computer

शब्द : अनेक अर्थ -नेमका उपयोग -वाचा आणि शिका

१ मे म्हणजे महाराष्ट्र दिन! या निमित्ताने पुन्हा एकदा मराठीचा अभ्यास आणि मराठी भाषेचा प्रचार करण्यासाठी 'शब्द :अनेक अर्थ -नेमका उपयोग या पुस्तकाचे हक्क फुलराणी प्रकाशनाकडून बोभाटाने घेतले आहेत .आता हे पुस्तक क्रमश: बोभाटावर प्रकाशित करण्याचा आमचा मनसुबा आहे. 
बाजारात इतके नानाविध प्रकारचे शब्दकोश असताना शब्दांवर आणखी वेगळे पुस्तक कशासाठी ?
या प्रश्नाचे उत्तर असे की,शब्दकोशात आपल्याला शब्दाचा अर्थ कळतो. म्हणजे तरी काय ? तर त्या शब्दाचे निरनिराळे पर्यायी शब्द कळतात. परंतु हे पर्यायी शब्द मूळ शब्दाचा अर्थ पूर्णांशाने सांगतात का ? अर्थातच नाही.शब्दाचा अर्थ पूर्णांशाने समजण्यासाठी त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखवला पाहिजे या उर्मीतून हा शब्दबहर फुलत आहे. 
चला तर ,आजचा पहिला धडा वाचूया !
अचानक, अकस्मात, अनपेक्षित, अकल्पित......

शब्दसिध्दी काही आपल्याला अचानक लॉटरी लागावी तशी एकाएकी प्राप्त होत नाही.देवी सरस्वती अकस्मात प्रकट व्हावी आणि तिने आपल्या मस्तकावर हात ठेवावा असे काही होणार नाही.शब्दसिध्दीच्या बाबतीत अनपेक्षित वा अकल्पित असे काही घडणार नाही.

वरील परिच्छेदातील जाड ठशातले शब्द व्यवहारात आपण ढोबळपणे सारख्याच अर्थाने वापरतो.
उदाहरणार्थ-
१ 'काल आमच्याकडे पाहुणे अचानक आले.'
२'आज सकाळी आम्ही घराबाहेर पडणार तेवढ्यात अकस्मात आमचे काका दारासमोर दत्त म्हणून हजर !'
३ 'रात्री आकाशात पाहतो तो नवा तारा अगदी अनपेक्षितपणे मला दिसला!'
४ 'परवा जे काही घडलं ना, ते अगदी अकल्पित!
 

आता व्यवहारात हे शब्द'एकाएकी','एकदम' या ढोबळ अर्थी वापरले आहेत.पण या शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थछटा कोणत्या ? 
१ अचानक > एकाएकी
२अकस्मात > ' अ+कस्मात'. ज्याचा उगम किंचा सुरुवात कोठून झाली हे सांगता येणार नाही असा.
३ अनपेक्षित > अपेक्षा न केलेले.
४ अकल्पित > कल्पना न केलेले.
वरील अर्थ लक्षात घेऊन आता वर दिलेला परिच्छेद पुन्हा वाचा. 
काय ,वरील चार शब्दांचे वेगळेपण लक्षात आले ना ? मग तर तुमची जबाबदारी वाढली !!

सबस्क्राईब करा

* indicates required