computer

मायोपिया? शब्द नवीन असला तरी प्रकरण गंभीर आहे..जाणून घ्या लक्षणे आणि उपाय..

मायोपिया हा आपल्या दृष्टीशी निगडीत आजार आहे. मायोपिया झालेल्या व्यक्तीची दूरची दृष्टी कमकुवत होते. हा आजार झालेल्या व्यक्तीला जवळची वस्तू अगदी व्यवस्थित दिसते, पण लांब असलेली वस्तू पाहायला तिला त्रास होतो. अशा व्यक्तीला टी.व्ही., फळा, कॉम्प्युटर अशा गोष्टी बघायला त्रास होतो. मायोपियाचे दोन प्रकार आहेत उच्च मायोपिया आणि कमी प्रतीचा मायोपिया. उच्च मायोपिया हा गंभीर असतो. त्या मानाने कमी प्रतीचा मायोपिया हा सौम्य असतो. काहीवेळा मायोपिया झालेल्या व्यक्तीला फक्त रात्रीच लांबचे दिसणे त्रासदायक ठरते त्याला नाईट मायोपिया म्हणतात. मायोपियामध्ये डोळ्यांच्या बुबुळाचा आकार वाढतो. त्यामुळे आपण पाहत असलेल्या गोष्टींचे प्रतिबिंब हे रेटीनावरती न पडता थोडे पुढे पडते. त्यामुळे लांबची गोष्ट अस्पष्ट दिसते आणि जवळची गोष्ट पाहण्यासाठी कोणताही त्रास होत नाही.

मायोपियाची लक्षणे-कारणे

मायोपिया हा निकटदृष्टी दोष आहे. मायोपिया झालेल्या व्यक्तीला लांब असलेल्या गोष्टी व्यवस्थित दिसत नाहीत. मायोपिया झालेल्या व्यक्तीमध्ये डोकेदुखी, डोळे लाल होणे, डोळ्यावर ताण येणे, दूरचे न दिसणे अशी लक्षणे दिसतात. जर हा आजार गंभीररीत्त्या वाढला तर कायमचे अंधत्व येऊ शकते.

मायोपियाची कारणे-
मायोपिया हा प्रामुख्याने अनुवंशिक असतो. पण आपण डोळ्यांना दिलेल्या अतिरिक्त ताणामुळे देखील हा आजार होतो. कॉम्प्युटरवरती जास्त वेळ काम करणे, जास्त टी. व्ही. पाहाणे, मोबाईलचा जास्त वापर या गोष्टींमुळे देखील हा आजार होतो. डायाबिटीससारख्या आजारामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होते. याचादेखील परिणाम दृष्टीवर होत असतो. काही वेळा वातावरणात होणारे बदल देखील आपल्या दृष्टीवर परिणाम करतात.

निदान आणि उपचार

मायोपियाचे निदान करण्यासाठी अर्थातच एका आय स्पेशालीस्टची गरज असते. डोळ्यांच्या डॉक्टरकडून डोळ्यांची तपासणी करताना डोळ्यांमध्ये एक आय ड्रॉप टाकला जातो त्यामुळे ही तपासणी करणे सोपे होऊन जाते. मायोपियावर उपचार करण्यासाठी सामान्यपणे चष्मा किंवा लेन् चा वापर केला जातो. पण काही केसेसमध्ये सर्जरी देखील केली जाते. काही वेळा लेझर किरणे वापरून नॉन सर्जिकल प्रक्रिया देखील केली जाते.

काहीवेळा मायोपिया हा जास्त तणावामुळे देखील होऊ शकतो. अशावेळी उपचार करताना डोळ्यांच्या व्यायामाचा सल्ला दिला जातो. भारतापेक्षा मध्य आशियायी देशांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात वाढला आहे. चीन-कोरिया-सिंगापूर या देशांमध्ये ही समस्या खूप जास्त प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे लोक जास्त वेळ घरातच होते. त्यामुळे टी व्ही, मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले व या आजाराची तीव्रताही वाढली. त्याचबरोबर जास्त वेळ घरात राहिल्याने माणसे उन्हात, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात जास्त आली नाहीत यागोष्टींचा देखील परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार काहीवेळ घराच्या बाहेर राहिल्याने देखील या आजारावर नियंत्रण मिळवता येते. तुम्ही फिरायला जा किंवा खेळायला बाहेर जा, पण रोज थोडातरी वेळ बाहेर घालवा असे त्यांचे म्हणणे आहे. आजकालच्या जगात कॉम्प्युटर मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे लहान मुलेदेखील या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. परिणामी त्यांचे बाहेर मोकळ्या वातावरणात खेळणे खूपच कमी झाले आहे. या मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या सतत च्या वापरामुळे त्यांच्या देखील डोळ्यावर परिणाम होऊन लहान मुलांमध्ये देखील या आजाराचे प्रमाण दिसून येत आहे. या आजाराची गंभीरता लक्षात घेता चीनने या आजारावर नियंत्रण मिळवण्याला जास्त महत्व दिले आहे.

 

प्रसिध्द मॅगझीन The economist च्या रिपोर्टनुसार तैवानमध्ये जवळ जवळ ८० टक्के शाळेत जाणाऱ्या मुलांना बघण्यासाठी चष्मा किंवा लेन्सेसचा वापर करावा लागतो. हे प्रमाण असेच वाढत गेले तर २०५० पर्यंत कमीत की ५ अरब लोक या रोगाच्या तडाख्यात येऊ शकतात.
तैवान सरकारने २०१० मध्ये एक प्रोग्राम सुरु केला. त्यानुसार मुलांना दररोज दोन तास बाहेर नेले जाई. त्यामुळे मायोपिया आजाराच्या टक्केवारीत घसरण झाली. आता चीन सरकारदेखील असे प्रोग्राम राबवण्याचा विचार करत आहे. साहजिकच आहे तैवान आणि चीन या देशांनी जसे या आजाराविरुध्द लढाई सुरु केली आहे, तशीच बाकीच्या देशांनी देखील पावले उचलायला सुरुवात करायला हवी.

आरती गायकवाड

सबस्क्राईब करा

* indicates required