computer

रासायनिक खते की सेंद्रिय खते ?या प्रश्नाचे उत्तर समजण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझरबद्दल तुम्ही वाचलेच पाहीजे

ज्यांना काहीतरी करून दाखवायचे असते, त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा असतो, असे म्हटले जाते. एखाद्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायला वयाची अडचण आडवी येत नाही हे सिद्ध करून दाखवणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात दिसून येतात.वयाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत संघर्ष करणारे देखील नाविन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून यशस्वी झाले याच्या अनेक कथा सांगता येतील. जगात वाढलेली प्रचंड स्पर्धा आणि नवनवीन तंत्रज्ञान यामुळे इंटरनेटपूर्व युगात वाढलेले यात टिकाव धरू शकत नाहीत हा देखील समज खोडून निघू शकतो. काही जेष्ठ नागरिक हेही सिद्ध करत आहेत.

जयंत बर्वे यांचे उदाहरण देखील काहीसे असेच आहे. फिजिक्समध्ये शिक्षण घेतलेले बर्वे कधीकाळी कीटकनाशकांचा व्यवसाय करत असत. त्यांनी काढलेल्या केमिकल कंपनीच्या मार्फत त्यांचा व्यवसाय भरभराटीला लागला होता. त्यावेळी त्यांचे वय ४२ होते, १९८५ साली सुरू केलेला हा व्यवसाय चांगला चालला होता.

पण ज्यांच्या अंतर्मनात उर्मी असते, त्याना काहीतरी वेगळे करण्यासाठी एखादी छोटी घटना देखील पुरते. या बर्वेंचेही सर्व काही सुरळीत चालले होते. एक दिवस एका माणसाने त्यांच्याकडे येऊन पिकांवर बसणारे पक्षी मरतील अशा कीटकनाशकाची मागणी करू लागला. ही मागणी तसे बघायला गेले तर विशेष नाही, पण या गोष्टीने बर्वे यांना चांगलेच विचारात टाकले.

त्यांनी बराच विचार केल्यावर जैविक खतांवर भर द्यायचा निर्णय घेतला. हे करणे देखील सोपे नव्हते. पण मुळातच प्रयोग करण्याचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी स्वतःपासून सुरुवात करायचे ठरवले. स्वतःच्या नापीक जमिनीत त्यांनी आधी या सेंद्रिय खतांचा वापर करून बघितला. स्वतःच्याच शेतात केलेला प्रयोग यशस्वी झाला. त्यांची जमीन कमालीची सुधारली. त्यांनी मग या जमिनीवर विविध पिके घ्यायला सुरुवात केली.

अनेक फळांच्या बागा त्यांच्या शेतात दिमाखात उभ्या राहिल्या, यात चिकू, द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी या बाजारात प्रचंड मागणी असणाऱ्या फळांचा समावेश होता. साहजिक स्वतःच्या शेतात केलेल्या सेंद्रीय शेतीचा प्रयोग बघून इतरांनी देखील त्यांचे अनुकरण करत त्यांच्यापासून हे सेंद्रिय खत मागवायला सुरुवात केली. त्यांनी मग १९९१ साली कीटकनाशकांचा व्यवसाय बंद करत पूर्णवेळ सेंद्रीय शेतीवर भर द्यायला सुरुवात केली.

दरवर्षी त्यांच्या खताला असलेली मागणी वाढत गेली. आज त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायाला ३० वर्षे होऊन गेली आहेत. आज त्यांचे वय तब्बल ७७ वर्ष आहे. या वयात देखील ते तेवढ्याच तडफेने काम करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून ते कोट्याधीश झाले आहेत. वर्षाला १० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून मिळत असते.

त्यांच्या जैविक खताला देशाच्या कानाकोपऱ्यातुनच नाही, तर परदेशातून देखील मागणी येत असते. यावरून त्यांनी केलेल्या सेंद्रिय खताच्या प्रयोगाचे महत्व लक्षात येईल. वयाचा एक टप्पा उलटून देखील त्यांनी नवा प्रयोग करायला आणि चांगला चाललेला व्यवसाय बंद करून नवा व्यवसाय उभा करायला विचार केला नाही.

या सेंद्रिय खतांच्या व्यवसायाने त्याना मात्र कोट्याधीश केले. जयंत बर्वे यांची ही गोष्ट अनेक नव्याने उद्योगात तेही शेती आणि शेतीपूरक उद्योगात प्रवेश करू इच्छिणाऱ्या अनेक तरुणांसाठी देखील मोठी शिकवण देणारी आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required