या पातळ चिपटीत बसतात तब्बल ३३ करोड पुस्तकं !!!

आयबीएम या टेक्नोलॉजी कंपनीने नुकतंच एक आश्चर्यकारक घोषणा केली आहे. प्रत्येकी एका इंच जागेत २०१ गिगाबाईट्स मेमरी असलेला ३३० टेराबाईट्सची चिप त्यांनी तयार केली आहे. या चिपटीत तब्बल ३३ कोटी पुस्तके बसतील इतकी जागा आहे मंडळी...

या चिपटीचा आकार अगदी पातळ टेपसारखा आहे. मेमरी साठवण्याच्या या प्रकाराला ‘टेप ड्राईव्ह’ म्हणतात. पूर्वी आपल्याकडे कॅसेट टाकून गाणं ऐकण्याची पद्धत होती, एक बाजू ऐकून झाली की कॅसेट पालटून दुसऱ्या बाजूने दुसरा अल्बम सुरु व्हायचा. त्या कॅसेट मध्ये जी पातळ सेलो टेप सारखी पट्टी असायची, त्याच पट्टीचं हे अॅडव्हांस रूप आहे. ही ‘टेप ड्राईव्ह’ टेक्नोलॉजी ६० वर्षांपूर्वी शोधली गेली आणि आता त्यात अनेक बदल झालेत.

स्रोत

सोनी आणि आयबीएम या दोन कंपन्यांनी मिळून यावर काम केलं आहे. २०१५ साली यात पूर्वीपेक्षा सुधारणा केली गेली होती. पण त्यावेळी फक्त २२० टेराबाईट्स (TB) क्षमतेची जागा चिपमध्ये होती. आता मात्र यात ३३० टीबी एवढी मोठी जागा आहे.

तुम्हाला गिगाबाईट्स, टेराबाईट्स समजत नसतील तर आम्ही एक साधं उदाहरण देतो. समजा आपल्या फोनची मेमरी १६ जीबी आहे. त्यात साधारणपणे ४००० गाणी बसण्याची क्षमता आहे असं जर आपण गृहीत धरलं, तर अश्या १००० जीबीने मिळून तयार झालेल्या १ टीबी (टेराबाईट्स) मध्ये २,००,००० गाणी बसतील. आणि मंडळी, आम्ही ज्या चिपटी बद्दल बोलतोय ती तर तब्बल ३३० टीबी एवढी आहे . मग विचार करा, त्यात किती गाणी बसतील ?? विचार करून डोकं फुटेल राव.

१०९८ मीटर लांबीच्या या टेपवर अजूनही काम चालू आहे आणि पुढे काही काळात तिचा वापर सुरु होण्याची शक्यता आहे. मंडळी, या क्रांतिकारी शोधामुळे हार्ड डिस्क बाळगण्याची झंजट संपेल आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त माहिती साठवून ठेवता येईल. आयबीएमने सांगितल्याप्रमाणे क्लाउड स्टोरेजसाठी याचा वापर महत्वाचा ठरेल.

सबस्क्राईब करा

* indicates required