computer

लोमाशिया टास्मानिका: तब्बल ४३,६०० वर्षे जुनी वनस्पती? कुठे आढळते हे झाड, वैशिष्ट्ये काय आहेत?

काही वनस्पतींचे आयुष्य फक्त काही तासांचे असते, तर काही वनस्पती मात्र शेकडो वर्षे जगतात. हे तर तुम्हाला माहिती असेलच, पण हजारो वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेली वनस्पती तुम्ही कुठे पहिली आहे का? पृथ्वीवरील सर्वात जुन्या वनस्पतीचे वय किती, तिचे नाव काय आणि ती सध्या कुठे आढळते तुम्हाला माहिती आहे?

लोमाशिया टास्मानिका ही पृथ्वीवरील सर्वात जुनी वनस्पती आहे. पृथ्वीवरील सर्वात जुनी मानली गेलेली ही वनस्पती सुमारे ४३,६०० वर्षांपासून पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकवून आहे, म्हणूनच तिला पृथ्वीवरील सर्वात जुनी वनस्पती म्हटले जाते. या वनस्पतीला गुलाबी रंगाची छोटी नाजूक फुले येतात, पण तिला फळ लागत नाही किंवा फुलही तयार होत नाही. या झाडाची वाढही खूपच हळूहळू होते. थोडेसे मोठे झालेल्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली की ती त्याच ठिकाणी रुजते आणि तिथे याचप्रकारचे नवीन झाड उगवते. अशाप्रकारे हे झाड स्वतःच स्वत:ची पुनर्निर्मिती करत असते. आज या प्रकारची फक्त ३०० झाडे पृथ्वीवर आढळतात तीही एकाच ठिकाणी. त्यामुळे कालांतराने इतर वनस्पती आणि प्राण्याप्रमाणे ही वनस्पतीही नामशेष होणार की काय अशी शास्त्रज्ञांना भीती वाटते. या वनस्पतीच्या संवर्धनासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, पण त्यांच्या कुठल्याच प्रयत्नांना अजूनपर्यंत तरी यश मिळालेले नाही.

खरेतर इतकी जुनी वनस्पती या पृथ्वीवर अस्तित्वात आहे हेच आतापर्यंत कुणाला माहीत नव्हते. १९३४ साली या वनस्पतीची मानवाला ओळख झाली. ऑस्ट्रेलियातील चार्ल्स डेनिसन किंग नावाचा एक खाण कामगार बाथरस्टच्या डोंगर पायथ्याला खणण्याचे काम करत असताना त्याला एक एक वेगळ्या प्रकारचे झाड दिसले. इतरत्र कुठेच न आढळणारी ही वनस्पती फक्त त्याच ठिकाणे दाटीवाटीने वाढली होती. किंग स्वतः निसर्गअभ्यासक असल्याने ही वनस्पती लोमाशिया प्रजातीतील आहे हे त्याच्या लक्षात आले. लोमाशियातील हा नवा प्रकार असावा किंवा ही खूप वर्षे जुनी वनस्पती असावी अशी शंका त्याला अजिबात आली नाही.

त्यानंतर आणखी काही वर्षांनी त्याच परिसरापासून ५ किमी अंतरावर त्याला त्याच प्रकारची आणखी काही झाडे त्याला दिसली. आधी त्याला जिथे ही झाडे दिसली होती ती मात्र मरुन गेली होती. मग त्याने या झाडाची एक फांदी तोडली आणि विनिफ्रेद कर्टीस यांच्याकडे ती अभ्यासासाठी पाठवली. कर्टीस टास्मानिया विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात. कर्टीस यांनी लोमाशिया झाडांची ही नवी प्रजाती असल्याचे ओळखले आणि त्यांनी याला लोमाशिया टास्मानिका हे नाव दिले. किंगने हे नव्या प्रकारचे झाड सर्वांसमोर आणले म्हणून त्याला किंग्ज होली म्हणूनही ओळखले जाते.

या झाडाच्या डेंडोक्रोनोलॉजीच्या सहाय्याने या झाडाच्या एका छोट्याशा फांदीचा अभ्यास केल्यानंतर असे आढळले की, ती एक फांदी सुमारे २४० वर्षे जुनी आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे या झाडाची वाढ खूपच सावकाश होते. एका वर्षात हे झाड फक्त ०.२६ मिमी इतके वाढते. इतक्या हळूवारपणे वाढणारे हे झाड हजारो वर्षे एकाच प्रदेशात राहिले तर त्यात आश्चर्य ते काय? उलट या झाडाच्या जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर हे झाड ४३, ६०० वर्षे जुने असल्याचे सिद्ध झाले. इतकी वर्षे हे झाड स्वतःची पुनर्निर्मिती करत आले आहे. यातील प्रत्येक स्वतंत्र झाडाचे आयुष्य हे ३०० वर्षांचे असते.

फक्त ऑस्ट्रेलियातील बाथरस्ट शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या फक्त एक-दीड किमीच्या परिसरातच ही झाडे आढळून येतात. त्यात बदलत चाललेल्या हवामानामुळे जर इथे काही नैसर्गिक आपत्ती ओढवलीच तर ही झाडेही नाहीशी होतील आणि गेली ४३,००० वर्षाहून जास्त दिवस तग राहून असलेली ही झाडे पूर्णतः नामशेष होतील.

या झाडांना वाचवण्यासाठी टास्मानिया विद्यापीठातील प्लांट सायन्सचे अभ्यासक प्रयत्न करत आहेत. ज्या झाडाची फांदी जरी जमिनीवर पडली तरी तिथे नवे झाड उगवते अशा झाडाला वाचवण्यासाठी एवढा आटापिटा का करावा लागतोय? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. हे इतकं सोपं काम नाहीये कारण या झाडाची फांदी तोडून ती एका कुंडीत लावून जागवण्याचा प्रयत्न केला तर तिथे या झाडाची वाढच होत नाही. झाडापासून फांदी तोडताक्षणीच त्या फांदीचे टोक काळे पडते आणि ती फांदी मरुन जाते. या झाडाच्या फांदीपासून नवे झाड तेव्हाच उगवते जेव्हा ते त्याच झाडाच्या आवारात पडले असेल. म्हणजे जेव्हा या फांदीला मुळे फुटतील तेव्हा त्यांच्या आजूबाजूला त्याच प्रकारची मुळे असली पाहिजेत. वेगळ्या जमिनीवर आणि वेगळ्या ठिकाणी याची वाढ होत नाही. तसेही याची वाढ होण्याला खूपच मोठा अवधी लागतो. त्यामुळे या याच्या वाढीसाठी नेमकी कशाची गरज आहे, हेही लक्षात आलेलं नाही. इतकं मात्र खरं की याची मुळे खूपच मजबूत असतात आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवताना खूपच त्रास होतो.

रॉयल ट्रांसमिशन बोटॅनिकल गार्डनमध्ये सध्या या झाडांचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण, ही झाडे खूपच नाजूक असल्याने या गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मात्र ही झाडे पाहण्यासाठी खुली केलेली नाहीत.

निसर्गाने प्रत्येक जीवाला नैसर्गिक पर्यावरणाशी जुळवून घेऊन टिकून राहण्याची क्षमता दिली आहेच. त्याच क्षमतेचा वापर करुन सुमारे ४३, ६०० वर्षे टिकून राहिलेल्या या झाडाचे जतन करण्यासाठी खरेच काही विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे का? तुम्हाला काय वाटते ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required