑक्सीजन आणि हायड्रोजन या दोघांना थंड ठेवण्यासाठी किंवा एम आर आय स्कॅनर्समध्येही कूलिंगसाठी तो वापरला जातो. झालंच तर उंचावर उडणारे  फुगेही हेलियमच्या मदतीनेच उडतात.

 आणि या इतक्या महत्वाच्या वायूचा शोध भारतात लागला?? कधी लागला? कुणी लावला??? अरे हो.. हो.. थांबा. आज सगळी उत्तरं तुम्हांला आम्ही देतो आहोत.. 

खग्रास सूर्यग्रहण तसं दर अठरा महिन्यांतून एकदा होतं, पण ते जगाच्या वेगवेगळ्या भागांत दिसतं. त्यामुळं पूर्ण खग्रास सूर्यग्रहण पाहाणं ही आयुष्यभरातली एक पर्वणीच असते.  म्हणजे या वर्षीचं खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेत, आणि तिथंही काही ठिकाणी पूर्णपणे तर काही ठिकाणी अर्धवट दिसलं. तसं ते १८६८साली भारतात पूर्णपणे दिसणार होतं. तेव्हा पिअर यान्सन (Pierre Janssen) या फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ हे ग्रहण पाहायला भारतात आला होता. तेव्हा खगोलशास्त्र आणि त्याच्या अभ्यासाला भलतीच डिमांड होती. त्यामुळं आजच्या तुलनेत वाहतुकीची आणि दळणवळणाची तुटपुंजी साधनं असतानादेखील हा फ्रेंचमन भारतात आला आणि त्यानं आताच्या आंध्रात असलेलं गांव निवडलं- गुंटूर!!

स्रोत

हेलियमचा शोध कसा लागला?
१८५९मध्ये गुस्ताव करचॉफ आणि रॉबर्ट बनसेन या दोघांनी एक महत्वाचा शोध लावला होता. एखादं मूलद्रव्य जळत असताना त्याची ज्योत कोणत्या रंगाची दिसते, यावरून त्या मूलद्रव्याचं बनांव ओळखण्याचा. त्यामुळं झालं काय, म्हणजेच विविध ग्रह्ताऱ्यांमधून निघणाऱ्या प्रकाशकिरणांवरून ते ग्रह-तारे कशांपासून बनले आहेत ते इथं पृथ्वीवर बसून आपल्याला कळू लागलं. आणि  सूर्य हा तसा उघड्या डोळ्यांनी पाहता न येणारा तारा. तो सूर्य इतर वेळी इतका प्रखर असतो की त्याच्या पृष्ठभागावरून निघणारे वेगवेगळ्या रंगांचे प्रकाशकिरण आपल्याला दिसू शकत नाहीत.  त्यामुळं सूर्यग्रहण हे सूर्याला आणि त्याच्या प्रभामंडळाला पाहाण्याची एक सुवर्णसंधीच! ती काही या आपल्या पिअर यान्सननं दवडली नाही.  त्यानं या सूर्यातून बाहेर पडणाऱ्या वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशकिरणांचा अभ्यास केला आणि त्यात त्याला एक वेगळाच पिवळा रंग दिसून आला. इतर शास्त्रज्ञांचं मत होतं की हा पिवळा रंग वायूरूपातल्या सोडियमचा आहे, पण यान्सनला असं वाटत नव्हतं. त्यानं लवकरच एक सुधारित खगोलदुर्बिण तयार केली आणि ग्रहणकाळाशिवाय इतर वेळी सूर्याचा अभ्यास करणं चालू केलं. 
गंमत म्हणजे त्याचवेळेस महाराष्ट्रातल्या विजयदुर्ग इथं सर जोसेफ नॉर्मन लॉकयर नावाच्या एक इंग्लिश खगोलशास्त्रज्ञानंही हे ग्रहण पाहिलं. पण पिअर यान्सनच्या पुढं जाऊन लॉकयरनं असं म्हटलं की हा पिवळा रंग देणारं मूलद्रव्य फक्त सूर्यात आढळतं आणि त्यानं या वायूरूपातल्या मूलद्रव्याला नांव दिलं- हिलियम, म्हणजेच ग्रीक भाषेत-सूर्य!! या घटनेची आठवण म्हणून विजयदुर्ग किल्ल्यावरच्या त्या जागेला साहेबाचे ओटे म्हणून घोषित केलं गेलं आहे.   दोघांनीही आपापले निष्कर्ष फ्रेंच ॲकॅडमी ऑफ सायन्सेसला पाठवले. योगायोगानं दोघांचेही अर्ज तिथं एकाच दिवशी पोचले आणि दुर्दैवाने ते दोन्ही निष्कर्षांचे अर्ज कुणी  काळजीपूर्वक विचारात घेतलेच नाहीत. 

स्रोत
पुढं तीस वर्षांनी  विल्यम रामसे या स्कॉटिश शास्त्रज्ञानं हिलीयम पृथ्वीवर इतर मूलद्रव्यांपासून वेगळा करण्याची पद्धत विकसित केली. जेव्हा त्याने हा वायू जाळला, तेव्हा त्या ज्योतीचा रंग आणि तरंगलांबी यान्सननं भारतात असताना १८६८साली शोधलेल्या वायूरंग आणि तरंगलांबीशी मिळतीजुळती होती. विल्यम रामसेना या शोधाबद्दल १९०४ सालचं रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिकही मिळालं.
 

रसायनशास्त्राच्या इतिहासात ही एक खूप मोठी घटना आहे आणि त्यात भारताचा उल्लेख अटळ आहे.