computer

आफ्रिकेतल्या या तलावाला जगातला सगळ्यात धोकादायक तलाव मानलं जात!! कसा बनला हा तलाव धोकादायक?

निसर्ग अद्भुत आहे आणि त्याची लीलाही अगाध आहे. या निसर्गातच आहेत नदी, तलाव, ओढे, समुद्र ही पाण्याच्या साठ्याची कितीतरी रूपे. ही सारी एकूणच जीवसृष्टीसाठी वरदान आहेत. पण कधीकधी याच नदीला, तलावाला, ओढ्याला, जेव्हा पूर येतो तेव्हा मात्र अगदी नकोनकोसे होऊन जाते. नदीला, तलावाला किंवा ओढ्याला आलेला पूर केव्हा तरी ओसरतो म्हणून ठीक आहे हो, पण समजा एखाद्या तलावात जर पाण्यात मिथेन, कार्बनडाय ऑक्साईड, हायड्रोजन असे स्फोटक वायू तयार झाले तर?

तलावातील पाण्यात अशी स्फोटके तयार होतात हे कदाचित ऐकायला तुम्हाला नवल वाटत असेल. पण असा एक तलाव या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. या तलावात कधीही नैसर्गिकरीत्याच प्रचंड मोठा स्फोट होऊ शकतो. या तलावाचे नाव आहे किवू. हा आफ्रिकेतल्या रवांडा आणि द डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या दोन देशांच्या बरोबर मध्ये वसला आहे.

हा किवू तलाव दीड हजार फूट खोल आहे. तसा हा इतर कुठल्याही तलावांपेक्षा अगदी वेगळा आहे. हिवाळ्यात जेव्हा वातावरण थंड होते किंवा पावसाळ्यात जेव्हा पावसाच्या पाण्यासोबत बर्फही वाहून येतो तेव्हा अर्थातच तलावात मिसळणाऱ्या पाण्याचे तापमान हे कमी असते. कुठल्याही तलावात जेव्हा असे कमी तापमानाचे पाणी येऊन मिसळते किंवा तलावाच्या भोवतालचे तापमान कमी होते तेव्हा तलावातील आतील उबदार पाणी वर येते आणि अतिथंड पाणी खाली जाते. उबदार पाण्याची घनता ही थंड पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने ते पाणी वर तरंगणार हे तर आपल्यालाही माहिती आहे. पण किवू तलावाच्या बाबतीत मात्र असं अजिबात होत नाही. या तलावातील पाणी बाहेरून येणाऱ्या पाण्याला स्वतःमध्ये सामावूनच घेत नाही, त्यामुळे थंड पाणी वर आणि गरम पाणी खाली असा इथे प्रकार घडतो. किवू तलावातील हा प्रकार पाहून सुरुवातीला शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटले होते.

आफ्रिकन खंडाच्या या भागात भूगर्भातल्या हालचालींमुळे पृथ्वीवरील शिलावरण काहीसे पातळ झाले आहे. किवू तलावाच्या तळातही असाच शिलावरणाचा पातळ थर आहे. त्यामुळे या तलावाच्या तळातून काही स्फोटक वायू पाण्यात मिसळले जातात. या तलावाच्या सर्वात खालच्या स्तरातील पाणी हे अत्यंत उष्ण असते आणि त्यात कार्बनडाय ऑक्साईड आणि मिथेन वायूचे प्रमाण अत्याधिक आहे. शिलावारणाचा थर पातळ असल्याने हे क्षेत्र तीव्र भूकंपप्रवण आहे. अर्थातच, तलावाच्या तळाशी ज्या भूगर्भीय हालचाली होतात त्याचा परिणाम तलावाच्या पाण्यावरही होतो.

 

तलावाच्या पाण्यात आढळणारे काही सूक्ष्मजीवजंतू कार्बनडाय ऑक्साईडचा वापर करून त्यात आणखी मिथेन वायू सोडतात. तलावाच्या तळाशी निर्माण होणाऱ्या अतिरिक्त दाबामुळे हे वायू पाण्यात विरघळले जातात. त्यामुळे हे पाणी वर येण्याऐवजी तळाशीच राहते. तसेही या तलावात जसजसे खाली जाईल तसा पाण्याचा खारटपणा वाढत जातो. त्यामुळे या तलावात पाण्याचे वेगवेगळे स्तर निर्माण झाले असल्याचे मिनेसोटा विद्यापीठाचे भूगर्भ अभ्यासक सर्गी कात्सेव्ह यांचे मत आहे. या प्रत्येक स्तरातील पाण्याची घनता वेगवेगळी आहे. एकाच तलावात वर्षानुवर्षे हे पाणी एकत्र आहे, तरीही त्यांचा एकमेकांवर काहीच परिणाम होत नाही. शास्त्रज्ञांनाही याचे प्रचंड कुतूहल आणि आश्चर्य वाटते.

पाण्याचे असे हे विचित्र स्तरीकरण आणि तळाशी साचत चाललेले कार्बनडाय ऑक्साईड आणि मिथेन यामुळे भविष्यात कधी ना कधी तलावाचे हे पाणी अतिशय घातक बनणार आहे. या ठिकाणी भूकंप झाला तर हा तलावाच्या पाण्यातला मिथेन आणि कार्बनडाय ऑक्साईड आजूबाजूच्या वातावरणात मिसळेल आणि या परिसरातल्या लाखो लोकांच्या प्राणांवर बेतू शकते. हा काही फक्त शास्त्रज्ञाचा अंदाज नाही, तर असे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत.

किवूपासून १४०० मैल अंतरावर असलेल्या कॅमेरून जवळील न्योस तलावही किवूसारखाच आहे. उलट तो तलाव तर आकाराने आणि खोलीने किवूपेक्षाही लहान आहे. पण त्या तलावाच्या तळाशी उत्सर्जित होणाऱ्या मिथेन आणि कार्बनडाय ऑक्साईड वायुमुळे तिथे २१ ऑगस्ट १९८६ रोजी असाच स्फोट घडून आला आणि आजूबाजूच्या गावातील १८०० लोकांना याचा फटका बसला. गॅसवरील दूध जसे अति उष्णता दिल्याने उतू जाते अगदी तसाच प्रकार या तलावाबाबत घडला होता. अचानकच तलावातील पाणी बाहेर ओसंडून वाहू लागले. अशा प्रकरांना शास्त्रीय भाषेत लीम्निक भूकंप म्हणतात. जर किवूच्या बाबतीतही असाच प्रकार घडला तर ती पृथ्वीवरील एक सर्वात मोठी आणि महाभयंकर आपत्ती ठरेल असे शास्त्रज्ञांचे मत आहे. न्योस तलाव तर फक्त एक मैल रुंद आणि ७०० फुट खोल आहे. किवू ५५ मैल लांब, ३० मैल रुंद आणि न्योसच्या दुपटीने खोल आहे. मग याच्या परिणामांची व्यापकता किती मोठी असेल याचा विचार करा.

किवूबाबत काय करता येईल यावर विचार करताना काही संशोधकांना वाटते की किवूच्या तळाशी साचणारा कार्बनडाय ऑक्साईड बाहेर काढून त्यापासून जर विद्युत निर्मिती केली तर कदाचित हा प्रकार टाळता येईल. शास्त्रज्ञांच्या एका गटाने हा प्रयोग सुरुही केला आहे. भूकंपाच छोटासा धक्का बसला तरी किवूतील पाणी उतू जाऊन त्याच्या तळाशी साचलेल्या कार्बनडाय ऑक्साईड आणि मिथेन बाहेरच्या हवेत मिसळला जाऊ शकतो.

शास्त्रज्ञांचा एक गट सध्या सातत्याने या परिसराचा अभ्यास करत आहे आणि ते किवूवर लक्ष ठेवून आहेत. तलावातील कार्बनडाय ऑक्साईड आणि मिथेनचे प्रमाण कमी करण्यासाठी काय काय करता येईल हेही प्रयोग सुरु आहेत. शिवाय बाहेरून तलावात कार्बनडाय ऑक्साईड किंवा मिथेन मिसळला जाणार नाही याचीही हे शास्त्रज्ञ खबरदारी घेत आहेत.

तलावातील कार्बनडाय ऑक्साईड आणि मिथेन बाहेर काढण्यात जर यश आले तर आज एक भयंकर आपत्तीचे भांडार वाटणारा हाच किवू तलाव एका सोन्याच्या खाणीपेक्षाही मौल्यवान ठरू शकतो. याच वायूंचा वापर करून ऊर्जा निर्मिती करण्याचा पकल्प उभारण्यात आला तर किवू परिसरातील लोकांची उर्जेची समस्या कायमची निकालात निघू शकते.

२००८ पासून रवांडाने यावर काम देखील सुरु केले आणि त्यांनी किवू तलावाच्या काठावर एक प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात तलावातील मिथेन वायू बाहेर काढून त्यापासून नैसर्गिक वायू (Gas) तयार केला जातो आहे. तलावाच्या तळाशी असलेला मिथेन वायू शोषून घेण्यासाठी त्यात पाईप टाकण्यात आल्या असून त्या पाईपद्वारे हा वायू दूरपर्यंत नेला जातो आणि त्यापासून विद्युत निर्मिती केली जात आहे. अशाने मिथेन वायूची गळती होण्याचा संभाव्य धोका कमी होऊ शकतो पण तो टाळला जाऊ शकत नाही.

शास्त्रज्ञांच्या या प्रयत्नांमुळे किवूचा धोका आणखी वाढेल की कमी होईल? तुम्हाला काय वाटते? कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required