computer

या जोडप्याने केवळ प्रयोगासाठी पोटच्या मुलाला चिंपांझीसोबत वाढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य वाटतो का ?

माणूस आणि प्राण्यांचे नाते हे नेहमीच एकेमेकांशी 'कनेक्टेड' म्हणावे असे राहिले आहे.कधी माणसांमध्ये राहून प्राणी माणसाळतात तर कधी प्राण्यांमध्ये राहून माणूस प्राण्यांसारखे वागायला लागतो.(उदाहरणार्थ- कुत्रा आणि मांजर हे दोन्ही प्राणी माणसांच्या सहवासात राहून दूध प्यायला शिकले आहेत.) टारझन, मोगली या सिनेमांमध्ये आपण याबद्दल बघितले असेल.पण आज आम्ही अशा एका प्रयोगाबद्दल सांगणार आहोत,ज्याने या विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण पूर्णपणे बदलू शकतो. 

मानसोपचार तज्ञ असलेल्या विंथ्रॉप केलॉग आणि त्यांची बायको लुयला केलॉग यांना मानवी वागणूक, त्यांचा स्वभाव इत्यादी गोष्टींबद्दल प्रचंड कुतूहल होते. या कुतुहलापोटी मात्र त्यांनी जरा चांगलाच धाडसी प्रयोग केला. या जोडप्याच्या लहान बाळाचे नाव डोनाल्ड. यांच्या डोक्यात एक विचार आला. जर का डोनाल्ड आणि चिंपांझी एकाच घरात मोठे झाले,त्यांना सारखे संस्कार,सारखी देखरेख मिळाली तर हा चिंपांझी माणसात येऊ शकतो का?

आता हे शास्त्रज्ञ लोक आपल्या कुतूहलापोटी काय काय कुटाणे करतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांनी चक्क एक मादी चिंपांझी आपल्या घरी आणली. तिचे नाव गुवा ठेवले आणि आपल्या मुलाच्या बरोबरीने तिचे संगोपन करायचे ठरवले. गुवा घरी आणली तेव्हा ती ७ महिन्यांची होती तर डोनाल्ड १० महिन्यांचा होता. त्यांचा हा प्रयोग ५ वर्ष चालणार होता. या ५ वर्षात ते या चिंपांझीचा माणसांमध्ये राहून झालेल्या बदलांचा अभ्यास करणार होते. 

हा प्रयोग १९३१ साली सुरू करण्यात आला. दोघांना समान वातावरण पुरविण्यात आले. सारखे, जेवण, एकाच अंथरुणावर झोपवणे, एकाच प्रकारचे खेळणे देणे एवढेच काय ते चुकले तर शिक्षा पण सारखीच देणे असा प्रयोग करण्यात आला. त्यांनी प्रत्येक गोष्ट बारकाईने टिपून ठेवली दोघांमधील ब्लड प्रेशर, मेमरी, शरीराची वाढ, भय, अडचणी सोडविण्याची क्षमता अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. 

या जोडप्याने चिंपांझीमध्ये झालेले बदल बघण्यास सुरुवात केली. मात्र बदल बघून त्यांना धक्काच बसला. चिंपांझी माणसांमध्ये येणे बाजूला राहिले, त्यांचा मुलगा चिंपांझी सारखा वागायला लागला. त्याचे हावभाव बऱ्यापैकी चिंपांझी सारखे व्हायला लागले. मुलगा मोठा होत होता तसा त्याला माणसांची भाषा येत होती. पण चिंपांझीवर काही भाषेचा परिणाम होणे शक्य नव्हते. उलट गुवा नावाची ही चिंपांझी दिवसेंदिवस ताकदवर होऊ लागली. 

सुरुवातीला गुवाने माणसांच्या या सर्व गोष्टी लवकर शिकून घेतल्या, पण एका कालावधी नंतर मात्र तिच्यावर काही फरक पडला नाही. यातून एक गोष्ट समोर आली कोणी कशीही वागणूक दिली आणि कशाही वातावरणात ठेवले तरी आनुवंशिक गोष्टी बदलणे शक्य नसते. गुवा ही चिंपांझी होती आणि शेवटी ती चिंपांझी सारखीच वागणार होती, तिला माणसात आणून फायदा नव्हता. 

पण काही असले तरी हा प्रयोग इतिहासात याविषयी केलेला सर्वात यशस्वी प्रयोग समजला जातो. पुढे ५ वर्ष नाहीतर ९ महिन्यांनीच या केलॉग जोडप्याने गुवाला त्याच्या पूर्वीच्या ठिकाणी एका पार्कमध्ये परत पाठवले, त्यांना गुवामुळे आपल्या मुलाला शारीरिक धोका होण्याची भीती वाटू लागली होती. 

यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे प्राणी माणसांमध्ये राहून थोडाफार बदलू शकतो तसेच माणूस देखील थोडाफार बदलू शकतो.पण दोघांचे जे मूळ असते त्यात विशेष फरक पडणे शक्य नसते. 

-उदय पाटील
 

या प्रयोगाची झलक या व्हिडिओ क्लिपमध्ये बघा

सबस्क्राईब करा

* indicates required