computer

एक नाही..दोन नाही.. एकाच वेळी नऊ बाळांची आई !

निसर्ग आपला चमत्कार कधी कुठे कसा दाखवेल सांगता येत नाही. अशीच एक आश्चर्यकारक घटना आफ्रिकेत घडली आहे. एका महिलेने एक नाही दोन नाही तर चक्क नऊ मुलांना जन्म  दिला आहे! तसं बघायला गेलं तर बहुप्रसवता ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि एका वेळी इतक्या मुलांना जन्म देणे हे तर दुर्मिळात दुर्मिळच म्हणावं लागेल.. या वर्षाच्या सुरवातीलाच बीबीसी न्यूज च्या रिपोर्ट नुसार ९ फेब्रुवारी २०२१ रोजी एका ४९ वर्षीय महिलेने ५ मुली आणि ४ मुलांना एकाचवेळी जन्म दिला. काय आहे ही कहाणी? चला  पाहू या.. 

अशा बहुप्रसवाच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. एकाच वेळी ९ बाळं म्हणजे नॉनुप्लेट - १९७१ साली ऑस्ट्रेलीयात तर १९९९ साली मलेशियात अशीच 'नॉनुप्लेट' जन्माला आली होती, पण ती बाळं जगू शकली नाहीत. इन व्हिट्रो फर्टीलायझेशनमुळे म्हणजेच टेस्टट्यूब बेबी तंत्राने जन्माला आलेली नादीया सुलेमान या आईची आठ अपत्य आता १२ वर्षाची झाली आहेत पण एकाच वेळी ९ अपत्य हा एक विक्रमच आहे.

पश्चिम आफ्रिकेतील माली या देशातील 'हलीमा सिस्से' या २५ वर्षीय महिलेने नुकताच ५ मुली आणि ४ मुलांना जन्म दिला आहे. मालीयन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को येथील हॉस्पिटल मध्ये या मुलांना जन्म दिला आहे. मालियन सरकारच्या म्हणण्यानुसार ही महिला ३० मार्च २०२१ रोजी विमानाने मोरोक्को येथे दाखल झाली जेणेकरून तिची पूर्ण काळजी घेतली जावी. तिच्यासोबत माली मध्ये तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर देखील मोरोक्कोमध्ये गेलेले आहेत. जे तिची पूर्ण देखभाल करत आहेत. सुरुवातीला या  महिलेला ७ मुले होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अल्ट्रा साऊंड चिकित्सेमध्ये देखील ७ मुलेच दिसली होती. व उर्वरित २ मुले लपली गेली होती. परंतु, तिने ९ मुलांना जन्म दिला. माली च्या आरोग्यमंत्री फांटा सीबी यांनी म्हणाले आहे की जरी या मुलांचा जन्म सिझेरियन पद्धतीने झाला असला तरी आई आणि सर्व नऊ बाळे सुखरूप आहेत. तिला आणि तिच्या बाळांना येत्या काही आठवड्यानंतर परत आणले जाईल. हलीमा सिस्सेचे मातृत्व  ही मालीमधली दंतकथा बनली आहे.

हालीमाचा पती आणि या ९ बाळांचा पिता असलेला कादेर मात्र आपल्या पहिल्या मुलीसह मालीमध्येच आहे.आपल्या पत्नीच्या संपर्कात आहे. मुलांच्या विषयी काळजी वाटते का? असे विचारल्यावर ," ही मुले आम्हाला परमेश्वराने दिली आहेत. तेव्हा त्या मुलांसोबत काय होईल हे देखील तो परमेश्वरच  ठरवेल. त्यामुळे मला काळजी वाटत नाही. जेव्हा दैव काहीतरी करते तेव्हा त्याचे कारण दैवाला माहिती असते."असे उत्तर कादेरने प्रेस आफ्रिकाशी बोलताना संगितले. त्याच्या परिवाराला मिळणार्‍या आधारामुळे तो भारावून गेल्याचेही तो म्हणाला

जन्माला आलेलं हे नवाळं (हा बोभाटाचा नवा शब्द आहे) प्रीमॅच्युअर असून त्यांचे वजन सर्वसाधारण बाळांपेक्षा कमी आहे. प्रत्येक बाळाचे वजन 500 g ते 1 kg दरम्यानचे  आहे. त्यामुळे  डॉक्टरांचा असा अंदाज आहे की या सर्व बाळांना कमीतकमी 2/3 महीने incubetors ( पेटीत ) मध्ये ठेवावे लागेल.  पश्चिमी आफ्रिकन देशातील डॉक्टर्स नी  हालीमा आणि तिच्या बाळांना शुभेच्छा देवून तिच्या आणि बाळांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

मोरोक्को आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते राचीड कौधरी यांनी मात्र देशातील कोणत्या रुग्णालयात अशा प्रकारची प्रसूती झाल्याची कल्पना नसल्याचे आफ्रिकन प्रेस च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. मालीच्या आरोग्यमंत्री सीबी यांनी सेस्से साठी उपचार करणार्‍या माली आणि मोरोक्को मेडिकल टीम चे अभिनंदन केले आहे व त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्याकडे बाळाची काळजी 'जीवती' घेते असं म्हणतात तशीच आफ्रीकन जीवती पण या बाळांची काळजी घेईलच ! तुम्हाला ही बातमी वाचून काय वाटले ते कमेंट बॉक्स्मध्ये नक्की सांगा !

 

लेखिका- मानसी चिटणीस

सबस्क्राईब करा

* indicates required