computer

सध्या बिटकॉईनची हवा जोरात आहे पण बिटकॉईन ही नेमकी काय भानगड आहे ?बिटकॉइनच्या जन्मापासून ते त्याच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर!

सध्या क्रिप्टोकरन्सीची फारच चलती आहे. सध्या टीव्हीवर तर सतत त्याबद्दलच्या जाहिराती चालूच असतात. त्यातही बिटकॉइनने तर लोकांना भुरळच घातली आहे. कमीतकमी कालावधीत जास्त परतावा देणाऱ्या या क्रिप्टोकरन्सीचा जन्म कधी आणि कसा झाला तुम्हाला महितेय का? बिटकॉइनच्या जन्मापासून ते त्याच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर!

साधारण २००८ पासून बिटकॉइनला सुरुवात झाली. २००८ नंतर फारसा कुठे चलनात नसलेल्या बिटकॉइनने २०१७ मध्ये चांगलीच उचल खाल्ली होती. गुंतवणूकदारांना बिटकॉइनने एक मोठी संधी दिली आहे. फक्त एका दशकाच्या वाटचालीत या बिटकॉइनने आश्चर्यकारक प्रगती केली आहे. मधल्या काळात बिटकॉइनला थोडी उतरती कळा लागली असली तरी आता पुन्हा एकदा बिटकॉइनचा आलेख चढत्या दिशेने जात आहे.

बिटकॉइनची प्रगती ही बाजाराची कार्यक्षमता आणि अर्थशास्त्राच्या नियमानुसारच सुरू आहे. ज्यावर कुणाचीही केंद्रीभूत सत्ता नाही असे हे एक मुक्त चलन आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही याला मान्यता आहे आणि ही नवी चलनपद्धती अतिशय सुरक्षित असल्याचेही मानले जाते. हल्ली मर्यादित स्वरूपात का असेना पण व्यापार उदिमातही याचा वापर सुरू आहे. अवघ्या काही वर्षांपूर्वी आलेल्या या क्रिप्टोकरन्सीला मिळणार प्रतिसाद पाहून आणखीही बऱ्याच अशा क्रिप्टोकरन्सीज बाजारात आले आहेत.

पण बिटकॉइनला नेमकी सुरुवात कधी झाली? तर ३१ ऑक्टोंबर २००८ रोजी सातोषी नाकामोटो या नावाच्या कुणा अज्ञात व्यक्तीने बिटकॉइनची सुरुवात केली. नाकामोटोने इंटरनेटवर एक लिंक टाकली ज्याला बिटकॉइन: अ पिअर-टु-पिअर इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टिम असे नाव दिले होते. आजही ही लिंक आणि त्याला जोडलेला एक पांढरा कोरा कागद इंटरनेटवर उपलब्ध आहे. या पेपरमधून नाकामोटोने बिटकॉइनची संकल्पना पुढे आणली. हे चलन विकेंद्रीत आहे, म्हणजेच यावर नियंत्रण ठेवणारा कुणी एकच नियंत्रक किंवा प्रशासक नाही, उलट याचे नियंत्रण जनतेच्याच हाती असेल. पिअर-टु-पिअर बिटकॉइन नेटवर्कच्या माध्यमातून एक व्यक्ती थेट दुसऱ्या व्यक्तीला कॉइन पाठवू शकते, यात दुसऱ्या कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही.

सुरुवातीला तरी या चलनाला काही अधिकृत किंमत नव्हती. त्यामुळे बिटकॉइन देऊन कोणतीही वस्तु खरेदी करणे शक्य नव्हते. पण २२ मे २०१० रोजी पहिल्यांदा फ्लोरिडातील एक व्यक्तीने १०,००० बिटकॉइन्स देऊन दोन पापा जॉन्स पिझ्झा खरेदी केली होते, ज्याची किंमत होती, २५$. या व्यवहारानंतर फैलयंडा बिटकॉइनची किंमत ठरली होती. ४ बिटकॉइन्स म्हणजे एक पेनी अशी ती किंमत होती. बिटकॉइनचे समर्थक २२ मे हा दिवस ‘पिझ्झा डे’ म्हणून सेलिब्रेट करतात.

त्यानंतर २०११ मध्ये बिटकॉइनच्या ब्लॉक चेनचे कोडिंग आणि मायनिंग करणाऱ्या कोडर्सनी बिटकॉइनचा दर ठरवण्यासाठी इथेरम आणि लाईटकॉइनसारखे नवे नेटवर्क उभारले. यामुळे बिटकॉइन जास्तीत जास्त लोकपर्यंत पोहोचू शकले. यामुळे बिटकॉइनची एक स्थिर किंमत ठरवणे सोपे गेले.
त्यानंतर बिटकॉइनद्वारे व्यवहार करण्यासाठी बिटकॉइन हे दुकान आणि मॉलमधूनही उपलब्ध होऊ लागले. या व्यवहारमुळे बिटकॉइनची किंमत ही डॉलर्सच्या तुलनेत ठरवली जाऊ लागली. २०१० मध्ये ज्या बिटकॉइनचा दर पेनीमध्ये होता, तोच दर २०१७ मध्ये २०,०००$ पर्यंत पोहोचला. तेव्हापासून आतापर्यंत बिटकॉइनने क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आपले स्थान बळकट केले आहे.

आता आपण बिटकॉइनच्या किंमतीचा प्रवास कसा झाला ते पाहू. सुरुवातीला तरी बिटकॉइनची किंमत ही १-२$ पेक्षाही खूपच कमी होती. २०११ मध्ये पहिल्यांदा बिटकॉइनला चांगली किंमत मिळाली आणि बिटकॉइनने ३१$पर्यंत मजल गाठली. त्यांनंतर दोनच वर्षात म्हणके २०१३ साली बिटकॉइनला २००$ इतका भाव मिळू लागला. २०१७ च्या डिसेंबरमध्ये बिटकॉइनला सर्वात जास्त म्हणजे १९६५०$ इतका भाव मिळाला आणि बिटकॉइनच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात उच्चांकी दर होता. त्यानंतर काही काळ बिटकॉइनचे भाव पुन्हा कोसळले.

इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे पुन्हा एकदा सर्वांना बिटकॉइनची भुरळ पडली आहे. अगदी आपल्या शेजाऱ्यापासून ते देशातील मोठमोठ्या उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच बिटकॉइनविषयी क्रेझ आहे. बिटकॉइन असो किंवा दुसरी कुठली क्रिप्टोकरन्सी लोक आता याबाबत अधिकाधिक जागृत होत आहेत.

२०२० च्या जागतिक महामारीचा काळ तर बिटकॉइनसाठी वरदानच ठरला या काळात बिटकॉइनने
 $६६००० डॉलर्सपर्यंत उचल खाल्ली आणि बहुतांश बँकांनी देखील आता क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली आहे. बिटकॉइनने अवघे जग पादाक्रांत केले असले तरी या बिटकॉइनचा निर्माता असलेला तो सातोषी नाकामोटो कोण याचे कोडे मात्र अजूनही उलगडलेले नाही. सातोषी कोण असावा याबद्दल बरेच आराखडे आणि अंदाज बांधण्यात आले असले तरी त्याबाबत निश्चित माहिती कोणालाच मिळालेली नाही.

हा सातोषी नाकामोटो जगापुढे का येत नाही यावरून ही अनेक अंदाज मांडण्यात आले आहेत. काही लोकांच्या मते बिटकॉइन हे एक नवे जाळे असून बाजारात जशा वेळोवेळी अनेक फ्रॉड स्कीम्स येतात आणि हवा तेवढा पैसा मिळवला की बोऱ्या-बिस्तरा गुंडाळून गायब होतात, अगदी असेच बिटकॉइन हेही एक भले मोठे जाळे आहे. या जाळ्यात हवी तेवढी रक्कम सापडेपर्यंतच हा व्यवहार सुरू राहील. त्यानंतर जसा हवेतच या क्रिप्टोकरन्सीचा मनोरा उभारला आहे, तसाच एक दिवस तो कोसळणार आहे. लोकांना याचा फटका बसण्यापूर्वीच तो सातोषी नाकामोटो कोण याचाही शोध एकीकडे सुरू आहेच.

तर काही लोकांच्या मते आज जरी हे चलन पूर्णतः मुक्त असले तरी ठराविक काळाने यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईलच. अर्थात, अशा शंका कुशंका तर निर्माण होणारच आहेत, पण सध्या तरी बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीचा हा धावता वारू कोणी रोखू शकेल असे वाटत नाही.

बिटकॉइनचे भविष्य काय असेल?
पुढे जाऊन हे चलनही स्थिरस्थावर आणि अधिकृत होईल, याचा वापर वाढेल, यासारख्या आणखी नवनव्या क्रिप्टोकरन्सीज उदयाला येतील. अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. तर एकीकडे हे फॅड जास्त दिवस टिकणार नाही, असेही काही जणांचे मत आहे. झपाट्याने वर जाणाऱ्या गोष्टी तितक्याच झपाट्याने खालीही येतात, त्यामुळे बिटकॉइन असो किंवा आणखी कुठली क्रिप्टोकरन्सी आज तिचा प्रसार आणि किंमत दोन्ही वाढत असले तरी, उद्याचे कोणी निश्चित भाकीत वर्तवू शकत नाही, असेही म्हटले जाते.

सध्याच्या घडीला तरी बिटकॉइनची चलती आहे, उद्या राहील की संपेल याबाबत येणारा काळच उत्तर देऊ शकेल. तुम्हाला काय वाटते? कमेन्टच्या माध्यमातून नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required